त्या तुझ्या धाकटया भावाने शब्द ऐकून मला धन्य वाटलं. त्याला अजून आठ वर्षंही पुरी झाली नाहीत. आठ कुठली? हे सातवंच अजून चालू आहे; परंतु किती त्याला समजूत! कसं आहे त्याचं मन! किती तुझ्यावर प्रेम! तूच त्याला वाढवला आहेस. तुझा फार लळा. त्याच्या डायरीतील तुला उतारे हवेत ना? हे घे दोन-तीन
'मला पडसं आलं आहे. मावशीच्या मैत्रिणी मला हसल्या मी पळून गेलो. मी सू सू कधी करणार नाही.'
' आजाची भाजी चांगली झाली होती. आण्णाला आवडते. अण्णा तर औंधला. त्याला कोण देणार? अण्णा दिवाळीत येईल. हो येईलच. बोलवीनच त्याला.' ' आज नवीन पुस्तक वाचलं. चित्र कशी होती छान छान! मी पाटीवर तसं चित्र काढीत होतो. मावशी हसली माझं चित्र पाहून. मी रागावलो. आज घरंच पत्र आलं घरी खूप काकडया आहेत. आईला माझ्याशिवाय करमत नाही.'
'खेळाताना सदरा फाटला, मावशीने शिवून दिला. मी आज पावसात नाचत होतो. मावशी म्हणाली,' आजारी पडशील.' मी म्हटलं, फुलं नाही आजारी पडत ती?' मावशी एकदम हसली व मी तिला मिठी मारली,'
'गीतेचा अध्याय पाठ म्हटला, म्हणून मला बक्षीस मिळालं. माझं पहिलं बक्षीस अण्ण, दादा, अण्णा, सर्वांना दाखवीन,'
श्याम सदानंदची डायरी खरोखरच चांगली आहे. लहान ममुलाने ही लिहिली आहे. हे कुणाला खरंही वाटणाार नाही. सदांनद कुणी तरी मोठा होईल, असं आपलं कधी कधी मला वाटतं. म्हणून त्याला एखादे वेळेस जर मी रागावले, तर मागून मला वाईट वाटतं, मला लगेच रडू येतें. 'मावशी, तू का रडतेस?'' असं मग तो विचारतो. मी त्याला सांगते, 'तुला रागावल्ये म्हणून,' परंतु मी तर रडलोच नाही,' असं म्हणून तो मला हसवतो आणि म्हणतो कसा,'मी चांगलाच वागेन, म्हणजे तू रागवणार नाहीस नि रडणार पण नाहीस,''
श्याम, तू सांगितल्याप्रमाणे शिकवणी करायचं मी ठरवलं आहे. तुला महिना पाच रुपये मी आनंदाने पाठवीन. मित्राचे दहा रुपये तुला द्यायचे आहेत. तेही तुला पाठवत्ये. फार काळजी करू नकोस. सारं कळवीत जा. कळवलेलं बरं. तू हे सारं न कळवताच तर मला कसं कळतं? आज जेवताना सदानंद म्हणाला, मावशी आपण पोळी खात आहोत. अण्णा तर उपाशीच असेल तुझं नीट सुरळीत चालंल आहे, अस ऐकल्यावरच आता मला समाधान मिळेल. तोपर्यंत तुझी रोज काळजीच वाटणार तुझी आठवण पदोपदी येऊन वाईट वाटणार. म्हणून सारं वर्तमान लिहीत जा.