''ते तुझ्या हाती आहे.'' रामदास म्हणाला.
''रामदास, शांतेनं मजजवळ लग्न लावू नये. पुढचा जन्म असला तर त्या वेळेस आम्ही लावू लग्न. मला माझी भीती वाटते.'' मोहन म्हणाला.
''असल्या क्षुद्र गोष्टीवर तूही विश्वास ठेवतोस? वेडा ! अरे, मरण यावयाचं झालं म्हणजे येतं. तू काय करणार त्याला?'' रामदासने सांगितले.
''भाऊ, दयारामाच्या आश्रमात आमचं लग्न लावा. मुकुंदराव लग्न लावतील. आईला व बाबांनाही बोलाव. तू बोलावलंस तर ती येतील. मजवर त्यांचा राग आहे. कधी लावतोस आमचं लग्न? सांग, कोणता दिवस सोईस्कर?'' तिने विचारले.
''रंगपंचमी दोन दिशी आहे त्या दिवशी लावावं लग्न.'' रामदासने सुचविले.
''सुंदर मुहूर्त. रंगपंचमीच्या दिवशी शहाजी व जिजाई यांनी रंग उधळला. पुढं त्यांच्या पोटी प्रतापी शिवछत्रपती आले.'' शांता म्हणाली.
''आणि तुमच्या पोटी?'' रामदासने विचारले.
''माझ्या पोटी प्रतापी क्रांती येईल !'' शांता म्हणाली.
''शांतीच्या पोटी का क्रांती येते?'' रामदासने प्रश्न केला.
''शांतीच्या मार्गानं येणारी क्रांतीच शांती देणारी होईल. शांती म्हणजे निष्क्रियता नव्हे. शांती म्हणजे क्रांती करताना शांतपणे मरणे, अनत्याचारी मार्गानं क्रांती करणे.'' शांती म्हणाली.
''हो, क्रांतीची जननी हो.'' रामदास म्हणाला.
'क्रांतीची जननी होऊ पाहणारीनं संसारात पडू नये. तिनं मुक्त राहावं व इतरांस मुक्त करावे. मोहनच्या मोहात गुरफटलेली शांता क्रांतीची माता कशी होणार? ती मोहनचं दुखलेखुपलं पाहत बसेल. तिकडे कामगारांचा झगडा सुरू होईल व शांता मोहनचा हात हातात घेऊन बसेल. शांती, नको पडू या मोहात.'' मोहन म्हणाला.
''मोहात पडूनही मी मोहापासून दूर राहीन. जगात महान क्रान्तिकारक झाले, ते का एकटे होते? सर्वांनी लग्नं केली होती. त्यामुळेच ते अधिक खंबीर व गंभीर झाले. लग्नामुळे त्यांचे निश्चय चंचल न राहता अधिकच दृढ झाले. लग्न लागल्यामुळे ज्याला आपण निकामी झालो असं वाटतं, त्याच्या हातून तो एकटा असला तरीही काही झालं नसतं.'' शांता म्हणाली.
''शांते, आपण सारीच जाऊ या सोनखेडीला.'' रामदास म्हणाला.
''युनीयनचं काम कोण पाहील?'' मोहनने विचारले.
''दोन दिवस जाऊन येतो; काम करायला आणखी एक माणूस आणतो असं सांग म्हणजे झालं.'' रामदास म्हणाला.
''युनियनमध्ये जाऊन मी सांगून येईन.'' शांता म्हणाली.