गांधीना रवींद्रनाथ होता येणार नाही, आपण रडून काय होणार? शेवटी अद्वैतातच आसरा आहे. जगात खाण्यापिण्याचे वैषम्य दूर करता येईल; परंतु चित्रकाराला गाणा-याचा जर हेवा वाटला, तर त्याच्यासाठी कोणता साम्यवाद आणायचा? झेडूंला जर गुलाबाचा हेवा वाटू लागला, तर काय करायचे? झेंडूला पूर्ण फुलायला अवसर देता येईल, गुलाबालाही वाव मिळेल; परंतू झेंडूचे वैशिष्टय गुलाबाला लाभणार नाही आणि झेंडूला गुलाब होता येणार नाही. गुलाबाने झेंडूला म्हणावे,''तू किती छान आहेस? ''तूही किती गोड आहेस?'' असे झेंडून म्हणवे. 'रामराम' म्हणून एकमेकास नमस्कार करावा. रामराम म्हणजे तूही राम व मीही राम. तूही गोड व मीही गोड.
आपणाजवळ काहीही नसले, तरी दुस-यांच्या गुणांचा गौरव करता येणे, हा तरी गुण असेल का? परंतू मला त्या वेळेस माझ्या उणीवा दिसत होत्या. मी रिकामे मडके आहे, निरुपयोगी वस्तू आहे, असे मला वाटले. माझ्या खोलीचे दार मी लावले. माझ्या खोलीचा मी तुरुंग केला. वा-यासाठी वेडा होणारा मी, दारे सताड उघडी ठेवून झोपू पाहणारा मी, त्या कोंदट खोलीत दार लावून बसलो. तेथे तेवत असलेला दिवा मला सहन झाला नाही. माझ्या निराशेने दाटलेल्या ह्दयाला त्या दिव्याच्या तेजाचा मत्सर वाटला. मी रागारागाने दिवा मालवला. खोलीत पूर्ण अंधार होता.
एक काजवा खोलीत केव्हा आला होता, कोणास माहीत? दिवा मालवताच तो आपली बिजली दाखवू लागला. चमचम करु लागला. तो काजवा मला चिडवतो आहे, असे मला वाटले. त्या काजव्याला धरुन चिरडावे. असे मला वाटले. मी त्याच्याकडे त्या अंधारात रागाने पाहात होतो. परंतु माझा क्रोध अकस्मात गेला. मी प्रेमाने त्या काजव्याकडे पाहू लागलो.
'अरे श्याम, माझा प्रकाश बघ किती थोडा; परंतु तेवढयाच जगाला मी देत आहे. स्वत:जवळ आहे ते द्यावं. उगीच आदळआपट का करावी! स्वत:ला जे काही देता येईल, ते मात्र दिल्याशिवाय राहू नकोस. वरती ईश्वराचे अनंत तारे चमकत असतात; परंतु आम्हीही आनंदाने झाडावर दिवाळी करीत असतो. एकदम आमचे दिवे लावतो, एकदम लपवतो. जणू आम्ही मशालीची कवाईत करीत असतो, खिन्न नको होऊ स्वत:जवळ जे गुणधर्म असतील, ते वाढव. जे स्वत:जवळ नसेल, त्याच्यासाठी प्रयत्न करावा; परंतु कष्टी होऊ नये.' काजवा का मला सांगत होता?
तो काजवा जणू माझा गुरु झाला. त्याला मारायला तडफडणारे माझे हात त्याला प्रणाम करु लागले. मी प्रेमाने त्या काजव्याजवळ गेलो. मी त्याला पकडले. माझ्या हातात त्याला धरले. माझ्या अंगातील सद-यावर त्याला सोडले. माझ्या हृदयावर तो चमकू लागला. माझ्या अंतरंगात तो दिवा लावू लागला.
मी माझे दार उघडले. खोलीत बाहेरचा वारा आला. माझ्या हृदयात नवजीवन आले. माझी सारी फजितीच नाही होणार. जगण्यासारखे माझ्यातही काही असेल. काही नसणे, हीसुध्दा एक महान वस्तू आहे. मुरलीत काही नसते, म्हणूनच कोणीतरी तिच्यातून सुंदर सूर काढतो. भांडे रिकामे असेल तरच भरेल. फक्त त्या रिकाम्या भांडयाने वाकले पाहिजे. खरे रिकामे भांडे वाकेलच. मी जर रिता असेन, तर मला नम्र होऊ दे. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. मी नम्र होईन, तर थोडे फार तरी काही माझ्या जीवनाच्या भांडयात शिरेल. माझी फजिती गेली. मी आशावंत झालो. मी अंथरुणावर पडलो. तो काजवा भिंतीवर गेला. त्याच्याकडे पाहत पाहात मी झोपी गेलो.