२०. विद्यार्थी-संघ

कामगार संघटना व किसान संघटना देशात उभ्या राहू लागल्या. आता विद्यार्थी संघटनेची आवश्यकता होती. शहरातील कामगार व खेडयातील किसान यांना जोडणारा दुवा म्हणजे विद्यार्थी. लाखो विद्यार्थी हिंदुस्थानात शिकत आहेत. कारखाने गावोगांव नाहीत, परंतु शाळा हजारो ठिकाणी आहेत. प्राथमिक शाळा, दुय्यम शाळा, महाविद्यालये, सर्वत्र विद्यार्थ्यांची संघटना व्हावयास हवी. अमुक एक दिवस साजरा करण्याचे ठरले तर लाखो शाळांतील लाखो विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना स्फुरण चढले पाहिजे. त्यांची प्रचंड मिरवणूक निघाली पाहिजे. जयघोष व गाणी यांचा आवाज आकाशाला जाऊन भिडला पाहिजे. ही सारी लहानमोठी वानरसेना लंकेची होळी करावयास उठली पाहिजे. साम्राज्यवाद व पुंजीवाद यांची सोन्याची लंका किसानकामगाररूपी बिभीषणाच्या हवाली करावयास उठली पाहिजे.

आनंदमूर्तीस आता हे काम सांगावे असे मुकुंदरावांच्या मनात येत होते. आनंदमूर्ती मुकुंदरावांचा शब्द म्हणजे वेदवाक्य मानीत. आजपर्यंत ते खादी खपवीत होते. ऊन असो, पाऊस असो, त्या व्रतात त्यांनी खंड पडू दिला नाही. मुलांमध्ये ते प्रिय झाले होते. त्यांचे गोड बोलणे, गोड हसणे, सुंदर गाणी यांचा सर्वांवर जादूसारखा परिणाम होई. घोडयाजवळ उभे आहेत, सुंदर रुमाल बांधलेला आहे, अशा स्वरूपात त्यांचे किती तरी फोटो  लोकांनी घेतले. खादीचे त्यांनी लोकांना वेड लावले; कारण त्यांचे वेड लोकांना लागले होते. कधी खिशात खाऊ घेऊन जात व खेडयातील मुलांना वाटीत. कधी हिवतापाच्या गोळया बरोबर घेऊन जात. शांतेने काही काही औषधे त्यांना सांगितली होती. ती ते सांगत; लोकांना गुण येई. एखादे दिवशी एखाद्या गावी ते जात तर त्यांच्या पाया पडण्यासाठी बायामाणसे येत.

''माझ्या कशाला पाया पडता?'' ते कावरेबावरे होऊन म्हणत.

''तुमच्या औषधामुळे पोराला गुण आला.''' एखादी माता म्हणे.

''तुमच्या औषधाने बायकोला आता गोड वाटतं.'' दुसरा कोणी म्हणे.

''देवाची कृपा; त्याला आठवा.'' आनंदमूर्ती म्हणत.

''आमचे देव तुम्ही. ते एक दीनबंधू रामदास आहेत. दुसरे तुम्ही आलेले.'' कोणी म्हातारा म्हणे.

''आणि आम्हाला देवकळा देणारे मुकुंदराव, ते देवाचे देव-महादेव आहेत.'' आनंदमूर्ती म्हणत.

''खरं आहे. त्या मुकुंदरावाला सर्वांची काळजी.'' शेतकरी म्हणत.

''आनंदमूर्ती'' असं नाव त्या तरुणाला कामगारांनी दिले होते. कामगार त्यांच्याजवळ हौसेने शिकत. सूर्य आला म्हणजे अंधार जावा, दिवा येताच प्रकाश यावा, तसे आनंदमूर्ती दिसले म्हणजे सर्वांस होई. सर्वांच्या डोळयांतील चिंता, कपाळावरील आठया, ओठावरील अढी त्यांना पाहताच पळून जात.

आज सोनखेडीच्या आश्रमात मुकुंदरावांनी त्यांना बोलाविले होते. ते वाट पाहत होते. शेवटी ते उठले व मायेच्या घरी गेले. माया फुलझाडांना पाणी घालत होती.

''माया, आनंदमूर्ती नाही ना आले?'' मुकुंदरावांनी विचारले.

''येणार आहेत की काय?'' तिने विचारले.

''हो. परंतु वेळ तर झाली.'' ते म्हणाले.

''घोडा अडला असेल वाटेत.'' ती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel