सदानंदच्या मला सारख्या आठवणी येतात. येता-जाता त्याची हसरी मूर्ती डोळयांसमोर येते. अलीकडे तो किती स्वच्छ राहात असे. नखाला लागलेली इवलीही माती त्याला खपत नसे. नमस्कार घालीत असे. 'सारी गीता पाठ करीन', असं म्हणत होता. त्याची डायरी. किती सुंदर अक्षरात आहे ती लिहिलेली! स्दानंदाने लिहिलेला तो छोटासा ग्रंथच आहे. ती डायरी मी हातात घेत्ये व रडत्ये. त्या डायरीत सदानंद आहे.
सदानंद गेला, असं मला मुळी वाटतच नाही. वाटतं, की अजून येईल. परवा एक हुबेहुब त्याच्यासारखा मुलगा रस्त्यात मी पहिला. मला वाटलं, सदानंद आला. मी हाक मारली. तो मुलगा हसून पळून गेला. सदांनद परत न येण्यासाठी गेलाय असं माझं मन मग म्हणालं. परंतु स्मृतिरुप तर सदैव आपल्या हृदय-सदनात आहेत. त्याला हाक मारताच हृदयातून तो वर येईल नि अंत:चक्षूसमोर हसत उभा राहील. मृण्मय शरीर जातं; परंतु चिन्मय शरीर कोण नेणार?
श्याम, तुला मोठा धक्का बसेल, ह्यात संशय नाही; परंतु तुझ्या मावशीसाठी तरी शांत राहा, प्रकृतीला जप.
तुझी अभागी,
मावशी
मी ती तिन्ही पत्रे घेऊन घरी गेलो. वर्गात माझी पुस्तके होती; परंतु त्यांची मला आठवण राहिली नाही. मी माझ्या खोलीत ओक्साबोक्शी रडत होतो. मला पैसे पाठवता यावेत, म्हणून दूध नको म्हणणारा सदानंद, भाजी खाताना माझी आठवण करणारा सदानंद, 'अण्णा, शिकव रे नवीन ९लोक,' असा माझ्या पाठीस लागणारा सदानंद, कोठे गेला तो? काही कल्पना नाही, असे अकस्मात मरण आले? तो मरणार असे मला माहित असते, तर पुण्यास गेला, तेव्हा त्याला भेटून नसतो का आलो? मला काही सुचेना. मी सारखा रडत होतो.
शाळेतून मुले आली. सखाराम माझी पुस्तके घेऊन आला.
''श्याम, काय रे झालं?'' त्याने विचारले.
''माझा धाकटा भाऊ प्लेगने गेला,'' मी म्हटले.
तो समजूत काय घालणार? इतरही मित्र आले, गोविंदा आला, एकनाथ आला, मुजावर आला. उगी श्याम, रडू नकोस. आपला काय इलाज' वगैरे ते बोलत होते. मी शांत झालो. माझे मित्र जेवायला गेले. ते गेल्यावर मी उठलो व बाहेर पडलो. अनवाणी व बोडका मी बाहेर पडलो. मी फिरत फिरत दूर गेलो. एखादया झाडाखाली बसून, 'सदानंद, सदानंद' मी हाका मारीत सुटे.