गाडी गावातून जात होती. गाडीत बोडके बसण्याची मला लाज वाटू लागली. मी एक पंचा डोक्याला बावळटासारखा गुंडाळला. माझ्या तोंडावर ना हास्य, ना जिज्ञासा, ना काही. एके ठिकाणी पत्ता विचारला. हळूहळू विचारीत आमच्या मुक्कामी गाडी आली. माझा दापोलीचा मित्र बाहेर आला. मी गाडीवानाला पैसे दिले, रामराम करुन तो निघून गेला. माझे सामान आत नेण्यात आले.
ती एक मोठीशी खोली होती. तीन-चार विद्यार्थी तेथ्रे होते. सर्वांचे सामान तेथे पडले होते. भिंतीशी वळकटी ठेवून मी बसलो.
''श्याम, तोंड अगदी उतरलेलंस दिसंत?'' सखाराम म्हणाला.
'' माझी टोपी वाटेत हरवली रे. मला आधी एक टोपी विकत घेऊन ये,'' मी म्हटले.
''बरं, आणू की तिस-या प्रहरी. आता तळयावर चल आधी आंघोळीला. भाकरी ठेवली आहे, ती खा. मग बोलू,'' सखाराम म्हणाला.
आम्ही दोघे तळयावर आंघोळीला गेलो. मला चांगलेसे पोहता येत नव्हते. मी पाय-यांवर उभे राहून स्नान केले. धोतर धुऊन घरी आलो. भाजी-भाकरी खाल्ली. भूक नव्हती. माझी भूक सारी उडून गेली होती. ताट वगैरे घासून मी वळकटी सोडून पडलो. मला झोप लागली!
तिस-या प्रहरी मी जागा झालो. तेथील एका मुलाची टोपी घालून मी बाजारात गेलो. टोपी विकत घेतली. घरी आलो.
''चल, फिरायला जाऊ,'' सखाराम म्हणाला.
'' चल.'' मी म्हटले.
आम्ही दोघे गावाबाहेर फिरायला गेलो नागफण मी प्रथमच जिकडेतिकडे बाभळीच्या वडांगी पाहिल्या.
''देशावरसुध्दा काटे आहेत.'' मी विचारले.
''अरे, काटे कुठे नाहीत! सगळीकडे काटे आहेत. काटयांशिवाय चालायचं नाही. जिथे काटे नसतील, तिथे काटेरी तारा आणतील. काटयांशिवाय माणसाला चैन पडत नाही,'' सखाराम हसत हसत म्हणाला.
''काटा सांभाळही करतो; परंतु पायातही बोचतो,'' मी म्हटले.
''वस्तूचा उपयोग करण्यावर आहे. तुम्ही पायात न घालाल, तर काटा काय करिल? बडांगीला काटयाचा उपयोग आहे. परंतु ते जर रस्त्यात टाकाल, तर तुमच्याच पायात ते घुसतील,'' सखाराम म्हणाला.
''प्रत्येक वस्तूत चांगुलपणा आहे. तो पाहिला पाहिजे, त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे,'' मी म्हटले.
''श्याम, विष्ठा रस्त्यावर पडली, तर ते विष आहे; परंतु तीच जर शेतात पडली, तर सोनं होतं!'' सखाराम म्हणाला.
''सर्वत्र मंगल आहे, असं साधुसंत म्हणतात, ते ह्याच अर्थाने नाही का?'' मी विचारले.
''श्याम, ते बघं कवठाचं झाड,'' सखारामने दाखविले.
''कवठ म्हणजे का फळ? आपण कोकणात कोंबडीच्या अंडयाला कवठ म्हणतो. दुपारी जेवताना त्या समोरच्या मुलाने'कवठाची चटणी हवी का?' असं मला विचारलं. मी त्याला 'नको' म्हटलं,'' मी हसत म्हणालो.
''ह्याला कवीट म्हणात. आंबट असतं हे फळ. पाडायचं का आपण?'' सखारामने माझा सल्ला विचारला.
''माझा नेम चांगला आहे. मी मारतो दगड,'' असे म्हणून मी दगड मारला व कवठ पाडले.
आम्ही ते कवठ फोडले व वानरांप्रमाणे खात निघालो.
''अरे मोर! झाडावर मोर!'' मी आश्चर्याने म्हटले.
''हं, इकडे पुष्कळ आहेत मोर,'' तो म्हणाला.
मी त्या मोरांकडे पाहात राहिलो. त्यांचे पिसारे पसरलेले नव्हते. ते खाली पडलेले होते. भावनांनी अंतरंग भरल्यावरच खाली पडलेले पिसारे उभारले जात असतील. मनुष्याचे मन पडलेले असते; परंतु भावना संचरताच हे मन विश्वाला भारी होते.