जिथे तिथे माय असे उभीच
मी हाताने स्वयंपाक करायचे ठरवले. माझ्याजवळ ताट होते. पुण्याहून येताना मी तवाही आणला होता. बाजारात एक-दोन चमचे घेतले. एक उलथणे घेतले. माझ्या खोलीत पूर्वीची चूल होतीच. औंधला कोळसे विकत मिळत ना. शेगडीवर स्वयंपाक करणे बरे असते. कोळशांचा फार धूरही होत नाही. थोडा खर्च मात्र जास्त येतो; परंतु तो बेत मला दूर ठेवावा लागला. मी जळण आणले, पीठ दळून आण्ले. तांदूळ महाग. त्यापेक्षा बेसन-भाकर हा कार्यक्रम बरा, असे मी योजले होते.
मी कोकणात पुष्कळ वेळा आईला स्वयंपाकात मदत करीत असे. आयते, आंबोळया वगैरे मला घालता येत असत. भात, भाजी येत असे; परंतु कोकणात भाकरीचा फारसा रिवाज नाही. त्यामुळे मी अद्याप भाकरी भाजली नव्हीत. मला भाकरी सहज साधेल, असे वाटत होते. मी चूल तर पेटवली. ज्वारीच्या पिठाला आधाणाचे पाणी असले, म्हणजे पीठ वळते, तेवढे मला माहीत होते. मी तव्यावर पाणी तापवले व पिठावर ओतले. मी पीठ मळले भाकरी थापू लागलो; परंतु मी ताटाला चिकटे. भाकरी मोकळया रीतीने ताटात फिरेना. मी पुन्हा पुन्हा भाकरी मोडीत होतो. खाली सारण घालून पुन्हा पुन्हा थापीत हातो; परंतु भाकरी फिरेना. मी कंटाळलो, मी चिडलो. मी ताट जोराने आपटले; परंतु अशी आदळ-अपाट करुन माझी अक्कल का वाढणार होती? पीठ मात्र फुकट गेले असते.
शेवटी मी तवा खाली उरतला. तव्यावरच ते पीठ भराभर थापले; परंतु आधी तेल वगैरे लावायला पाहिजे होते. तवा चुलीवर ठेवला. भाकरी उलथू लागलो. ती सुटेना. ती तव्याला घट्ट चिकटून बसली होती. मी तवा जोराने कोप-यात भिरकावून दिला. माझी सहनशीलता मला कळली. बरे झाले, त्या वेळेस तेथे कोणी नव्हते म्हणून. त्या वेळेस जर तेथे कोणी असते व ते मला हसते, तर त्याला मी कच्चे खाऊन टाकले असते.
लहानपणापासून मी फार रागीट होतो. मी माझा क्रोध कितीही संयत केला असला, तरी अजूनही मी भयंकर रागावतो, तसा मी आता फार रागवत नाही; परंतु एखादे वेळेस रागावलो व चिडलो, तर मी वाघाहून क्रूर होतो व लांडग्याहून भयंकर होतो.
मला एकदाची एक गोष्ट आठवते आहे. त्या वेळेस मी १९-२० वर्षाचा असेन. मुंबईस मोठया भावाकडे सुट्टीत आम्ही सारे भाऊ जमलो होतो. माझे काही मित्रही तेथे आले होते. रात्री आम्ही पत्यांनी खेळत होतो. माझ्यावर सारखी पिशी होती. माझा धाकटा भाऊ पुरुषोत्तम हसू लागला. तो जसजसा हसू लागला, तसतसा मी खिजू लागलो. शेवटी राग अनावर होऊन मी एकदम उठलो व धाकटया भावाला वर उचलले. त्याला मी जमिनीवर आपटणार होतो. त्या वेळेस माझ्या डोळयांत जणू सूडाचे रक्त होते. जमिनीवर आपटण्याऐवजी त्याला मी फेकले. कदाचित त्याला लाथही मारली असेल तो प्रसंग आठवला. म्हणजे मला अपार लज्जा वाटते. माझे डोळे भरुन येतात. तो माझा धाकटा भाऊ! त्याच्यावर मी किती प्रेम करीत होतो. त्या वेळेस तो फार मोठा नव्हता, असेल १२-१३ वर्षाचा. आईवेगळया त्या लहान भावाला मी पशूप्रमाणे जणू त्या वेळेस वागवले. त्या वेळी मी मनुष्य नव्हतोच, मी पशूच होतो. अजूनही असे माझे कधी कधी होते. एकदा आम्ही प्रचार करायला गेलो हातो. बरोबर ७-८ स्वयंसेवक होते. रस्त्यात आम्ही चर्चा करीत चाललो होतो. साम्यवादावर चर्चा होती. वाद वाढता वाढता मी खवळलो. एका स्वयंसेवकाला एकदम धरुन मी गदागदा हलविले! इतर स्वयंसेवकांना भीती वाटली. त्या नदीच्या वाळवंटात त्या स्वयंसेवकाच्या छातीवर मी बसतो की काय, असे त्यांना वाटले. माझा प्रेमळ अवतार सर्वानी पाहिला होता, परंतु हा क्रोधायमान नृसिंह अवतार त्यांनी पाहिला नव्हता. आपण पाहतो ते स्वप्न, की स्त्य, असे त्यांना वाटले. तुरुंगातही एकदा एका मित्रावर मी असाच रागवलो होतो. तो मित्र माझ्या चौपट होता, पण मी संतापाने त्याच्या तंगडया धरुन त्याला ओढू लागलो. त्याने एका बुक्कीने मला धुळीत मिळवले असते; परंतु श्यामला कसे मारायचे, असे त्याला वाटले. तो हसत होता. श्यामची त्याने खोडकी जिरवायला हवी होती.