न क्षुद्रोऽपि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय
प्राप्ते मित्रे भवति विमुख: किं पुनर्यस्तथोच्चै: ॥

हे ते दोन चरण मी म्हटले.

पूर्वीच्या प्रेमळ श्यामला वर्गातील मुलांनी प्रेम दिले, कोटावर फूल लावले त्या श्यामला ती मुले विसरली नाहीत, हे त्या ९वलोकाच्या द्वारा सांगायचे होते. त्या मास्तरांच्या समयसूचकतेबद्दल व सहृदयतेबद्दल आम्हांला कौतुक वाटले. आम्हांला त्या श्लोकाने आनंद झाला. आनंदाच्या भरात माझ्या जवळच्या मित्राने माझा हात आपल्या हातात घेतला!

''अरे, ते तहिले दोन चरणही आठवले हो, ऐका.

त्वामासारप्रशमितवनोपप्लवं साधुमर्ूध्ना
वक्ष्यत्पध्वंश्रमपरिगतं सानुमान् आम्रकूट: ॥''

दापोलीच्या मुलांना मी माझे अनेक अनुभव सांगितले; परंतु जेवणखाणसंबंधी काही एक बोललो नाही. दापोलीला मी पूर्वी आत्याकडे राहात होतो,तेथेही एकदा जेवायला गेलो. सर्वाना भेटलो. त्यांनाही बरे वाटले. मी दापोलीस दोन तीन दिवस होतो. एके दिवशी माझ्या गावचे एक गृहस्थ मला अकस्मात भेटले.
''काय रे श्याम, कधी आलास?'' त्यांनी विचारले.

''झाले दोन-तीन दिवस,'' मी म्हटले.
''अरे, घरी सारखी काळजी करीत आहेत. औंधला प्लेग आहे, एवढंच तू कळवलंस. तुझा एक भाऊ प्लेगने गेला, म्हणून तुझ्याबद्दल सारी फिकिरीत आहेत.'' ते गृहस्थ म्हणाले.

''मी तर भाऊंना पत्र पाठवलं होतं. पहिल्या पत्रानंतर दुसरं औंध सोडल्याचंही पत्र टाकलं होतं,'' मी म्हणालो.
''ते मिळालं नाही. तू इथे मजा करीत आहेस नि ते तुझ्या फिकिरीत आहेत, त्यांना अन्न गोड लागत नाही. झोप लागत नाही. आधी घरी जा,'' ते म्हणाले.
''परंतु मला काय माहीत?'' मी म्हणालो.

''मुलाच्या मरणाने आई-बाबा दु:खी आहेत, हे नाही तुला माहीत? तुझ्याकडच्या प्लेगच्या वार्तेने ते आणखी चिंतेत पडतील, हे नको होतं का तुला कळायला? इंग्रजी शिकता, पण साध्या गोष्टी कळत नाहीत. आई-बापांना विसरणं म्हणजे इंग्रजी शिक्ष्ण,'' असे तावातावाने म्हणून ते गृहस्थ गेले. मला वाईट वाटले. मी का आई-बापांना विसरलो होतो? ज्यांचे स्मरण होताच मला गहिवरून येत असे, त्यांना का मी विसरलो होतो? मी का मायभुल्या-बापभुल्या, मायबापांना विसरणारा, झालो होतो?

माझ्या हृदयावर तो महान प्रहार होता. मी पत्र पाठविले होते, पोचले नसेल कदाचित. तरी पण सदानंदाच्या मरणाने माझ्या आईला जबर धक्का बसला होता, तिच्याकडे मी आधी गेले पाहिजे होते, असे आता मला वाटू लागले. मी ताबडतोब रात्रीच्या बैलगाडीने जायचे ठरवले.

''शिवरामच्या आई, आज रात्री मला जाऊदेच. आग्रह करू नका,'' मी म्हटले.
''उद्या मी अंग धुते, मग जेवून जा. तुला थालीपीठ आवडतं. ते करीन,'' ती माउली म्हणाली.
''पुन्हा मी औंधला जाताना इथे येईन, त्या वेळेस करा थालीपीठ. आज गेलं पाहिजे. माझी चातकासारखी घरी वाट पाहात आहेत,'' मी म्हटले.

मातेने मातेची मन:स्थिती ओळखली. शिवरामच्या आईने आढेवेढे घेतले नाहीत. रात्री मी बैनगाडी केली व पालगडला जायला निघालो. आता सारे लक्ष घरी लागले.घरच्या आठवणी येऊ लागल्या. गाडीत गाडीवान झोपला; परंतु मी जागाच होतो.

पहाटेच्या वेळेस मी घ्री आलो. खेडयातील लोक पहाटे उठतात. ब्राह्मणवाडीत माझे घर. कोठे वेदपठण चालले होते, कोठे दळणाच्या ओव्या ऐकू येत होत्या. मी माझ्या घरी आलो. 'आई' अशी सद्गदित हाक मारली. आई ताक करीत होती. ती एकदम आली. मी तिला बिलगलो. ती पाठीवरून सारखा हात फिरवीत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel