''मी काही थट्टेने हसत नाही. माझं हे भावभक्तीचं हसणं आहे. तुमचं बोलणं ऐकून माझं हृदय भरून येत आहे. भरलेल्या हृदयाचं हे हसणं आहे. मी आता जातो. शाळा सुरु होईल,'' मी म्हटले.
''माझ्या बटवीत खडीसाखरेचे दोन खडे आहेत, ते त्याला दे,'' म्हातारा म्हणाला.
''थांब रे श्याम'' म्हातारी बोलली.
''थांबलो आहे,'' मी हसून म्हटले.
म्हाता-या आजीने खडीसाखरेचे खडे आणून दिले. मी ते तोंडात टाकले. माझे तोंड गोड झाले. मी हसत हसत शाळेत गेलो.
'' सखाराम, हा घे तुला खडा,'' मी म्हटले.
''कसली रे खडीसाखर?'' त्याने विचारले.
''हाताने स्वयंपाक करु लागल्याबद्लची,'' मी म्हटले.
एक प्रकारचा नवीन उत्साही माझ्यात संचारला. वर्गातली उदाहरणे त्या दिवशी नीट समजली. मधल्या सुट्टीनंतरचे तास मोठया आनंदात गेले. माझे तोंड सारखे हसत होते. माझे डोळे आनंदाने नाचत होते. माझे हृदय आत नाचत होते. शाळा सुटल्यावर मी एकटाच फिरायला गेलो. दूर फिरायला गेलो. सर्वत्र हिरवे हिरवे दिसत होते. मन प्रसन्न होते, सृष्टी प्रसन्न होती. मी गाणी गुणगुणत होतो. मला माझ्या कविता आठवल्या. दापोली आठवली. राम आठवला. रामचे ब-याच दिवसात पत्र आले नव्हते. रामचा म्हाता-या आजीची सारी हकीकत लिहिण्याचे मी ठरवले. मला प्रेम द्यायला देव कोणाला ना कोणाला तरी पाठवतोच. मीही प्रेम पिणारा आहे. प्रेमाला झिडकारणारा मी नाही. अहंकाराने प्रेमाचा हात दूर लोटणारा मी नाही. प्रेम कोणीही देवो, मला ते प्रियच वाटते. प्रेमाचा पेला माझ्या ओठाला कोणीही लावो, मी तो आनंदाने पिऊन टाकतो. मला जात नाही, गोत नाही. प्रेम सदैव सोवळेच आहे. प्रेमाला दूर करणारे तेच ओवळे.
मी हिरव्या हिरव्या गवतावर बसलो होतो, माझ्या अंगावर मुंगळे चढत होते, त्यांना मी चढू देत होतो. मध्येच हलक्या हाताने त्यांना दूर करीत होतो; परंतु मी उगीगच त्यांना लकटीत होतो. त्या दिवशी तरी ते मला चावले नसते.
इतक्यात मोराच्या ओरडण्याचा उत्कट आवाज माझ्या कानावर आला. तो केकराव कानी पडताच मी उठलो. कोठे आहे मोर? मी पाहू लागलो. मी बघत बघत निघालो. मोर पाहाण्यासाठी डोळे अधीर झाले. मी भिरीभिरी हिंडत होतो. तो माझ्या डोळयांसमोर किती सुंदर दृश्य! हिरव्या हिरव्या रानात तेथे मोर होते. मोरांनी पिसारे उभारले हाते. भव्य दिव्य देखावा! काही मोर खाली होते. काही झाडांवर होते. मी दुरुन पाहात होतो.
माझ्या हृदयाचा पिसाराही आज उभारलेला होता. माझे मन आज पडलेले नव्हते. प्रेमाचे मेघ येऊन, त्यांनी माझ्या मनोमयूराला मत बनवले होते. आकाशातही मेघ जमा होत होते.अगदी पश्चिमेकडे जरी सूर्याच्या किरणांनी मेघ थोडेथोडे रंगले होते, तरी दुस-या बाजूला पावसाळी मेघ जमा होत होते. एकदम मेघगर्जना झाली. बिजलीही चमकली. मोर तन्मय होऊन नाचू लागले. सृष्टीतले ते सहजसुंदर नृत्य होते. मेघांचे वर मृंदुंग वाजत होते. खाली मोर नाचत होते. मी समोर उभा राहू पाहात होतो. पाहाता पाहाता मीही नाचू लागलो. टिप-यातील गाणी मी म्हणू लागलो-
शालू नेसून अंजिरी! कृष्ण वाजवी खंजिरी॥
किंवा
हरिगुण गाता अनंत रे । लिहावया घरणी न पुरे ॥
धिन्ना धिन्नक धिन्ना धिन् । गोफ गुंफू या धित्रा धिन्॥
वगैरे चरण मी गुणगुणू लागलो.