काही इंग्रजी पुस्तकेही येथे वाचली. स्माइल्स ह्या निंबधकाराची पुस्तके वाचली.त्याचे एक पुस्तक तर मला फारच आवडले. त्यातील उतारे मी पाठ करीत बसे. त्या पुस्तकाचे भाषांतर करीत बसे कॅरॅक्टर हे त्या पुस्तकाचे नाव. मराठीत त्याचा सारांशरूप् अनुवाद झालेला आहे. तसेच'हरी आणि त्रिंबक हे सुंदर मराठी पुस्तक, ज्या इंग्रजी पुस्तकाचे रूपांतर आहे, ते इंग्रजी पुस्तक मी वाचले. 'हिंदुस्तनाचा नागरकि' हे इंग्रजी पुस्तक वाचून काढले. मला जे जे उतारे आवडतात, ते ते मी लिहून काढीत असे. इंग्रजी खूप लिहून काढायचे मी ठरवले. आम्हांला इतिहासाचे इंग्रजी पुस्तक होते. त्यातील किती तरी भाग मी लिहून काढीत असे. माझे इंग्रजी त्यामुळे पुष्कळच सुधारले. प्रास-अनुप्रासयुक्त इंग्रजी शब्दांच्या जोडया जमवण्याचा मला त्या वेळी फारच नाद लागला. नाचणारी नदी. प्रचंड पर्वत तेजस्वी तारे, झुळझुळ झरा, गंभीर गर्जना हे जसे मराठी शब्द, तसे मी इंग्रजीत जमवीत बसे. त्यामुळै माझा वेळ केव्हाच निघून जाई.
मी ह्याप्रमाणे सुट्टी दवडीत होतो. सुट्टी संपली व शाळा सुरू झाली. लवकरच माझे 'शाकुंतला' वर व्याख्यान झाले. मुलांची खूप गर्दी होती. मी चांगले बोललो.
'' श्याम, तू इतकं धिटाईने बोलशीच, असं आम्हांला नव्हतं वाटलं,'' एकनाथ म्हणाला. ''अरे कित्येक तर तुझी फजितीच पाहायला आले होते.'' चावरे म्हणाले.
आम्हांला संस्कृत शिकवणा-या मास्तरांना मात्र माझ्या व्याख्यानाचे तितकेसे कौतुक वाटले नाही. औंधच्या इंग्रजी शाळेतही मोडी पुस्ती काढावी लागे. माझे मोडी अक्षर तितकेसे चांगले नव्हते. लहानपणी पहाटे उठून जरी मी खडर्े गिरवले होते, तरी अक्षर फारसे सुधारले नव्हते. आम्हांला संस्कृत शिकवणारे मास्तर आमची मोडी पुस्ती तपाशीत असत. मी माझी मोडी पुस्ती त्यांच्यापुढे केली, त्यांनी माझ्याकडे पाहिले.
'' शाकुंतलावर मारे व्याख्यान घायला हवं, पण मोडी अक्षर कुणी सुधारायचं? वर्गातलं करायचं नाही, पण उडया केवढया? शाकुंतल दूर ठेवून, जरा ,खडर्े साया,'' काहीशा त्राग्याने म्हणाले.
मला वाईट वाटले. ढेकळाप्रमाणे मी विरघळलो. गुरूच्या उत्तेजनपर एका शब्दानेही मूठभर मांस अंगावर चढते; परंतु त्याचा किती दुष्काळ असतो ! विघार्थ्याची मने आपल्या शब्दांनी मारली जात आहेत, की फुलवली जात आहेत, ह्या गोष्टीकडे शिक्षकांचे लक्ष नसते. वांद्रयाच्या कत्तलखान्यात लाखो गुरे मारली जात असतात. शाळांमधून लाखे मुलांची मने मारली जात असतात. शाळा म्हणजे सुध्दा भयंकर कत्तलखानेच असतात. ज्याप्रमाणे डोंबारी आपल्या चिमुकल्या मुलांच्या शरीरांचे लहानपणापासून हाल सुरू करतो, त्या शरीरांच्या स्वत:च्या इच्छेप्रमाणे वाटेल तशा घडया घालू बघतो, तसेच शिक्षकांचे असते. मुलांच्या मनांना एका ठराविक साच्यात ते घालू पाहात असतात. आदळ-आपट करतील. पण त्या साच्यात त्यांना बसवतील. परमेश्वराचा हा सर्वात घोर अपराध होय!
मी संस्कृत, मराठी, इंग्रजी वाचीत होतो; परंतु मजजवळ कोणतीही हस्तकला नव्हती. विघार्थ्याच्या वस्तुंचे प्रदर्शन भरणार होते. माझा मित्र एकनाथ सुंदर होल्डर करून नेणार होता. कोणी सुंदर चित्रे काढली होती. कोणी कागदी फुले केली होती, कोणी मातीची चित्रे बनवली. कोणी पत्र्याच्या लहान-लहान मोटारी केल्या; परंतु मी काय करणार? मला वाईट वाटत होते. मला माझी कीव आली.