शिवतरला मुकुंदराव व रामदास यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. सुंदर रथ सजविण्यात आला. त्याला केळीचे खांब बांधण्यात आले होते. तोरणे लावली होती. तिरंगी व लाल झेंडो झळकत होते. वाद्ये वाजत होती. लेझीम खुळखुळत होते, झणझणत होते. क्रांतीची गाणी म्हटली जात होती. इन्किलाबची गर्जना होत होती. 'दीनबंधू रामदास की जय !' असे जयजयकार होत होते. 'दीनबंधू रामदास झिंदाबाद !' अशाही गर्जना होत होत्या. वाटोवाट रथ थांबे; सुवासिनी येऊन ओवाळीत. रामदासाच्या कपाळी कुंकू लावीत. रामदास प्रणाम करी. रामदासाच्या घराशी रथ थांबला. त्याची आई त्याला ओवाळावयास आली. रामदासाने खाली उडी मारली. आईच्या पायांवर डोके ठेवले. दृष्ट पडू नये म्हणून आईने बोटे मोडली.
'उदंड आयुष्याचा हो !' मातेने आशीर्वाद दिला.
मिरवणुकीत बायकाही सामील झाल्या. गीता 'इन्किलाब झिंदाबाद' हे गाणे सांगत होती. इतक्यात दुसरी एक भगिनी निराळेच गाणे सांगू लागली. कोणी केले ते गाणे? कोणी रचले? गीतेच्या वर्गातील एका भगिनीनेच ते तयार केले होते. शेताभातात खपणार्या बाया क्रांतीची गाणी रचू लागल्या. धान्य निर्माण करणार्या वेद निर्मू लागल्या. ऐका तो वेद, ऐका ती किसानक्रांतीची ऋचा :
किसानांच्या बायका आम्ही शेतकरी बाया
नाही आम्ही राहणार आता दीनवाणी गाया ॥धृ.॥
सरकारला सांगू आम्ही
सावकाराला सांगू आम्ही
पोराबाळां हवे आमुच्या पोटभर खाया
पोटभर खाया ॥ नाही.॥
आजवरी खाल्ल्या लाथा
आता करू वर माथा
लुटारूंची दुनिया आता पडेल आमुच्या पाया
पडेल आमुच्या पाया ॥नाही.॥
उन्हाने शेतात मेलो
भुकेने घरात मेलो
क्रांती करू आता आम्ही मिळवू थोडी छाया
मिळवू थोडी छाया ॥नाही.॥