''तू आधी तहशील भर म्हणजे बाकीचे भरतील.'' मामलेदार पाटलास म्हणाला.

''कोठून भरू साहेब?'' तो हात जोडून म्हणाला.

''ढोरे वीक, काही कर.'' साहेब संतापून बोलले. ठिकठिकाणच्या पाटलांनी गुरे-ढोरे विकून, कर्ज काढून आधी शेतसारे भरले. मग ते शेतकर्‍यांना तगादे लावू लागले; सर्वत्र हाहाःकार झाला.

''नका नेऊ दादा गाय. ती गाभण आहे. कोठून भरू शेतसारा? घरात मूठभर दाणे नाहीत बघ.'' तो शेतकरी हात जोडून म्हणाला.

''सरकारी कामात अडथळा करू नको. हो दूर. सोडा रे ती गाय. न्या हाकलीत.'' अधिकारी म्हणाले. गायीवर प्रेम करणारा तो शेतकरी गायीचे दावे सोडू देईना. सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून त्याला पकडण्यात आले. गाय नेण्यात आली. ती गाय पाऊल टाकीना. धन्याची बेअब्रू तिला सहन होईना. तिने शिंग मारले. मग काय विचारता? त्या गायीला हाणीत त्यांनी नेली. गाभण गाय वाटेत विऊन मरून पडली. मेलेले वासरू व मेलेली गाय तेथेच पडली !

गाय गेली. धन्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून खटला झाला. त्याला ५० रु. दंड व ४महिने शिक्षा ठोठावण्यात आली. घरी बायकोने डोके आपटले. मुले स्फुंदत आईला बिलगली. अरेरे !

सर्वत्र हेच प्रकार. जिकडे तिकडे या करुण कथा कानी येऊ लागल्या. एका शेतकर्‍याने बाजारात जाऊन आठ आण्यांचे दाणे आणले तर दुसर्‍या दिवशी त्याच्या घरावर तहशिलासाठी जप्ती.

''नाही दादा जवळ पैसे. आजपर्यंत सरकारचे दिले नाही का? पिकत नव्हतं, पिकलेलं नीट विकत नव्हतं, तरी भरले तहशील. यंदा उपाय हरला.'' तो म्हणाला.

''साहेब, याला घरी खाण्यासाठी दाणे आणायला आठ दाणे आहेत आणि तहशील भरायला पैसे नाहीत म्हणतो. लबाड आहे हा.'' पाटील म्हणाला.

''गुरे न्या जप्त करून.'' साहेब म्हणाले.

दुष्काळ आहे. सरकारला पटेना. कशाने पटवावे? मरणारे हजारो शेतकरी उपासमारीने मरतील, तेव्हा पटेल. सत्य स्वतःच्या मरणाने पटवावे लागते. त्या एका गावचे शेतकरी खायला नाहीत म्हणून उद्योग मिळेल या आशेने संगमनेरकडे निघाले. उसाच्या मळयातून काम मिळेल म्हणून गेले. परंतु तिकडे होती मरीआई. हे दुष्काळपिडीत किसान तेथे गेले. उपाशी राहत. शिळेपाके तुकडे खात. मरीआईनं त्यांना मिठी मारली. दोघे तिथेच मेले. बाकीचे परत फिरले; त्यांतील तिघे वाटेत मेले. गावात हकीगत सांगायला एक आला तोही मेला. सारे सुटले बिचारे.

लोक पोटासाठी गावे सोडून निघाले, तरी दुष्काळ आहे असे सरकारला पटेना. सरकारला पटवण्याचा एकच मार्ग आहे. शेतकर्‍याने मेल्यासारखे पडून राहू नये, उठावे असे सरकारला वाटत होते. आईला वाटते, मुलाने बोलावे, उभे रहावे, पदर ओढून मागावे, बावळटासारखे पडून राहू नये. ती खाऊ उंच धरते व रडक्या मुलाला ऊठ व घे म्हणते. सरकारची का अशी इच्छा होती? रडू नका, उठा व घ्या असे का सरकार सांगत होते?

मुकुंदराव सरकारी अधिकार्‍यांना जाऊन भेटले. परंतु तुम्ही खोटे लोक आहात, तुम्हांला दुसरे उद्योग नाहीत, अशा रितीने त्यांची संभावना करण्यात आली. मुकुंदराव शांतपणे माघारे आले. सारा भाग पेटवायचा. आता त्यांनी ठरविले. त्यांचे हृदय पेटले, भावना भडकली. त्यांचे डोळे निश्चयाने तळपू लागले. ''रडू नका, उठा, पेटा, निघा, गर्जना करा, झेंडे घ्या.'' ते सांगू लागले आणि पडलेला किसान उठू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel