2. दत्तविधान

गोविंदराव चव्हाणांचे मोठे खानदानी सरदार घराणे. मोठया थाटामाटात ते राहायचे. परंतु त्यांना औरस संतती नव्हती. ते एक दुःख होते. त्यामुळे ते कोणाला तरी दत्तक घेण्याचे मनात योजीत होते. त्यांचे एक जवळचे नातलग रामराव खेडयात राहत असत. रामरावांना दोन मुले होती. एक रामदास मुलगा व दुसरी शांता नावाची मुलगी. दोन्ही मुले शिकण्यासाठी गोविंदरावांकडेच राहत असत.

रामदास व शांता सुटी आली की, आपल्या खेडेगावास जात. तेथे त्यांच्या ओळखी होत्या. तेथील मुलांत खेळत. शेता-भातात भटकत. मोट चालवीत. रानात जात.

''रामदास, तू इंग्रजी शिकतोस. मग शेतात कशाला जातोस!'' बापाने विचारले.

''शिकणं म्हणजे का काम न करणं? जो शिकेल त्यानं तर अधिकच प्रेमानं काम केलं पाहिजे.'' रामदास म्हणाला.

''मला मोट हाकायला येते. बारी धरायला येते. मी शिकेन व शेतात काम करीन.'' शांता बोलली.

''शिकून सुखाची नोकरी मिळवावी. रामदासाला तर बाळासाहेब दत्तक घेणार आहेत. सारी इस्टेट मिळणार. शीक, साहेब हो. मोठी नोकरी लावून देतील. शांती पण शिकेल. कोणा बॅरिस्टरला मग देऊन टाकू. रामराव मनातील मनोरथ सांगू लागले.

''मला नको बॅरिस्टर. आमचे ते एक मास्तर परवा म्हणाले, ''बॅरिस्टर म्हणजे बालिशतर.'' शांता म्हणाली.

''म्हणजे काय?'' पित्याने विचारले.

''म्हणजे मूर्ख.'' शांता म्हणाली.

''वेडी आहात तुम्ही पोरं, रामदास स्वच्छ कपडे घालावे. नीट राहावे. गोविंदरावांना आवडेल असे करीत जा.'' रामराव म्हणाले.

''दत्तक जाणं म्हणजे लक्षाधीश होणं !'' बाप म्हणाला.

शेवटी रामदासला दत्तक घेण्याचे निश्चित ठरले. मुहूर्त ठरला. मोठा सोहळा झाला. शेकडो लोकांस आमंत्रणे गेली. सरकारी साहेब आले. सरदार-जहागिरदार आले, शेठ-सावकार आले. वकील-डॉक्टर आले. गाणी, नाच, तमाशे, पंगती, कशाला सीमा नव्हती. जणू इंद्रपुरीच चार दिवस खाली उतरली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel