सात-आठ दिवस मुंबईत

आईचे न ऐकता मी मुंबईला आलो. तिच्या थोर हृदयाला दुखवून आलो. आज मला त्यांचे वाईट वाटत आहेत. परंतु मागून वाईट वाटणे काय किंमतीचे? आधीच पोळलेल्या मातृहृदयाला आणखी कष्टी करुन मी आलो. कबूल केल्याप्रमाणे वाटेत दापोलीला शिवरामच्या आईकडेही मी गेलो नाही. मी माझ्या विचारात गर्क होतो.मुंबईस मामांकडे आलो. त्यांच्याकडे माझा मोठा भाऊ राहत होता. त्याची स्वतंत्र खोली नव्हती. मी मामीला आईने दिलेली तिळगुळाची पुडी दिली. तिने हळदीकुंकू लावून घेतले.सर्वाची खुशाली मी सांगितली

''श्याम, तू इतक्यात कशाला आलास? अद्याप प्लेग आहे ना?'' दादाने विचारले.
''भाऊंना खरे वाटेना, म्हणून आलो. आई, नको जाऊ' म्हणत होती; परंतु मी हट्टालाच पेटलो. आलो निघून,'' मी म्हटले.
''पुढे काय करायचं?'' त्याने विचारले
'' मी पुण्याला जातो तिथे राहीन पाच-सहा दिवस, तो प्लेग कमी होईल. इथे चार पाच दिवस राहीन'' मी म्हटले.

दादा,मामा दुपारी आपपल्या उद्योगाला जात. मामाकडे मराठी पुस्तके पुष्कळ होती.त्यांतली मी वाचीत बसे. १९०८ मधल्या लोकमांन्यांवरील खटल्याचे पुस्तक तेथे मला वाचायला मिळाले. 'काळांतील काही निबंध वाचायला मिळाले. ही जप्त पुस्तके तेथे होती. ती पुस्तके वाचण्यात मी तल्लीन झालो. माझे हृदय भरुन आले. अंगावर मधून मधून रोमांच उठत. हृदयात नवीन प्रकाश व नवीन जीवन आले. एके दिवशी मी दादाबरोबर व्याख्यानाला गेलो होतो. मला वाटते, ते खाडिलकरांचे व्याखान होते. औंधला मी काही व्याखाने ऐकली होती. औंधचे महाराज पुण्याचे काही प्रोफेसर बोलवीत व त्यांची व्याखाने करवीत. प्रो. भानू. प्रो. हरिभाऊ लिमये, प्रो. पोतदार प्रो. भाटे. प्रो. गोडबोले वगैरेचीं व्याखाने मी औंधला ऐकली होती; परंतु मुंबईला जे व्याख्यान ऐकले. ते औरच होते. ते कॉग्रेसचा संदेश' ह्यावर होते. नुकतीच लखनौची कॉग्रेंस होऊन गेली होती. अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष होते हिंदुमुसलमानांचा करार झाला होता. लोकमान्य टिळक सुटून आल्यावर पुन्हा कॉग्रेसमध्ये शिरले होते. अशा त्या अपूर्व 'काग्रेसचा संदेश' नाटयाचार्य खाडिलकर सांगत होते.

कॉग्रेससंबधी मी ऐकलेले ते पहिले भाषण! देशभक्तीसंबधी ऐकलेले पहिले व्याख्यान! स्वराज्याचा मी ऐकलेला पहिला उद्गार ! सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे देशभक्तांची नावे ऐकण्याचा तो पहिला दिवस! त्या कॉगेसच्या झेंडयाखाली संपूर्ण ह्दयाने मी एके दिवशी येऊन उभा राहीन, कॉग्रेसचा संदेश खेडयापाडयांत सांगत घुमेन, त्या कॉग्रेससाठी मी मनात ईश्वराला जीवेभवे रात्रंदिवस आळवीन, असे त्या वेळेस माझ्या स्वप्नात तरी होते का?

मुंबईचे ते सात - आठ दिवस देशभक्तीच्या वाचनात व श्रवणात गेले. त्या वेळेस मी आणखीही एक मजा केली. मजा म्हणू, का कुकर्म म्हणू? माझा मित्र सखाराम गिरगावात राहात असे. त्याला भेटायला म्हणून मी गेलो होतो. तो घरी नव्हता. मी त्याची वाट पाहात होतो. तेथील कोनाडयात काही वाचायला आहे का पाहात हातो. तो तेथील अनेक सटरफटर पुस्तकात 'हिंदुधर्म व सुधारण' हे भले मोठे पुस्तक सापडले. प्रिन्सिपाल गोळे ह्याचें ते पुस्तक मी वाचू लागलो. किती सुंदर व सोज्ज्वळ ती भाषा मला गुदगुल्या होऊ लागल्या. मी ते पुस्तक माझ्या रुमालात गुंडाळले व घरी घेऊन आलो! पुस्तकाची मी चोरी केली. 'कोनाडयात पडून तर राहिले आहे. नेंलं आपण, तर काय झालं? अशी मनात चर्चा केली. ते पुस्तक पुढे पाच-सहा वर्षानी माझ्याजवळूनसुध्दा असेच कोणीतरी नेले! त्या वेळेस ते पुस्तक दुर्मिळ होते जीर्ण-शीर्ण झालेले ते पुस्तक मी किती जपून ठेवले होते!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel