पोटाची फसवणूक
मी श्रीमंत नव्हतो. दरिद्य्रांतील दरिद्री होतो, आठवडयातून तीन दिवस माझे उपोषण होत असे. देहाला उपवास घडले, तरी मनाला उपवास घडू नयेत, बुध्दीला उपवास पडू नयेत, असे मला वाटे. माझा दादा व मावशी मला मधून मधून पैसे देत असत. फी देऊन, एक-दोन रूपये उरत असत. डाळे-मुरमुरे, पेरू वगैरे घेऊन खाण्यात त्यांतील काही पैसे जात. जे शिल्लक राहात, ते मी पुस्तकांत, कागदांत वगैरे खर्चीत असे.
पुण्याला जुना बाजार आठवडयातून दोन दिवस भरतो. बुधवारी व रविवारी हा बाजार भरत असतो. त्या जुन्या बाजारात मी हिंडत असे. मला काय घ्यायचे असे? त्या बाजारात शेकडो वस्तू असत. लष्करातील लोकांचे जुने कपडे राशीवारी तेथे विकायला येत. तांब्या-पितळेच्या भांडयांच्या राशी तेथे असत. पुष्कळ वेळा चोरीस गेलेला माल जुन्या बाजारात मिळत असे! मला कपडे घ्यायचे नसत, भांडी घ्यायची नसत.
मला धूळ खात पडलेल्या सुंदर व उदार पुस्तकांची भेट घ्यायची असे. जगातील महान महान ग्रंथकारांची पृथ्वीमोलाची पुस्तके तेथे धुळीत पडलेली असत. माणसाचा उध्दार करणारी पुस्तके तेथे मातीत लोळत असत.
येईल का कोणी, धरील का आम्हांला हातात, नेईल का घरी, घालील का कव्हर, पूजील का प्रेमाने, धरील का शिरी, धरील का हृदयी, असे ती पुस्तके मनात म्हणत असत. आशेने ती वाट बघत असत. अत्यंत उदात्त विचारांची पुस्तके, अत्यंत गचाळ विकारांच्या चोपडयांच्या शेजारी पडलेली दिसत. परमेश्वर पतितपावन आहे. तो पतितांचा तिरस्कार करणार नाही. संत असंताला पाहून पळून जाणार नाही. त्याच्या उध्दारार्थ ते झटतील. ती थोर पुस्तके तीच संतांची रीती आचरीत होती. त्या रद्दी पुस्तकांना आपला पवित्र स्पर्श ती करीत होती. कपाळाला आठया घालीत नव्हती.
जुनी पुस्तके विकणारे माझे देव होते. ते मला जगातल्या विचारवंतांची भेट घडवीत. मी त्या पुस्तकांजवळ प्रेमाने बसे. येणा-या-जाणा-यांनी वाटेल तशी पाहून, कशी तरी फेकून दिलेली, ती पुस्तके मी प्रेमाने नीट लावीत बसे. त्यांच्यावरची धूळ झाडून मी ती पुस्तके आदराने चाळीत बसे. चांगले पुस्तक दिसले, की मी ते वाचीत असे. थोडा वेळ वाचावे, पुन्हा ठेवावे, दुसरे एखादे घ्यावे, ते चाखावे. अनेक फुलांतील रस फुलपाखरू चाखते, त्याप्रमाणे मी बहुविध रस तेथे चाखीत असे. माझा मनोमिलिंद त्या पुस्तक-कमलांभोवती रूंजी घाली; रस पिऊन पुष्ट होई.
एकदा पुस्तक चाळताना 'बाळमित्र, भाग पहिला' हे पुस्तक मला मिळाले. लहानपणी जुन्या क्रमिक मराठी पुस्तकात 'मैना घ्या हो मैना' वगैरे सुंदर धडे होते. ते मी वाचलेले होते. ते धडे 'बाळमित्र' पुस्तकातले होते. मी ते पुस्तक तेथेच बसून वाचू लागलो. किती गोड, सहृदय आहे ते पुस्तक! ते मूळ फ्रेंच भाषेत आहे. सर्व भाषांतून त्या पुस्तकाची भाषांतरे झालेली आहेत. मुलांच्या मनाचा व बुध्दीचा विकास करू पाहाणारे ते पुस्तक, म्हणजे एक अप्रतिम रत्न आहे. त्यातील किनरीवाल्याची गोष्ट मी वाचीत होतो. मी आजूबाजूचे सारे विसरून गेलो.
त्या पुस्तकविक्याने मला हटकले, ''अहो, वाचीत काय बसता? घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर खाली ठेवा.''
मी म्हटले, ''वाचल्याशिवाय कसं घेऊ?''
तो म्हणाला, ''वाचल्यावर कोण कशाला घेईल?''?
मी त्याच्याजवळ वादविवाद करीत बसलो नाही. ते पुस्तक त्याने सांगितलेल्या किंमतीत मी विकत घेतले. 'बाळमित्र' पुस्तक कितीदा वाचले, तरी कंटाळा येत नाही. धुळयाच्या तुरूंगातील ग्रंथालयात पुन्हा पंधरा वर्षांनी 'बाळमित्र' पुस्तक मी वाचले. मी वाचले व इतरांनाही ते वाचायला लावले. जे पुस्त्क कितीदाही वाचले, तरी पुन्हा-पुन्हा वाचावेसे वाटते, तेच खरे पुस्तक. ज्याचा कधी वीट येत नाही. जे नेहमी नवीनच वाटते, तेच खरोखर सुंदर! 'क्षणं क्षणा यन्नवतामुपैति। तदेव रूपं रमणीयताया:॥ अशी सौंदर्याची व्याख्या आहे. 'बाळमित्र'सारखे सुंदर पुस्तक मराठीत कित्येक वर्षे दुर्मिळ आहे, हे मुलांचे दुर्भाग्य आहे. ते ज्या दिवशी सुंदर रीतीने छापले जाऊन, पुन्हा मुलाबाळांच्या हाती खेळू लागेल, तो सुदिन!