त्या वेळेस मी प्रथम लोकमान्यांना पाहिले. ज्यांचे नाव लहानपणापासून मी ऐकत होतो. त्यांना पाहिले. लोकमान्य बोलायला उभे राहिले. मी हात जोडून भक्तिभावाने उभा होतो. लोकमान्यांना पीत होतो. राष्ट्रसिंहाला हृदयात साठवित होतो. अण्णासाहेबांनी महिमा लोकमान्य गात होते. सदुरूची कीर्ती महान शिष्य वर्णीत होता. सायंकाळ झाली होती. सूर्य अस्ताला गेला होता. अस्तास गेलेल्या पुरूषसूर्याची पुण्यकथा लोकमान्यांच्या वेदोमुखातून आम्ही ऐकत होतो. त्या दिवशी मी कृतार्थ झालो. आईच्या सांगण्याप्रमाणे घरी राहिलो असतो, तर हे दिव्यदर्शन मला झाले नसते. महापुरूषाचे हे महाप्रस्थान पाहायला सापडले नसते. मला इकडे ओढून आणण्यात देवाची अपरंपार कृपाच होती म्हणायची् !
चंदन तुळशीकाष्ठे, कापूर हयांची ती चिता भडकली. पुण्यदेहाला स्पर्श करून अग्नी पवित्र झाला. ती चिता धडधड पेटत होती. मी तेथे वाळवंटात थरथरात उभा होतो. मी हात जोडले व म्हटले,'' ह्या जळलेल्या चितेत माझे सारे दोष जळून जावोत. देवा, मला निर्दोष कर, मला शुध्द कर. मला दुसरं काही एक नको.'' मी पुन्हा पुन्हा हे शब्द मनात म्हणत होतो. एका बाजूला सद्गदित होऊन मी तिष्ठत होतो.
लोकमान्य वगैरे निघाले. त्यांच्या पाठोपाठ मीही निघालो. मोठे लोक काय बोलतात, तसे चालतात ते पाहण्याची मला इच्छा होती.
स्थिरावला समाधीत । स्थितप्रज्ञ कसा असे।
कृष्णा! सांग कसा बोले ! कसा राहे, फिरे कसा॥
महापुरूषाचे वर्णन ऐकण्यापेक्षा त्यांचे जीवन प्रत्यश पाहायला मिळणे, म्हणजे केवढी कृतार्थता! लोकमान्यांबरोबर दहा-वीस मंडळी होती. ओंकारेश्वराच्या घाटात पाय-या चढून मंडळी जात होती.
''बळवंतरावजी, पाय-या जपून चढा हं,'' कोणीतरी म्हणाले.
''मी अजून उडया मारीत जाईन. मला घाबरवू नका,'' लोकमान्य म्हणाले.
मी ऐकत होतो. लोकमान्याच्या पाठोपाठ आल्याचे सार्थक झाले. त्यांची तेजस्वी वृत्ती पाहायला सापडली. उडया मारणा-या महान सिंहाची वीरवाणी ऐकली. मला त्या वेळेस इतर बोलणे चालणे आठवत नाही, पण ही दोन वाक्ये माझ्या कानात अघाप घुमत आहेत. उडया मारणा-या लोकमान्यांना राष्ट्र उडया कधी मारील, हाच एक त्यांना ध्यास होता!
मी एकटा घरी आलो. बरीच रात्र झाली होती. मामी माझी वाट पाहात होती. श्याम पुन्हा कोटे पळून तर नाही ना गेला, असेही तिच्या मनात येऊन गेले.
'' किती रे तुझी वाट बघायची? म्हटलं येतोस, की गेलास कुटे? तुझा काय नेम सांगावा?'' मामी म्हणोली.
'' अण्णासाहेबांच्या अंत्ययात्रेला गेलो होतो. लोकमान्याचं भाषण ऐकलं. हजारो लोक जमले होते,'' मी म्हटले.
'' दर्शन घेतलंस का रे ?'' शेजारच्या बाईंनी विचारले.
'' हो,'' म्हटले.
मामीने पान मांडले परंतु माझी तहान-भूक नाहीशी झाली होती. मला ती पेटलेली प्रचंड चिता दिसत होती. देवा मला निर्दोष कर. माझे दोष जाळ,'' असेच मी पुन्हा पुन्हा मनात म्हणत होतो. तो दिवस, ती सायंकाळ, तो चितेजवळ क्षण माझ्या जीवनात तेजस्वी ता-याप्रमाणे चमकत आहे.