लहानपणी सदानंद घेऊन मी अशाच फे-या घालीत असे. तोंडाने रामरक्षा म्हणत असे. ह्या मुलालाही मी रामरक्षा म्हटली. मी मध्येच प्रेमाने त्या मुलाला घट्ट धरीत होतो. इतक्या लवकर कशाला झोपले ते? मी त्याला हसवले असते, त्याचे मुके घेतले असते, असे मनात आले. शंकरने पाणी काढले, बादल्या भरून ठेवल्या. पत्रावळी मांडण्यात आल्या. मी आत आलो.
''शंकर, हा निजला रे.'' मी म्हटले.
''तुम्ही का त्याला हिंडवीत होतात इतका वेळ?'' त्याच्या बहिणीने विचारले.
''हो,'' मी म्हटले.
''तुम्हांला उगीच त्रास,'' ती म्हणाली.
''असं नका म्हणू. मग तुम्हालाही हा सारा स्वयंपाकाचा त्रास होत आहे, असंच म्हणावं लागेल. तुम्ही प्रेमाने भाक-या भाजीत आहात, मी प्रेमानेच त्याला घेतलं होतं. त्याला कुठे ठेवू?'' मी विचारले.
''शंकर, तिथे ते फटकूर घाल. त्यावर ठेवा त्याला,'' ती म्हणाली.
एक फाटके धोतर शंकरने पसरले. ते मूल त्यावर मी निजवले. हळूहळू थोपटले. आम्ही हातपाय धुतले. सारे जेवायला बसलो.
''ह्या बाळाचे बाबा केव्हा येतील?'' मी विचारले.
''त्यांचा काय नेम? बारासुध्दा वाजतील. फार त्रास दादा. गाडीच्या वेळेला जावं लागतं. पहाट असो, दुपार असो; पाऊस असो, थंडी असो; भाडं मिळो, वा ना मिळो; जावं लागतं,'' शंकरची बहीण म्हणाली.
''म्हणूनच मग टांगेवाल्यांना व्यसनं लागतात. दारूपायी धुळीत मिळतात,'' एकजणं म्हणाला.
''त्यांना नाही रे दादा काही व्यसन. सुपारीसुध्दा खात नाहीत. शंकरच्या आईच्या आशीर्वादाने माझा संसार सुखाचा आहे,'' ती म्हणाली.
''शंकर तर ब्राम्हण. तुम्ही त्याला बाटवलंत. त्याच्या गावी कळलं, तर वाळीत टाकतील,'' एकजण म्हणाला.
''भाऊ बहिणीकडे नाही जेवणार, तर कुठे? शंकर, मी का तुला बाटवलं?'' तिने विचारले.
''तू तर पवित्र केलंस। औंधचं प्रेमहीन अन्न खाऊन आलेली अपवित्रता तुझ्याकडच्या अन्नाने नाहीशी होईल. पोटभर जेवा रे सारे.'' शंकर म्हणाला.
आमची जेवणे होतात न होतात, तोच एकाएकी आकाश मेघांनी भरून आले. पाऊस पडू लागला. प्रचंड वादळ उठले. पाऊस, वारा, विजा, सर्वाची मिळणी झाली.
''आकाशाखाली झोपणार होतेत ना रे?'' एकजण म्हणाला.
''देव म्हणतो ह्या घरातच झोपा. इथे अधिक पवित्रता आहे.'' मी म्हटले.
''शंकर, तिथे मी झाडून ठेवलं आहे. तिथे निजू देत तुझे मित्र,'' त्याची बहीण म्हणाली.
हळूहळू आम्ही आपल्या पथा-या पसरल्या व तेथे झोपी गेलो. मला मात्र झोप आली नाही. शंकर व त्याची ताई बोलत बसली होती.
''शंकर, तू किती रे वाळलास? आजारी होतास?'' तिने विचारले.
''थंडी-तापाने आजारी होतो, तो म्हणाला.
''मग इथे का आला नाहीस? तुला बरा करून धाडला असता. नि अलीकडे किती दिवसात तरी तुझा कागद नाही आला. ते म्हणत, शंकर आता इंग्रजी शिकतो. टांगेवाल्याला पत्र कसं लिहील?'' ताई म्हणाली.