''असं वाटतं. त्या वेळेस नोट मोडावी लागली नाही. सुटा रुपया होता. नोटा मी पाहिल्या नाहीत,'' मी म्हटले.
''त्या गाडीवानानेही काढून घेतली असेल,'' तिसरा म्हणाला
''तो भला माणूस होता. गोड बोले, गोड वागे. त्याने मला दातण काढून दिलं फराळ करताना स्वत:जवळची चटणीसुध्दा त्याने मला दिली. मोठा प्रेमळ माणूस,'' मी म्हटले.
''त्याच्याजवळची चटणी! पहिला आश्चर्याने दोन पावले मागे सरकून म्हणाला.
''ती खाल्लीत? भाकरीही घेतलीत की काय?'' दुस-याने विचारले.
''नाही. मजजवळ भरपूर होती. त्याने प्रेमाने दिली असती, तर मी नाकारली नसती. चटणी-भाकर खायला काय हरकत? त्यात मांसमच्छी थोडंच आहे?'' मी सहज म्हटले.
''तुम्ही सुधारक दिसता? हे संस्थान पुराणमतवादी आहे. इथे शाळेत सर्वाना संध्या वगैरे येते ही नाही, ह्याचीही परीक्षा घेतात. बोर्डिंगात शिदोरी आणायला जाताना सोवळं नेसून, उघडयाने जावं लागतं. तुम्हांला जपून वागलं पाहिजे,'' तिसरा म्हणाला.
''परंतु मला बोर्डिंग मिळणारच नाही. मी संस्थानबाहेरचा आहे. नवीन नियम झाला आहे,'' मी म्हटले.
''मग इथे कसे राहाणार? हाताने करणार की काय?'' पहिल्याने विचारले.
''ते आता ठरवीन,'' मी खिन्नपणे म्हटले.
''दहा रुपये गेले. वाईट झालं, नीट पाहा,'' दुसरा म्हणाला.
''आमची झडती घ्यायची असली तरी घ्या,'' तिसर म्हणाला.
''तुम्ही कशाला घ्याल?'' मी म्हटले.
''अहो, तुमच्या मनात संशय यायचा?'' पहिला म्हणाला.
''गाडीवानबद्दलही जर माझ्या मनात संशय नाही, तर तुमच्याबद्दल संशय घेणं म्हणजे विद्येचा अपमान करण्यासारखं आहे,'' मी म्हटले.
''तुमचे मन किती चांगलं आहे!'' दुसरा म्हणाला.
''बोलता किती छान!'' तिसरा म्हणला.
''श्याम, दहा वाजले. मी बोर्डिग घेऊन येतो,'' तो म्हणाला.
''तुमच्या मित्राचे दहा रुपये चोरीला गेले,'' एकजण म्हणाला.
''होय रे श्याम?'' सखारामने विचारले.
''हो,'' मी म्हटले.
''केव्हा होते? केव्हा गेले?'' त्याने विचारले.
''केव्हा गेले हे मला काय माहित! आता पाहतो तो नाहीत. जाऊ देत ते आपले नव्हते तू जा बोर्डीग आणाला. शाळेला उशीर होईल,'' मी शांतपणे म्हटले.
''श्याम!'' सखारामने हाक मारली.
''काय?'' मी विचारले
''दुदैवी आहेत तू,'' तो म्हणाला.
''देवावर श्रध्दा ठेवणारा दुदैवी कसा असून शकेल? देव करतो ते ब-यासाठी. त्याला माझी परीक्षा घ्यायची आहे. इथे आलो, तर बोर्डिंग संस्थान बाहेरच्यांस बंद. इथे आलो, तर दहा रुपये गेले. येताना टोपी गेली. जे जे होईल ते थोडंच आहे. सखाराम, दहा गेले, पण पाच तर राहिले? नाव तर दाखल करता येईल? तेवढी फजिती तर वाचली? सारेच गेले असते, तर फीलाच पंचाईत पडली असती. जाऊ दे. कष्टी नको होऊ. जा तू'' मी म्हटले.