मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ? प्रत्यक्ष परमेश्वरालाही मातृमहिमा पुरेसा नीट गाता येणार नाही. मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मौन अनंत असते. अनंत मातृमहिमा अनंत मौनानेच गावा. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही, तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले-खुपले, की ती कावरीबावरी होते. तिला मग अन्न रूचत नाही, झोप येत नाही. ती दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही. ती सारखी सेवाचाकरी करते. मुलाला वाईट म्हटलेले तिला कधी खपणार नाही. कितीही वाईट मूल असो; तिला ते सोन्याचे वाटते, तिला ते मंगल वाटते, पवित्र वाटते, गोड वाटते, सुंदर वाटते. सारे जग मुलाला लोटील; परंतु माता लोटणार नाही. आपल्या पंचप्राणांचे पांघरूण घालून, ती त्याला सांभाळील. स्वत:उपाशी राहून ती मुलाला वाढवील. स्वत:उघडी राहून ती मुलाला पांघरूण घालील. स्वत:मरून ती मुलाला जगवील.
आई! ह्या दोन अक्षरांत सा-या श्रुतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पाविन्नयाचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हांला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हांला मिळेल. सारी दैवते आईत येऊन गेली. आई हे दैवतांचे दैवत आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणत, ''मी एकच देव ओळखतो, आई हा माझा देव.'' 'आई!' अशी हाक मारून ते दुथडी भरलेल्या नदीत नि:शंकपणे उडी घेत आईच्या सेवेसाठी धावून जाता यावे, म्हणून वरिष्ठांचे हुकूम ते पायाखाली तुडवीत. आईच्या सेवेसाठी इतर सर्व सेवा दूर केल्या पाहिजेत.
आई! केवढी शक्ती आहे ह्या दोन अक्षरांत! युरोपखंडाला नमवणारा नरसिंह नेपोलियन आईसमोर नमत असे. नेपोलियनसमोर सा-या सम्राटांचे मुकुट वाकत; परंतु नेपोलियन आईच्या चरणी वाके. जगज्जेता आलेक्झांडर आईची आज्ञा वेदवाक्य मानी. हिंदुस्थानातल्या सा-या पातशाह्या हलवणारे श्रीशिवछत्रपती मातृचरणाची पूजा करून प्रतापी झाले. जो आईची पूजा करील, त्याची जग पूजा करील. आईबापांची सेवा करणा-या पुंडलिकासमोर प्रत्यक्ष परबह्म येऊन उभे राहात असे.
आई ह्या शब्दांत अपरंपार त्याग आहे. अनंत सेवा आहे. मुलाचे वैभव, हेच मातेचे वैभव. मुलाच्या सुखदु:खाशिवाय निराळे सुखदु:ख तिला नसते. बायकांच्या एका ओवीतील आईचे उद्गार ऐका:
धन ग संपदा। आग लागो त्या वस्तेला।
माझ्या बाळाच्या ग संग। उभी राहीन रस्त्याला।
मुलाशिवाय वैभव, हे मातेला वमनवत आहे. मुलाबरोबर रानावनातही ती आनंदाने राहील. मुलाबरोरब दारिद्य्रातही स्वर्ग मानील.
फ्रेंच भाषेत एक गोष्ट आहे. एका आईचा एकुलता एक मुलगा होता. त्या मुलावर तिचा सारा जीव, तिचा सार लोभ. परंतु तो मुलगा दुष्ट निघाला, तो व्यभिचारी बनला. तो आपल्या प्रियकरणीच्या घरी सदान्कदा पडलेला असायचा. त्याने सारे घर जसे धुऊन काढले! घरातील सारे प्रियकरणीच्या घरात त्याने भरले तरीही त्या प्रियकरणीचे समाधान झाले नाही.
''तुमचं माझ्यावर खरं प्रेम नाही, '' ती म्हणाली.
''काय करू म्हणजे तुझी खात्री पटेल,'' त्याने विचारले.
''तुमच्या आईचं काळीज कापून आणून दिलं तर,'' ती म्हणाली.