मी बाहेर पडलो. गोविंदा व मी 'ॐ भवति भिक्षान्देही ।' म्हणत घरोघर जाऊ लागलो. ''अवकाश आहेरे अजून.'' कोठे उत्तर मिळाले.
''आमची जेवणं झाली नाहीत. तो ह्या माधुक-यांचाच सुळसुळाट. उद्योग नाही मेल्यांना दुसरा. रिकामटेकडे. घेतली झोळी, की निघाले,'' एक म्हातारी बाई म्हणाली.
सारे मुकाटयाने ऐकत, सहन करीत, आम्ही जात होतो. माधुकरी मिळण्याऐवजी शिव्याशाप मिळत होते. काही घरी माधुकरी मिळत होती. कोकणात माझ्या गावी जशी माधुकरी वाढीत, तशीच येथेही वाढीत असतील. अशी माझी समजूत होती. परंतु उलट अनुभव आला. लहानपणी आमच्या घरी माधुक-यांसाठी निरनिराळया मुदा करुन भिंती-जवळ ठेवलेल्या असत. माधुकरी येत व एकेक घेऊन जात. तशा मुदा दहा घरी मिळाल्या असत्या, तर सहज एकादोघांचे पोट भरले असते. देश तर कोकणापेक्षा सुखी, श्रीमंत. येथे भात नसला, तर भाकरी चतकोर-चतकोर वाढतील, अशी माझी कल्पना होती. परंतु सत्य व कल्पना हयांत नेहमीच अंतर असते. चतकोराचेही चार तुकडे करुन, त्यातला एक आम्हांला मिळे. असे तुकडे किती ठिकाणचे गोळा करायचे? किती घरे हिंडायची?
''श्याम, ते एक घर घेऊ,'' गोविंदा म्हणाला,
''पुरे आता,'' मी म्हटले.
''त्या घरी आपल्या वर्गातल्या मुक्ताबाई राहातात,'' तो म्हणाला.
''तिथे जरा सहानुभूतिपूर्वक माधुकरी मिळेल म्हणतोस?'' मी विचारले.
''हो,'' तो म्हणाला.
आम्ही त्याही घरात गेलो, गोविंदाची अपेक्षा खरी ठरली.
''ताकाला भांडं आहे का?'' मुक्ताबाईनी विचारले.
''नाही,'' गोविंदा म्हणाला.
''उद्या आणा,'' त्या म्हणाल्या.
एके ठिकाणी तरी अनुकंपा दिसली. आपल्या वर्गबंधूवर अशी माधूकरी मागण्याची पाटी का यावी, असा विचारही कदाचित मुक्ताबाईच्या मनात येऊन गेला असेल. कारण आमच्या हातात झोळया पाहून त्या खिन्न झाल्या होत्या. भिका-यांना पाहून समाजाची चीड आली पाहिजे. सरकारची चीड आली पाहिजे. ज्या देशात भिकारी आहेत. तेथील सरकार नालायक आहे व समाज त्याहून नालायक आहे. कारण समाजाच्या लायकीवरच तेथले सरकार अवलंबून असते. देशातल्या सरकारच्या स्वरुपावरुनच समाजाची किंमत जगात होत असते. भावाभावांवर जुलूम व अन्याय करणा-या समाजाला गुलामगिरी लादणारेच सरकार लाभायचे.
गेविंदा व मी खोलीवर आलो. आम्ही तिघे जेवायला बसलो होतो.
''भिक्षान्न पवित्र असतं, त्याची चर्चा करु नये,'' मी म्हटले.
''परंतु ते पवित्र भावनेनं वाढलेलं असलं तर,''गोविंदा म्हणाला.
''परंतु आपल्या झोळीत येताच ते पवित्र होतं,'' मी म्हटले.
''बाजरीच्या भाकरीचे तुकडे मी घेतो. मला बाजरीची भाकरी आवडते,'' बंडू म्हणाला.
''श्याम तू भाते घे. तू आहेस कोकणातला,'' गोविंदा म्हणाला.