'' दुसरं काय होतं?''

'' दुसरं काही नाही, मी एकच पदार्थ करतो व तो भरपूर खातो,'' मी म्हटले. बोलत बोलत आम्ही त्या सर्व पदार्थांच्या केव्हाच फन्ना उडवला. मग इतर गोष्टी बोलत बसलो. ''श्याम तुझं संस्कृत चागलं आहे. तू काय काय वाचलं आहेस?'' काळेने विचारले. ''तसं मी पुष्कळ वाचलं आहे. कालिदासाचं शाकुंतल, विक्रमोर्वशीयम् भर्तृहरीचं नीतिशतक व वैरागय शतक, रधुवंशातले काही सर्ग, बाणभट्टाच्या कादंबरीतला बराचसा भाग,'' मी म्हटले.

''बाणाची कादंबरी तर फार कठीण आहे म्हणतात,'' एक मित्र म्हणाला.
''एकदा  समासांची मांडणी समजली, म्हणजे मग कठीण नाही. संस्कृत शब्द सहसा मला अडत नाही. शिवाय खाली संस्कृत टीका असते. माझ्याजवळ सटीक कादंबरी आहे,'' मी म्हटले.
'' ही पुस्तकं तू का विकत घेतलीस?'' काळेने विचारले.

'' नाही. शाकुंतल माझ्या चुलत भावाने दिलं. बाणाची कादंबरी मी मामाकडून आणली. बाकीची पुस्तकं मावशीने दिली,'' मी म्हटले.
'' तुझी मावशी इतकी शिकलेली आहे वाटतं?'' मोदीने विचारले.
'' हो. ती कॉलेजातही होती. परंतु परिस्थितीमुळं शिकणं बंद करावं लागलं. आता इंग्रजी शाळेत शिकवते तिच्याजवळची पुस्तकं मी आणली आहेत,'' मी म्हटले.

''श्याम, तू आमच्या बरोबर संस्कृत वाचशील'' काळेने प्रश्न केला. ''हो. मोठया आनंदाने. बाणाची कांदबरी वाचू. मला ती फार आवडते. छोटया छोटया वाक्यांचे जिथे उतारे आहेत, तिथे तर फारच मौज वाटते,'' मी म्हटले.
'' श्याम, तुला आम्ही काय देऊ?'' एकाने म्हटले.
'' प्रेम, दुसरं काय?'' मी म्हटले.
''श्याम आहे कवी,'' मोदी म्हणाला.
''म्हण ना रे एखादी कविता,'' काळे म्हणाला.
मी पुढील श्लोक म्हटले:

सखा जिवाचा सकळां असावा!
तरीच लाभे हदया विसावा।
सखा सुधासिंधु सखा समस्त
कधी न त्याचा करि दूर हस्त॥
सखा जयाला सगळे तयाला
खरे समाधान तदंतराला।
सख्याविणे जीवन हे भयाण
सख्यास जोडा सगळे म्हणून॥

'' गोड आहेत श्लोक,'' मोदीने अभिप्राय दिला.
'' श्यामची कवितांची वही पाहिली पाहिजे,'' एकाने सुचवले.
'' आपण संस्कृत केव्हा वाचायचं?'' मी विचारले.
'' ते ठरवू,'' काळे म्हणाला.

'' मला तुम्ही बीजगणित थोडं सांगा. इथे बरंच पुढे गेलेलं आहे,'' मी भीतभीत म्हटले. '' मोठया आनंदाने. आपण 'एकमेकां साहाय्यक करुं,'' काळे म्हणाला.

'' एकमेकां साहाय्य करुं। अवघे धरुं सुपंथ ॥'' मी म्हटले.
'' तुला पुष्कळ पाठ येतं,'' मोदी म्हणाला.
'' माझ्या पटकन ध्यानात राहातं. मी कोकणात होतो ना, तिथे चांगले किर्तनकार येत. मी कथेला जायचा. एकदा एक असेच नामांकित कीर्तनकार आले होते. त्यांनी पूर्वरंगात म्हटलेले कितीतरी श्लोक मी दुस-या दिवशी शाळेत म्हणून दाखवायचा. सोपी सोपी सुभषितं असत ती,'' मी म्हटले.
'' म्हण की त्यांतला एखादा श्लोक,'' काळे म्हणाला.

पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवा:।
न पापफलमिच्छन्ति पापं कर्वन्ति यत्नत:।

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel