'माझी पुण्यास व्यवस्था लागली आहे. फक्त फीपुरते पैसे पाहिजेत. महिना पाच रूपये असले, म्हणजे झालं. मी मॅट्रिकच्या वर्गात गेलो आहे.'
अशा मजकुराची दादाला व वडिलांना मी पत्रे पाठविली. वडिलांचे आशीर्वादपर पत्र आले. दादाचेही अभिनंदनपर पत्र आले. मी हिंगण्याला मावशीलाही भेटून आलो. मावशीला सारे सांगितले, परंतु जेवणाचे मात्र काही बोललो नाही.
''श्याम, जेवायचं काय करतोस?'' तिने विचारले.
''अग, माझ्या मित्राकडेच मी जेवतो. पूजा करायची, काही काम करायचं नि तिथे जेवायचं,'' मी म्हटले.
''बरंच झालं. फीला मी पण मदत करीन जाईन. कधी दादा पाठवील, कधी मी. कधी भाऊही कोकणातून पाच रूपये पाठवतील,'' मावशी म्हणाली.
''आता गाडा सुरळीत चालेल, असं वाटतं,'' मी म्हटले.
''बरं झालं. ते औंध सुटलं एकदाचं. भारी हाल हाल झाले तिथे तुझे,'' मावशी म्हणाली.
''मावशी, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी ते सारं स्हन केलं हो. औंधला माझे थोडे-फार जेवण्या-खाण्याचे हाल झाले, तरी तिथे प्रेमही भरपूर मिळालं. त्या सर्वांची मला आठवण येते. एकनाथच्या हातची भाकरी आता थोडीच मिळणार आहे? गोविंदाचं गोड बोलणं थोडंच ऐकायला मिळणार आहे?'' मी म्हटले.
''तू जाशील तिथे प्रेम मिळवशील.'' मावशी म्हणाली.
''ही देवाची कृपा. आईच्या प्रार्थनेचं हे गोड फळ,'' मी म्हटले.
''अक्काला आता बरं वाटेल. तुझ्याबद्दलची तिची काळजी थोडी कमी होईल,'' मावशी म्हणाली.
मी सातवीत गेलो. माझे सारे सुरळीत सुरू झाले; परंतु खाणावळ कोठून भरायची? दर महिन्याला पुस्तके कोठून विकायची? पुन्हा डोळयांसमोर प्रश्र उभा रहिला. अन्नब्रहन आ वासून उभे राहिले.
'वितीएवढे पोट । परी केवढा त्याचा बोभाट ॥'