एके दिवशी रामची आई मला म्हणाली, ''श्याम, तेवढं बेडपॅन टाकून ये हो मग.''
मी 'होय' म्हटले.
मी बेडपॅन एकदम उचलले आणि मोरीत नेऊन ओतले. मोरीत खडे पडले! बेडपॅन शौचासाठी देतात, हे मला कोठे माहीत होते? मोरी घाण झाली. मी तो सारा मळ पुन्हा बेडपॅनमध्ये भरला आणि संडासात नेऊन टाकला. मोरी धुऊन टाकली. माझ्या अज्ञानाची मला लाज वाटली. भंगीदादाचे मी केलेले ते पहिले काम! ते करताना मला काही एक वाटले नाही. हात कसे भरू, हे काम का करू, असे मनातही आले नाही. मोठया आनंदाने ते काम मी केले. ज्याप्रमाणे भेदाभेद माझ्या जीवनातच कमी, त्याप्रमाणे कोणतेही काम करण्यात मला कधीच काही अवघड वाटले नाही. सेवेचे कोणतेही काम करताना मला कधी कमीपणा वाटला नाही. माझ्यामध्ये अनंत दुर्गुण आहेत, परंतु दोन-चार गुणही सहजधर्म म्हणून जणू माझ्यात आले आहेत.
मला पैशाचा मोह नाही. खाण्यापिण्याची, नटण्यामुरडण्याची फारशी लालसा नाही, कोणतेही काम करण्यात कमीपणा वाटत नाही. उच्च-नीचपणाची भावना नाही. ह्या सर्वांच्या मुळाशी जाऊन पाहिले, तर माझ्या जीवनात व्यापक सहानुभूती आहे. ही व्यापक सहानुभूती म्हणजे माझा प्राण. ह्या एका गुणाच्या आधारावर मी जगत आहे. ह्या एका किरणाच्या योगाने माझे अंधारमय जीवन थोडेफार सुसहय झाले आहे.
''श्याम, बेडपॅन उचलायला तुला वाईट वाटत असेल?'' अनंतने विचारले.
''का बरं? मी ते सहज नेऊन टाकतो व स्वच्छ करून आणतो. मला काही वाटत नाही. उलट ते नीट स्वच्छ करून आणण्यात मला आनंद वाटतो,'' मी म्हटले.
''आपण नाही बुवा उचलणार. होता होई तो आपण टाळू,'' तो म्हणाला.
मालणच्या आजारीपणात मी चांगली सेवा केली. मला समाधान वाटत होते. ज्या घरात मला अपरंपार सहानुभूती मिळत होती. तेथे मीही उपयोगी पडत होतो. मी निरूपयोगी ठरलो नाही. माझी किंमत वाढली.
मालण बरी झाली. राम मला आता 'देव' म्हणून हाक मारी, मालण व रामचे धाकटे भाऊ मला 'स्वामी' म्हणत! आमच्या वाडयाचे मालकही मला 'स्वामी' म्हणत.
''मला श्याम म्हणा, स्वामी नका म्हणू,'' मालकांना मी म्हटले.
''का बरं? मुलं तुम्हांला स्वामी म्हणतात, आम्हीही म्हणू,'' ते थट्टेने म्हणाले.
''मुलांना म्हणू दे; परंतु मोठया माणसांनी म्हणू नये,'' मी पुन्हा म्हटले.
''आम्ही म्हणणार बुवा,'' ते म्हणाले व हसत निघून गेले.
रामचे धाकटे भाऊ व मालण मला पकडीत. शेजारची दुसरी लहान मुलेही त्यांच्या मदतीला येत. ती सारी मुले मला धरून ठेवीत व म्हणत,''स्वामींच्या पाया पडा,'' ''पडा सारीजण स्वामींच्या पाया.'' पाळीपाळीने ती सारी माझ्या पाया पडत व म्हणत, ''सोडा रे त्यांना आता.'' त्या मुलांचा होई खेळ व माझा जाई जीव!
आम्ही राहात होतो त्या जागेला, दुस-या मजल्याच्या वर, एक लहानसा पोटमाळा होता. त्या पोटमाळयाच्या जिन्यात मी कधी कधी एकटा जाऊन बसे. माझे ते अश्रुमंदिर होते. माझे डोळे तेथे मोकळे होत. माझे हृदय तेथे मोकळे होई.