''श्याम, जेव की. पुन्हा पायी जायचं आहे शिरोळ स्टेशनपर्यंत,'' एक मित्र म्हणाला.
''पायांत भरपूर शक्ती आहे. जेवल्यानेच मी मरगळेन,'' मी म्हटले.
शेवटी सारे उदरंभर लोक उठले. ब्रह्मवृंद जेवून उठताच ते प्रदक्षिणा घालणारे हजारो जीव आत घुसले. ते का बंड पुकारीत होते? छे:छे:, बंड पुकारायची वेळ अद्यापि आली नाही. मग त्या वेळेला कोठून असणार? उच्छिष्टाचा प्रसाद मिळावा, म्हणून ते सारे मुमुक्षू धडपडत होते. एक शितकणही मंडपांत राहिला नाही. कोणी पत्रावळी चाटल्या, कोणी पदरात बांधून घेतल्या. मी पाहातच राहिलो.
मित्रांनो, बावीस वर्षांपूर्वीचा तो उद्वेगजन देखावा अजून माझ्या डोळयांसमोर आहे. धर्माच्या नावाखाली माणसांचे आम्ही पशू कसे केले आहेत, ते हृयावरून दिसून येईल. भोजनभाऊ देवस्थांची उत्पन्न खालसा केली पाहिजे. भोजने व सत्यनारायण घालीत काय बसता? त्या नारायणमहाराजांनी म्हणे हजारो सत्यनारायण केले आम्हांला चीड यायला हवी होती. पुण्यामुंबईचे सारे तरूण तेथे धावून जायला हवे होते. त्यांनी सत्याग्रह करायला हवा होता. राष्ट्रातील जनतेला ज्ञानांची भाकरी घायला पैसा नाही, मग हे सत्यनारायण कसले पुजता? महाराष्ट्रातल्या तरूणांनी शांतिमय बंड तेथे करायला हवे होते. निरनिराळया संस्थानिकांनी दुधाच्या व तुपाच्या लॉ-याच्या लॉ-या भरून तेथे रोज पाठवल्या. संस्थानांत वाटेल तो जुलुम करतात, सत्यनारायणाला मात्र दुधे तुपे पाठवतात! ळे खादाड धर्म अत:पर बंद झाले पाहिजेत. सा-या गाद्या, सारी पाठे कायद्याने बंद करण्यात आली पाहिजेत. शेकडो वर्षे शंकराचार्याच्या गाद्या आहेत, तरी अज्ञान का? तरी अजून देशात रानटी लोक का? ह्या रानटी लोकांत ज्ञानाचा दिवा नेण्यासाठी ह्या गाद्या झटल्या का? मिशनरी लोक येऊन रानटी लोकांना ज्ञान देतात आणि आमचे गादीबहाद्दर काय करीत आहेत?
धर्म म्हणजे माणूसकी मानवाची मान उंच करणे म्हणजे धर्म. तरूणांनी ह्या मानव्याचे उपासक व्हावे. कोणाची मान ताठरलेली नको. कोणाची वाकलेली नको. जगात दीनवाणेपणा नको. जगात मगरूपणा नका. जगात सरळपणा हवा आहे. मानवाचा संसार सुंदर करायला प्रत्येक कृतीचा अवतार हवा. विचारांच्या प्रकाशात प्रत्येक कृत्य व्हायला हवे.' तुझा धर्म काय? विचारताच 'माणूसकी' सांगावे. हिंदू धर्म, मुसलमान धर्म ही नावे विसरून 'माणुसकी' धर्म रूढ केला पाहिजे.
देवाधर्माच्या नावाखाली मानवांना दडपीत असाल. तर तो देवधर्म मरणेच बरे. देवधर्म मेल्याशिवाय मानवाची मान उंच होणार नाही. पदोपदी देवाचा दगड गरिबांच्या मानेवर ठेवून, त्यांचा आत्मा का चिरडून टाकता? ज्या ज्या गोष्टींनी समाजात उत्साह, प्रेम, सहानुभुती, विचार, उद्योग, बळ, सहकार्य वाढेल., त्याला धर्म म्हणावे. ज्या ज्या गोष्टींनी समाजात आंधेळपणा, बावळटपणा, दंभ, आळस, व्यभिचार, दुबळेपणा, कर्मशून्यता ही वाढतील त्यांना अधर्म समजावे. समाजात सर्वाना स्वच्छपणे विचार करायला लावणे, याहून महान धर्म कोणतीही नाही. जेवणे झाली, तो जवळ जवळ पाच वाजायला आले. आम्ही तसेच निघालो. शिरोळ स्टेशनवर आलो. तेथून पुन्हा मिरजेला आलो. मिरज स्टेशनवरच रात्री झोपलो. सकाळी आम्ही सांगलीला गेलो. तेथील पाण्याची ती उंच प्रचंड टाकी पाहिली. त्या टाकीतील पाणी सबंध शहराला तीन दिवस पुरेल असे म्हणतात. सांगली शहराचे जुनी सांगली व नवी सांगली असे दोन भाग आहेत. नव्या सांगलीत मोठेमोठे रस्ते वगैरे आहेत. नवीन हवेल्या, नवीन व्यापार, सारे नव्या सांगलीत आहे. जुन्या सांगलीत सारे अरूंद बोळ.कृष्णेकडे आम्ही जुन्या सांगलीत गेलो. आधीच अरूंद बोळ व त्यात दोन्ही बाजूंना लघू व दीर्घ शंका केलेल्या! रस्त्यावर हे विधी करणे म्हणजे पाप, हे आम्ही जोपर्यंत मानीत नाही, तोपर्यंत आम्ही माणसे नाही.तोपर्यंत आम्हांला धर्म वगैरे काही एक नाही. तोपर्यंत आम्ही केवळ पशू आहोत.