मुकुंदरावांनी ती डबी नीट ठेवली. निरोप घेऊन ते निघाले. किती तरी जणांचे हात त्यांनी हाती घेतले. जणू भारतातील प्रांताप्रांतातील किसान एकमेकांचे हात हाती घेत होते.
मुकुंदराव गंगायमुनांच्या प्रदेशात आले. खेडयांतून ते हिंडले. किसानांचा कसलाच हक्क नाही, कुळांना घर बांधायचा हक्क नाही. वाटेल तेव्हा जमीनदाराने त्यांना देशोधडीला लावावे. परंतु किसान आता जागृत होत होते. त्या एका खेडयात तर गोड अनुभव आला.
''हे माझं छोटं घर. पंडित जवाहरलालजींच्या हाती ते उघडलं. जणू किसानांचं भाग्यमंदिर, मोक्षमंदिर त्यांनी उघडलं. ते खरंच देव आहेत आमचे.'' त्या शेतकर्याने सांगितले.
''ते तेथे आले होते. तेथे उभं राहून बोलले इथली माती आम्ही अजून कपाळी लावतो. ही चैतन्य देणारी पदधूळ आहे.'' एक तरुण म्हणाला.
खेडयापाडयांतून आता संघटना आहेत. महान पुढारी येणार असला तर तरुण गावोगांव शिंगं फुंकून, ढोल वाजवून जाहीर करतात. सारी कामं फेकून हजारो, लाखो स्त्री-पुरुष, वृध्द-तरुण जमा होतात. आशेचा नवसंदेश ऐकतात,'' एक शेतकरी म्हणाला.
''स्त्रियाही जागृत आहेत का?'' मुकुंदरावांनी विचारले.
''हां. क्यों नही ! बालबच्चे साथ लेकर आती हैं, सुनती हैं.'' एकानं सांगितले.
मुकुंदराव कामगारांची काशी-जी कानपूर-तेथे आले. कशी वज्राप्रमाणे बळकट तेथील संघटना. कसे निर्भय ते वीर. कानपूर हिंदू-मुसलमानांच्या दंग्याचं कायमचं स्थान. परंतु येथेच पूज्य गणेश शंकर विद्यार्थी यांनी हिंदू-मुसलमानांच्या दंग्यात स्वतःचे बलिदान केलं. ''कानपुरात हे दंगे कोण माजवतं?''
''आमच्या कामगार-वस्तीत हिंदू-मुसलमान दंगा होत नाही. कानपुरात अन्यत्र वणवा भडकतो. कामगार वस्तीत शांती असते. उलट हिंदू-मुसलमान कामगार दंगा शांत करण्यासाठी आपले जीव धोक्यात घालतात.'' मुकुंदरावांस कामगारांनी सांगितले.
''खरा धर्म एक दिवस तुम्ही कामगारच द्याल, जागृत किसानच द्याल. कारण तुम्ही माणुसकीचा परम धर्म ओळखता.'' मुकुंदराव म्हणाले.
''आम्हाला धर्म शब्दही आवडेनासा झाला. धर्माच्या नावानं आमची पिळवणूक होत असते. धर्माचा आत्मा आम्हासही हवा. परंतु सर्वांना सुखी करणं हाच तो आत्मा. तो आत्मा आज परागंदा आहे.'' एक कामगार म्हणाला.
''तुम्ही तो आत्मा परत आणीत आहात.'' मुकुंदराव उद्गारले.
कानपुरातील हिंदू-मुस्लिम कामगार कार्यकर्त्यांच्या मुकुंदरावांनी भेटीगाठी घेतल्या, कामगारांची स्वयंसेवक दले त्यांनी पाहिली. त्यांची युनियन्स, त्यांची अभ्यासमंडळे सारे त्यांनी पाहिले. मुकुंदरावांना ते सारे पाहून आनंद झाला.
असा हा नवभारताचा यात्रेकरू फिरत होता, पाहात होता, ऐकत होता, भेटत होता, जागृत भारताचा परिचय करून घेत होता. पूर्वी काशीतील कावड रामेश्वरास नेत. आता कानपूरची कावड कलकत्त्यास नेली पाहिजे. कलकत्त्याची महाराष्ट्रात आणली पाहिजे. विशाल भारतात सर्वत्र एकत्र चैतन्य संचारले पाहिजे. सर्वांच्या हृदयाचे ठोके एकसाथ पडले पाहिजेत, तरच क्रांती होईल.