प्रेम द्यावे नि घ्यावे
रामच्या घरी मी आपण होऊन अनेक कामे करू लागलो. कृतज्ञता प्रगट करण्यासाठी मी अधीर असे. कोणतेही काम आनंदाने करायला मी सज्ज असे. मला सांगावे लागत नसे, हाक मारावी लागत नसे. मी आपण होऊन येऊन उभा राहात असे. ती अनेक कर्मे करताना मला अपार आनंद होई. मी पहाटे उठत असे. पाणी तापवण्याच्या चुलीत मी विस्तव पेटवी. पहाटे स्नान झाले, की मी देवाची पूजा करी. मंडईतून भाजी किंवा चक्कीतून दळण आणायचे असले, तरी मी तयार असे. घरी काही दळण-कांडण असले, तर मी आंनदाने हात लावायचा. संध्याकाळी बाहेर वाळत घातलेली सर्वांची चिरगुटे काढून, त्याच्या मी घडया घालून ठेवायचा. वरच्या खोल्यांचा केर स्वच्छ काढून, सर्वांची अंथरूणे घालून ठेवायचा. अशा प्रकारे मी कर्मात रमू लागलो. कधी त्रागा नाही, आदळ आपट नाही, रूसवा नाही, फुगवा नाही, श्याम शांत झाला होता.
रामची आई असडिक तांदूळ एकदम घेऊन ठेवी, ते घरी सडावे लागत. रामची आई तांदूळ सडू लागली व मुसळाचा घाव माझ्या कानावर पडला, की मी एकदम धावत जाई. रामच्या आईला मी हात लावी. राम व रामचा धाकटा भाऊ हेही मदतीला येत; परंतु मी त्यांना 'नको' म्हणत असे. माझ्या हातांना फोड येत. आत्याकडे पाणी खेचून बोटांना करकोचे पडत, त्याची आठवण येई. त्या फोडांचे मला कौतुक वाटे. माझ्या हाताला आता जेवण्याचा अधिकार आहे, असे मला वाटे.
''श्याम, बघू तुझे हात,'' राम माझ्या पाठीस लागे.
''हात रे काय सारखे बघतोस? आता काही मी उपाशी नसतो. बास का घ्यायचा आहे पुन्हा माझ्या हाताचा?'' मी हसत विचारले.
''पण दाखवलेस म्हणून काय झालं?'' तो पुन्हा म्हणाला.
शेवटी मी माझे फोड आलेले हात दाखवीत असे. माझे हात आपल्या हातांत घेऊन राम म्हणे, ''हे सारं आमच्यासाठी. श्याम, हाताला फोड आले तुझ्या.''
मी म्हणे, ''त्यात काय झालं? मला तुमच्याकडे मुळीच परकेपणा वाटत नाही. मानहानी वाटत नाही. तमुच्या घरी काम करण्यात मला आनंद वाटतो. माझ्या आईला नसे का मी दळू लागत? राम, श्याम कामाला कधीही कंटाळत नाही. फक्त कामाबरोबर त्याला प्रेमाची प्राप्ती झाली, म्हणजे झालं. तुमच्याकडे मला प्रेम मिळतं. आपलेपणा मिळतो. त्याचा उतराई मी कशाने होऊ? प्रेमाने मिळालेल्या एक शब्दाचं मोल करता येत नसतं, समजलास?''
तरीही राम माझे फोड कुरवाळीत म्हणाला, ''आमच्यासाठी तुला त्रास. रामसाठी तू सारं करतोस हो, श्याम!''
मी मंडईत ज्या दिवशी एकटा जात असे, त्या दिवशी माझे वर्तन जरा चमत्कारिक होत असे. मंडईतून भाजी आणताना मला संकोच वाटत असे. आपल्याबद्दल संशय तर नाही ना घेणार, असे माझ्या मनात येई. म्हणून मी उत्तमातली उत्तम भाजी घेऊन जात असे; पण भाव कमी सांगत असे. चांगली वांगी न्यायची; परंतु शिळया रद्दड वांग्यांचा भाव घरी सांगयचा. ह्यामुळे माझे नुकसाना होत असे. खिशात असलेले दोन-आणे ह्या आतबट्टयाच्या व्यवहारात मला घालावे लागत.
''श्याम मंडई चांगली करतो,'' रामची आई म्हणे.
''आमची पण भाजी आणीत जा रे श्याम,'' मथूताई म्हणत.
खिशातले पैसे देऊन ही स्तुती मला मिळवावी लागे आणि शेजारच्या मथूताईंच्या भाजीसाठीही आणखी पदरमोड करावी लागे. वार नसला, म्हणजे जे पैसे मला काही तरी घेऊन खाण्यासाठी उपयोगी पडत, त्यातले काही अशा रीतीने जात! भीड भिकेची बहीण म्हणतात, ते खोटे नाही. 'महाग आणलीस', 'वाईट आणलीस', 'फसलास' असे कोणी म्हणू नये, म्हणून ही सारी खटपट!