''असा जरा नीट वागू लाग. खादी घालून भिकार्‍यासारखा नको राहू. राजासारखा राहा. साहेबासारखा राहा. हॅट वगैरे घेऊन ये की. तुला दत्तक घेतला; पण भीती वाटू लागली होती. आता ठीक. ते मुकुंदराव येथून गेले, बरं झालं. सारी पोरं बिघडवीत होते. मामलेदाराचे मोठे उपकार झाले मुलांच्या आईबापांवर.'' गोविंदराव म्हणाले.

''मामलेदाराचे कसले उपकार?'' रामदासने विचारले.

''मामलेदारानेच त्या मास्तराचे पराक्रम वर कळविले. परवा सांगत होते ते.'' बापाने सांगितले.

''परंतु त्यांचा मुलगा वर्गात रडला.'' रामदास म्हणाला.

''मग पैसे हवेत ना? घे. नीट जपून जा. नाही तर खिसा कातरतील मुंबईचे भामटे. रस्त्यात रात्री गर्दीत भेटेल कोण व म्हणेल, 'ती बघ कशी वर चांदणी, तो बघ काय छान तारा' आणि आपण वर पाहू लागलो की इकडे खिसा सारा पसार होतो. समजलास ना?'' गोविंदराव समजावून सांगत होते.

पैसे घेऊन रामदास पहिल्या प्रवासाला निघाला. श्रीमंताची दिवाळी. परंतु गरिबांना काय? सोनखेडीच्या आयाबहिणी दिवाळीला घरी दोन पणत्या लावता याव्यात म्हणून रात्रंदिवस सूत कातीत होत्या. आसपासच्या गावाच्या पण कातीत होत्या. परंतु हे सूत विकत घेऊन दयाराम काय करणार?

दयाराम, हिरालाल, माणक, पार्थ व चुडामण आश्रमात बसले होते. आश्रमाचे ते पंचप्राण. दयाराम व माणक आसपासच्या गावांतून नेहमी हिंडत, कातायला शिकवीत, पिंजायला शिकवीत, सूत काढा म्हणून सांगत. पार्थ व चुडामण शिवणकाम करीत. गावातीलही दोन विणकर त्यांच्या बरोबर काम करायला येत. हिरालाल जमाखर्च व व्यवस्था पाही. खादीची ठाणे पडली होती. पैसे तर जवळ नव्हते. रात्री प्रार्थनेनंतर ते पाच मित्र आपसात बोलत होते.

हिरालाल : आता सूत घेणं बंद करा, पैसे कोठून द्यायचे?

पार्थ : दिवाळीसाठी आशेनं सूत आणतील त्यांची का निराशा करायची?

दयाराम : लेकी माहेरी येतील. त्यांना गोडधोड करून घातलं पाहिजे. म्हणून बायका रात्रंदिवस कातीत आहेत. सूत न घेऊ तर त्या हाय-हाय म्हणतील.

हिरालाल : ते सारं खरं. परंतु पैसे हवेत ना दयाराम?

चुडामण : मायबहिणीचे अश्रू आपल्याच्यानं पाहवणार नाहीत.

दयाराम : आशेची निराशा करणं महाकर्म कठीण.

पार्थ :
परंतु लोकांना कुठून द्यायचे पैसे? दरोडा का घालायचा आहे?

चुडामण : श्रीमंत लोकच डाके घालतात. दरोडा घालतात.

पार्थ : परंतु ते कायदेशीर असतात. आपले बेकायदेशीर ठरतील, हिंसक ठरतील.

दयाराम :
कष्टाळू गरिबांना उपाशी मारणं ही का हिंसा नव्हे? परंतु काय करायचं?

हिरालाल :
उद्या बाया येतील. त्यांना मी नको म्हणून सांगेन. मी कठोर होईन. मला झालंच पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel