''नाही. फक्त नरसोबाची वाडी पाहून आलो,'' मी म्हटले.
''औदुंबरला एकदा जाऊन राहायचं आहे. माझ्या मनात. सखूताई, तू नि मी जाऊ. मंडळी असली म्हणजे बरं. केवढा डोह आहे औंदुबरला! रम्य स्थान. जाऊ हं, अण्णा,'' मामा म्हणाले.
मी काहीच बोललो नाही.
''निजू दे त्याला आता, नीज रे तू श्याम,'' मामी म्हणाली.
''नीज, उद्याच नाही ना जात? मामांनी विचारले.
''बघू,'' मी म्हटले.
मी अंथरूणावर पुन्हा पडलो. मला झोप लागली. गाढ झोप. जागा झालो तो एकदम सकाळीच. मी हौदावरून आंघोळ करून आलो, रामकडे केव्हा जायचे, त्याचा मी विचार करीत होतो. सायंकाळीच जावे, म्हणजे पोटभर बोलू, असे मनात ठरवले. मामाकडची ज्ञाने९वरी मी वाचीत बसलो. मामांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. शांती, एशी जेवून शाळेत गेल्या. मामा कचेरीत गेले. मी एकटाच घरी होतो.
थोडया वेळाने शांती व एशी घरी परत आल्या.
''का ग परतशा आल्यात?'' मामीने विचारले.
''सुट्टी झाली. कुणी तरी मोठं गेलं,'' शांती म्हणाली.
''अण्णासाहेब पटवर्धन वारले हो,'' वाडयात कोणी तरी सांगितले.
''हो का? मोठी अंत्ययात्रा निघेल त्यांची,'' बाई म्हणाल्या.
''मामा मागे ज्यांचं औषध घेत होते, तेच का हे अण्णासाहेब?'' मी विचारले.
''हो. तेच. दर गुरूवारी औषध सांगायचे. हजारो लोकांनी त्यांच्या वाडयााशी गर्दी असायची, साधू पुरूष होते,'' बाई म्हणाल्या.
मित्रांनो, अण्णासाहेब पटवर्धन लाकोत्तर पुरूष होऊन गेले. त्यांचे चरित्र फारच हृदयंगम आहे. अलौकिक बुध्दिमत्ता, अलोट देशाभिमान, महनीय महत्त्वाकांक्षा, थोर विरक्ती... सारे काही त्यांच्या चरित्रात आहे. तरूणपणी त्यांचे शरीर भीमासारखे होते! प्रोफेसर केरूनाना छत्रे त्यांचे आचार्य. एकदा केरूनानांचे डिंकाचे सारे लाडू अण्णासाहेबांनी मटकावले! केरूनानांना आश्चर्य वाटले. कोणा विद्यार्थ्याचा हान खान-विक्रम असवा बरे?
केरुनानांनी एक युक्ती केली. एक भले जाडजूड दोरखंड विद्यार्थ्यासमोर टाकून ते म्हणाले,
''हे मला कुणी हाताने तोडून दाखवा.'' ते दोरखंड कोण तोडणार? आण्णासाहेब अस्तन्या सारुन पुढे झाले. त्यांनी ते दोरखंड तोडले.
''तूच माझे डिंकाचे लाडू खाल्लेस! शाबास,'' केरुनाना म्हणाले.
एकाच वर्षी अण्णासाहेबांनी म्हणे तीन परीक्षा दिल्या. एम.ए. एल्एल् बी व डॉक्टर ते एकाच वर्षी झाले.त्याच्या बुध्दीला सीमा नव्हती. मेडिकल कॉलेजचे छापील नियतकालिक, सर्व लेख स्वत: लिहून सुरु केले आणि हिंदी विद्यार्थ्याच्या बुध्दीला हसणा-या युरोपियन प्रोफेसरला लाजवले.
निजामाच्या राज्यातून मोठा भाग विकत घ्यावा व तेथे स्वराज्य स्थापावे, असे अण्णासाहेबांचे उद्योग होते. एक कोट रुपये निजामाला द्यायचे ठरले. योजना बहुतेक ठरली; परंतु आयत्या वेळी काही तरी दगा झाला. जीवनातील एक थोर महत्वाकांचा मारली गेली. अण्णासाहेब विरक्त झाले.