''आणि सरकारी मोफत अन्न, म्हणजे तरी मिंघेपणाच नव्हे का? ते मिळेल ह्या आशेनंच ना तू आला होतास? त्याच्यापेक्षा माधुकरी शतपटींनी बरी. कुणावर जबरी नाही. तुकडा वाढा, वाढू नका,'' गोंविदा म्हणाला.

''गोविंदा, तुझी धन्य आहे,'' मी म्हटले.
''धन्य कसली?'' तो म्हणाला.

''अरे तू आपल्या धाकटया भावासाठी माधुकरी मागणार! तुला मोफत अन्न मिळत आहेच, परंतु तू भावासाठी हिंडून हिंडून माधुकरी मागणार. धाकटया भावाला माधुकरी मागायला पाठवण्याऐवजी, तू स्वत: जायला तयार होत आहेस! भावाबद्दल किती ही चिंता, किती प्रेम!'' मी म्हटले.

''भावावर प्रेम करणं, ह्यात जगाविरहित असं काय आहे? श्याम,तू नाही का आपल्या भावावर प्रेम करीत?'' त्याने विचारले.

माझ्या डोळयांसमोर माझे भाऊ आले. मावशीजवळ असलेला सर्वात धाकटा भाऊ सदानंद आठवला. त्याच्याहून मोठा पुरुषोत्तम आठवला. त्याला मी कोट कसा करुन नेला होता, ते आठवले. आईने मला ठेवलेले दही, मी भावाच्या भातावर कसा वाढायचा, ते मला आठवले माझ्यावर प्रेम करणारा मोठा भाऊ आठवला; होय. मीही माझ्या भावांवर प्रेम करीत होतो. ते माझ्यावर करीत होते. हा प्रेमाचा धडा शिकवणारी प्रेममूर्ती, कारुण्यमूर्ती आई आठवली. आईची स्मृती होताच मी सद्गदित झालो. मी एकदम हात जोडले.

''श्याम, सद्गदित होऊन कुणाला हात जोडलेस?'' गोविंदाने प्रेमाने विचारले.

''माझ्या आईला. एकमेकांवर प्रेम करा. जगावर प्रेम करा, गाई-गुरांवर, झाडा-माडावर, कु़त्र्या-मांजरावर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करा, असं मला शिकवणा-या माझ्या आईला मी प्रणाम केला. गोविंदा, माझी आई म्हणजे देवता आहे,'' मी सकंप स्वराने म्हटले.

''तशीच माझीही आहे. आईहून थोर कोण आहे?'' गोविंद म्हणाला.
''कोणी नाही,'' मी म्हटले.
''आईची सेवा करणं म्हणजे भावंडाची सेवा करणं,'' तो म्हणाला.

'' किती यथार्थ बोललास!'' मी म्हटले.

मित्रांनो, मागे एकदा रवींद्रनाथ ठाकुर म्हणाले होते,'' वंदे मातरम्' म्हणण्याऐवजी आता 'वंदे मातरम्' म्हणा,'' आपण वंदे मातरम् म्हणतो; परंतु सर्वाचा हेवादावा करतो. भारताला प्रणाम करु पाहतो; परंतु परप्रांतियास झिडकारीत असतो. आपण सगळे पोटाचे भक्त आहोत. मोठमोठयांसही ही प्रांतीयता टाळता येत नाही. तुरुंगात नेहमी गुजराती व महाराष्ट्रीय हयांची भांडणे असायची. महाराष्ट्रीय वाढणारा असला, म्हणजे तो महाराष्ट्रीयांना भाजी थोडी जास्त वाढायचा गुजराती असला तर गुजरात्यांना! तुरुंगातली ती क्षुद्रता पाहिली, मी मी रडकुंडीस येत असे. कसले राष्ट्रीय ऐक्य आणि कसले काय? जोपर्यत आर्थिक विषमता आहे. तोपर्यत जगात द्वेष राहणार. परस्पर मत्सर राहणार जगातील भेदाभेद, ही क्षुद्र जातीयतेच, प्रांतीयतेची भांडणे नष्ट करायची असतील तर साम्यवाद हा एकच उपाय आहे. भावंडावर प्रेम करा. भावंडावर प्रेम करायला आपण जोपर्यत शिकत नाही, तोपर्यत माता रडणार. मातेची पूजा म्हणजे भावंडाची पूजा देवाची पूजा म्हणजे प्राणिमात्रांवर आत्मीय भावनेने खरेखुरे प्रेम करणे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel