''मी वेडी होते तेव्हा. आता मी शहाणी झाले आहे.'' ती म्हणाली.
मीना गेली व भरपूर खादी घेऊन आली. खादीचे धोतर, खादीचे सदरे, खादीची बंडी, पांघरायला घोंगडी घेऊन आली. खादीची चादर, खादीचा अभ्रा घेऊन आली. तिने संन्याशाची खाट खादीमय केली.
''माझ्यासाठी खादी आणलीत; परंतु तुम्हाला नको का? स्त्रिया तर दयाळू असतात. गरीब बंधुभगिनींस ज्या खादीने घास मिळतो, ती खादी एक वेळ पुरुष नाही वापरणार, परंतु स्त्रिया तर आधी वापरतील. भारतातील स्त्रियांनी का आपली उदारता दूर फेकली आहे? मग सारं संपलं म्हणायचं.'' संन्यासी दुःखाने म्हणाला.
मीना उठून गेली. ती खादीचे पातळ नेसली. तिने खादीचे पोलके घातले. पवित्र व प्रशांत मीना संन्याशासमोर उभी राहिली.
''तुम्ही आता हिंदमातेसारख्या दिसत आहात. पवित्र पावन भारतमाता जणू माझ्यासमोर उभी आहे. मला तुमच्या पाया पडू दे.'' संन्यासी म्हणाला.
''मलाच तुमच्या चरणांवर डोकं ठेवून कृतार्थ होऊ दे.'' असे म्हणून मिनीने त्या तरुणाच्या पायांवर डोके ठेवले. या पायांवर डोळयांतील अश्रूंचे अर्ध्य दिले गेले. एकदा मिनीने विचारले,
''तुम्हाला घोडयावर बसता येतं?''
तो तरुण म्हणाला, ''नाही.''
''माझ्या घोडयावर बसून तर पाहा, तो पाडणार नाही.'' तिने आग्रह केला.
तो तरुण घोडयावर बसला. मिनी म्हणाली,''आता हाकला घोडा, हे घ्या दोर हातांत.''
''मला नाही येत हाकता.'' तो म्हणाला.
''मग मी हाकलू?'' असे म्हणून मिनी एकदम घोडयावर बसली. संन्याशाच्या पाठीमागे ती बसली. एका हाताने त्याला धरून एका हाताने तिने दोरी धरून घोडा पिटाळला.
''मिनी, आपण पडू, पडू.'' तो तरुण म्हणाला.
''त्या टेकडीवर चढू.'' ती म्हणाली.
इतक्या दिवसांत आज त्या तरुणाने एकदम 'मिने' अशी हाक मारली. त्या शब्दाने मिनीला स्फुरण चढले. शेवटी तिने घोडा माघारी आणला. दोघे खाली उतरली.
''मिने, तू वेडी आहेस. लोक काय म्हणतील?'' बाप म्हणाला.
''मला वेडीच होऊ दे. शहाणपणा-व्यवहारी शहाणपणा-चुलीत जाऊ दे.'' ती म्हणाली.