आपले काळै मास्तर आहेत ना, त्यांचयाजवळ किल्या असतात,'' तो म्हणाला.
काळेमास्तर हे त्या वर्षी आलेले नवीनच शिक्षक होते. ते अगदी तरुण होते, वीस वर्षाचे असतील. ते गरिबीतून स्वकष्टाने शिकले होते. पुण्याला उन्हाळयाच्या सुट्टीत, लग्नसराईत, पाणी वगैरे भरण्याचेही काम ते करीत व फी पुरते पैसे जमवीत ! त्यांचे शिक्षण अद्याप पुरे झाले नव्हते; परंतुएक-दोन वर्षे नोकरी करुन, काही पैसे शिल्लक टाकून, ते पुन्हा पुढे शिकणार होते.
ते उत्कृष्ट शिक्षक होते. कोणताही विषय ते शिकवू शकत. त्यांचे ड्रॉईंगही सुंदर होते. ते शरीराने उंच होते. आम्हां विद्यार्थ्यांना ते प्रिय असत. शाळेच्या इमारतीतच एका खोलीत त्यांचे बि-हाड असे. एका गरीब विद्यार्थ्यांना ते प्रिय असते. शाळेच्या इमारतीतच एका खोलीत त्यांचे बि-हाड असे. एका गरीब विद्यार्थ्यालाही त्यांनी आपल्या खोलीत आश्रय दिला होता. गरिबांच्या अडचणी गरीबच ओळखू शकतात. त्यांनी जसा त्या विद्यार्थ्याला आपल्या खोलीत आसरा दिला, तशी ते आम्हांलाही वर्गात झोपायला परवानगी देतील, अशी मला खात्री वाटली.
गोविंदा व मी त्याच दिवशी काळेमास्तरांकडे गेलो. त्यांना आमचा विचार सांगितला. ''मला तर काहीच अडचण दिसत नाही,'' ते म्हणाले.
'' आम्ही आमची अंथरुणं तुमच्या खोलीत ठेवीत जाऊ,'' मी म्हणालो. '' सकाळी लवकर उठत जाऊ,'' मी म्हणालो. '' सकाळी लवकर उठत जाऊ. वर्गात घाणबीण करणार नाही. काही लिहिणाही नाही,'' गोविंदा म्हणाला.
त्या दिवशी रात्री आठच्या सुमारास मी माझी लहानशी वळकटी घेऊन शाळेत आलो. गोविंदा व त्याचा भाऊ बंडू हेही आले. त्यांचा कंदील होताच. आम्ही आमच्या वर्गाची खोली उघडली आणि तेथे अभ्यास करीत बसलो. थोडया दिवसांनी इंगळे नावाचा गावातलाच सातव्या इयत्तेतला एक विद्यार्थीही आमच्या ह्या योजनेत सामील झाला. आम्ही चौघेजण झालो. बंडू लहान होता. तो लवकर झोपी जाई. आम्ही तिघे मात्र बराच वेळ वाचीत बसत असू.
एखाद्या दिवशी इंगळे भुईमुगाच्या शिजवलेल्या शेंगा बरोबर घेऊन येत असे. मग आम्ही गॅलरीत बसत असू. दिवा त्या वेळेस ठेवीत नसू. शेंगा खात खात कधी कवितांच्या भेंडयाही लावीत असू. आमच्या भेंडया लावण्याच्या कार्यक्रमात एखाद दिवशी काळेमास्तरही सामील होत. मोठया आनंदात वेळ जात असे. काळेमास्तरांचा अभ्यासाच्या दृष्टीनेही उपयोग होई. इंग्रजी, गणित वगैरे विषयांतील आमच्या अडचणी ते दूर करीत. कधी कधी ते स्वत:चे निरनिराळे अनुभव सांगत. कधी सुंदर संस्कृत कविता, सुभाषित वगैरे ते म्हणून दाखवीत. अभ्यास कसा करावा, ह्याबद्दलही ते आपले विचार मांडीत. मधून मधून वाचनीय पुस्तकांची यादी देत, आमचा जणू तो आश्रमच झाला. शाळामातेच्या मांडीवर बसून आम्ही शिकत होतो. तिच्या मांडीवरच झोपत होतो. सकाळी काय तीन चार तास आमचे घरी जात असतील तेवढेच. बाकी दिवस-रात्र आम्ही शाळेतच असू.
खरोखर कितीतरी शाळांतून असे करता येईल. गरीब विद्यार्थ्यांना राहायला जागा मिळत नसते आणि शाळा-महाशाळांच्या प्रचंड इमारती उभ्या असतात! शेकडो विद्यार्थी शाळा-महाशाळांच्या अभ्यासाच्या वेळा- व्यातिरिक्त ह्या इमारतींतून राहू शकतील, रात्री निजू शकतील, अभ्यास करु शकतील, अर्थात व्यवस्थितपणे वागण्याची, नासधूस न करण्याची, घाण न करण्याची, काही वेडेवाकडे न करण्याचर, भांडाभांडी - मारामारी न करण्याची भिंती वगैरे कोठलयाही प्रकारे खराब न करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आपल्या शिरावर घेतली पाहिजे.
पुण्याला विद्यार्थ्यांची स्थिती पाहा. खाणावळीतून आणलेल्या एकेका डब्यामध्ये दोघे दोघे विद्यार्थी जेवतात. त्यांचे पोटही पुरे भरत नाही; परंतु त्यांना खोलीला महिना प्रत्येकी चार-चार रुपये द्यावे लागतात! ह्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय त्या प्रंचड इमारतीत सहज करता येईल; परंतु इच्छा हवी, तळमळ हवी, कळकळ हवी; गरिबांच्या जीवनाची स्वच्छ व स्पष्ट कल्पना हवी!