''श्याम, किती उशीर झाला तुला?'' रामची आई म्हणाली.
मला का उशीर झाला, ते मी कसे सांगणार? मी काही बोललो नाही.
माझ्या आईला आजारात फळ मिळाले नाही? त्या वेळेस मला माझी आई दिसे. आज मला लाखो आया अशा दिसत आहेत; आजारात दवा नाही, थंडीत पांघरायला पांघरूण नाही, पावसात निवारा नाही, उन्हात छाया नाही, प्यायला पाणी नाही, दुधाचा थेंब नाही, फळाचे दर्शन नाही, ज्ञानाचा गंध नाही, कलेचा स्पर्श नाही, सारे शून्य, अशी लाखो कुटुंबे ह्या देशात आहेत. एकीकडे मोठमोठया हवेल्यांतून मोठमोठया बागांतील रसाळ फळांचे करंडेच्या करंडे येत आहेत. दुसरीकडे विषमज्वरातही शिळया भाकरीचे तुकडे कोणी खात आहेत; एकीकडे विजेचे पंखे फिरत आहेत, दुसरीकडे उन्हाच्या झळा लागून लोक मरत आहे; एकीकडे रेडिओचे संगीत आहे, दुसरीकडे मरणाचा आक्रोश आहे; एकीकडे विलास आहे; दुसरीकडे विनाश आहे; एकीकडे स्वर्ग आहे; दुसरीकडे नरक आहे; असा हा भारतीय संसार आहे. माझ्या आईचे दु:ख ते कोटयावधी आयांचे दु:ख आहे. मी माझ्या आईला सुखी करू पाहात होतो. माझ्या आईला सुखी करणे म्हणजे कोटयावधी आयांना सुखी करणे.
ह्या लाखो कुटुंबांतली हायहाय दूर करायची असेल, तर सारी समाचरचना बदलावी लागेल. माणसाची किंमत वाढवावी लागेल. माणुसकीचा धर्म आणावा लागेल. खोटे धर्म तुडवावे लागतील. सारे दंभ जाळावे लागतील. धर्म! कोठे आहे धर्म! ज्या दिवशी जगातल्या एकूणएक मनुष्याला पोटभर खाता येईल, आनंदाने नीटशा घरात राहाता येईल, अंगभर नीट कपडा स्वाभिमानाने घालता येईल, थोडे-फार ज्ञान मिळवता येईल, थोडा-फार कलाविकास कराता येईल, त्या दिवशी जगात धर्माचा उष:काल होईल. त्या दिवशी दुनियेत धर्माचा अवतार झाला, असे म्हणता येईल. हा सोन्याचा दिवस जवळ आणण्यासाठी जे झटतील, झिजतील, तेच खरे संस्कृतिरक्षक, तेच खरे धार्मिक.
'आज जगात कोणी उपाशी नाही, उघडा नाही,' असे ज्या दिवशी रेडिओवरून सांगता येईल, तो सुदिन! केव्हा येईल तो? स्वत:च्या आईचे दु:ख विसरून, कोटयवधी आयांच्या दु:खात तुम्ही-आम्ही सारे समभागी होऊ तेव्हा. श्याम स्वत:च्या आईचे दु:ख आता विसरला आहे. लाखो लोकांच्या दु:खांचा परिहार करू पाहणा-या क्रांतीत अशक्त व आजारी असूनही तो शिरू पाहात आहे. लाखो लोकांच्या विकासाला विरोध करणारे सारे सैतानी पंथ व संघ पायाखाली तुडवण्यासाठी, आपल्या कृश, रूग्ण शरीराने; परंतु पेटलेल्या मनाने, श्याम उभा राहू पाहात आहे. आईचे दु:ख खरोखर मला समजले असेल, माझ्या आईची खरीखुरी पूजा करावी असे जर माझ्या मनात पूर्वी कधी येत असेल, तर ह्या अशा विराट क्रांतीतील सात्विक संतापाने पेटलेला एक सैनिक मी बनेन, शरीराने नाही बनता आले, तर मनाने तरी बनेन. खरा मातृभक्त असेन, तर असा वागेन, असे माझ्या हातून होवो, असा मला ध्यास लागेल. त्या महान क्रांतीत प्रत्यक्ष पडता न आले, तर निदान मी तिचे अभीष्ट तरी चिंतीन. त्या क्रांतीला यश चिंतीन. तिची गाणी गाईन व इतरांना ऐकवीन. तिचा जप करीत मरेन. मातृदेव श्याम, क्रांतिदेव झाला पाहिजे.
मी जर असे न करीन, तर खुशाल समजा, की श्यामचे आईसाठी ते मुळमुळू रडणे, म्हणजे केवळ दंभ होता. श्यामचे आईवरचे प्रेम म्हणजे एक वंचना होती. श्यामची आईवरची भक्ती म्हणजे एक भ्रांत कल्पना होती. श्याम व श्यामची आई, म्हणजे एक गोडसे मृगजळ होते.