'' शंकर, भाऊबीजेला ये हो. नाही तर जाशील कुठे,'' ताई म्हणाली.
'' येईन,'' तो म्हणाला. त्याने मुलाचा मुका घेतला.
आम्ही निघालो. ताई दारात उभी होती. आम्ही दृष्टीआड होईपर्यंत ती तेथे होती. माझी खरी यात्रा येथेच झाली. नरसोबाच्या वाडीला आम्ही जात होतो. परंतु माझी खरी वाडी त्या टांगेवाल्याच्या घरीच होती.,
आम्ही झपझप जात होतो. गुरूद्वादशीचा तो दिवस होता. वाडीला मोठा उत्सव असतो. हजारो ब्राह्यण त्या दिवशी तेथे जेवतात. रस्त्यात चिखल झाला होता. पाय गा-यात फसत होते. अंगावर चिखल उडत होता. वाटेत नाव लागली. नदीला पूर येऊन गेला होता. तीरावर गाळ साचला होता. ढोपर ढोपर चिखलातून नावेजवळ जावे लागत होते. नावेवर सारी बरबट झालेली होती. पाय रपरप सरत होते. पाय कोणाचा सरला, की तो नदीतच पडायचा. नावेवर कोण गर्दी यात्रेची गर्दी.
आम्ही दहा-अकराच्या सुमारास वाडीला आलो. वाडीला कृष्णा व पंचगंगा याचा संगम आहे. त्या दिवशी दोन नावांच्या मध्ये सापडून दोन लोक चिरडले गेले होते. आम्ही गेलो, तो हीच गोष्ट ज्याच्या त्याच्या तोंडी होती. नदीचे पाणी लाल लाल दिसत होते. 'किती रे तुमचं पाप धुऊ.' असे का रागावून कृष्णामाई म्हणत होती? माझ्यात डोकी बुडवता आणि देवाजवळ सर्वांना जाऊ देत नाही, हा काय चावटपणा आहे. असे का रागाने लाल होऊन कृष्णाताई सांगत होती? मी त्या लाल पाण्याकडे पहात राहिलो. माझे मित्र पट्टीचे पोहणारे त्यांनी उडया घेतल्या. मला माझी लाज वाटली. मी घाटावरच डोके बुचकाळले स्नान झाली. आम्ही कोरडे नेसून देवदर्शनास निघालो. परंतु देवाच्या गाभा-यात ओलेत्याने जायचे, असा दंडक होता. आम्ही पुन्हा ओली धोतरे नेसलो. पाळीपाळीने पादुकांचे दर्शन घेऊन आलो. मंदिर म्हणजे एक लहानशी खोली आहे. आम्ही पुन्हा कोरडी धोतरे नेसून बाहेर पडलो.
मोठमोठ चर खणून तेथे स्वयंपाक चालला. होता. आदल्या दिवशी अकस्मात पाऊस पडल्याने सारे सरपण भिजून गेले होते. सरपण पेटता पेटेना. राकेलचे डबेच्या डबे लाकडांच्या ओंडक्यांवर ओतण्यात आले. तेव्हा कोठे ते ओंडके धडधड पेटू लागले. प्रचंड पातेली व प्रचंड सतेली तेथे चरावर होती. भात, वरण, आमटी व शिरा असे जेवण होते. दहा-वीस हजार ब्राह्वण जेवतात. ब्राह्वणांशिवाय इतरांना भोजन नसते. तीन-चारच्या सुमारास पंगती बसल्या. प्रत्येक पंगतीत एकेक भाताचे मोठे सतेले आणि वरणाचे पातेले ठेवण्यात आले. वाढप सुरू झाले. आमटीत वांगी टाकलेली होती. चातुर्मासात वर्ज्य केलेले वांगे गुरूद्वादशीपासून पुन्हा खाण्यास येथे सुरूवात होते. ते वांगे मिळावे, म्हणून कोण झोंबाझोंबी व मारामारी!
मंडळी जेवायला बसली. हातातोंडाची लढाई सुरू झाली. इतक्यात प्रचंड जयघोष कानांवर आले. कोणाचा हल्ला आला की काय, असे मला वाटले. हजारो ब्राह्वाण जेवत होते. हजारो ब्राह्वाणांना जेवायला बसलेल्या ब्राह्वाणांना प्रदक्षिणा घालीत होते एकदम दहावीस हजार भूदेवांना प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य त्यांना मिळत होते आम्ही जेवत होतो आणि ते आम्हांला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य त्यांना मिळत होते आम्ही जेवत होतो आणि ते आम्हांला प्रदशिणा घालीत धावत होते.
ते देव, का आम्ही देव? आम्ही दगड होतो. जगापेक्षा स्वत:ला पवित्र व श्रेष्ठ मानून, आम्ही आमची पोटे जाळीत होतो आणि ते भुकेल्या पोटी आम्हांला प्रदशिणा घालीत होते. मला वाईट वाटले. माझी भूक नाहीशी झाली. त्या प्रदशिणा घालणा-या हजारो श्रध्दामय जीवांकडे मी बघत होतो.