''माझ्या मनात एक विचार आला आहे. कलकत्त्यास गुप्त पोलिसखात्यात एक बडा अधिकारी आहे. तो आमच्या शाळेत लहानपणी होता. मी बराच पुढे, तो मागे. तरीही आम्ही एकमेकांस ओळखीत असू. त्याला जाऊन भेटावं. बघावं काय होतं ते.''अक्षयबाबू म्हणाले.
''काही हरकत नाही. आजच निघू या.'' रमेशबाबू म्हणाले.
दोघे मित्र कलकत्त्यास आले. त्या बडया अधिकार्याच्या घरचा पत्ता मिळवून सायंकाळी ते त्या घरी गेले. त्यांनी घंटा वाजवली एक नोकर बाहेर आला.
''काय पाहिजे?'' त्याने विचारले.
''आनंदमोहनबाबू घरी आहेत का?''
''नाही ते नऊनंतर येतील. काही निरोप आहे का?''
''ते येईपर्यंत आम्ही येथेच थांबतो. मी त्यांचा जुना स्नेही आहे.'' अक्षयकुमारांनी सांगितले.
''मी आत विचारून येतो.'' असे म्हणून नोकर गेला व पुन्हा परत आला.
''बाईसाहेबांनी दिवाणखान्यात बसायला सांगितलं आहे.'' तो म्हणाला. दोघे मित्र आत येऊन बसले. तेथे मोठे टेबल होते. त्यावर कागदच कागद होते. वर्तमानपत्रे होती. रमेशबाबूंनी एक उचलले. रामदासच्या अटकेची त्यात हकीगत होती. ताबंडया पेन्सिलीच्या खुणा होत्या. इतक्यात बाईसाहेब बाहेर आल्या. आनंदमोहनांनी लग्न बरेच उशिरा केले होते. ''घरी यायला उशीर होईल. मुलं जेवत आहेत. जेवण व्हायचं असेल तर चला.'' त्यांनी सांगितले. अक्षयबाबूंनी जेवण वगैरे नको म्हणून सांगितले. ''तुम्ही यांचे जुने मित्र, कदाचित बरोबर जेवाल.'' असे जरा हसून त्या म्हणाल्या. परंतु हसण्याची त्यांना सवय नव्हती किंवा त्यांचे हसणे मारले गेले असावे.
इतक्यात मुलांचे भांडण आता सुरू झाले व माता ते सोडविण्यासाठी निघून गेली. मुले जेवून बाहेर आली. पाहुण्यांकडे निरखून पाहू लागली. नरेंद्र जरा धीट होता. तो रमेशबाबूंजवळ गेला.
''काय वाचता तुम्ही?'' त्याने विचारले.
''धरपकड वाचतो आहे.'' रमेशबाबू म्हणाले.
''महाराष्ट्रातील कोणी पकडला गेला आहे व त्याचं लग्न बंगाली मुलीजवळ लागलं होतं. का हो, बंगाली मुलगी तिकडे कशी गेली? ती का कट करायला गेली?'' त्याने विचारले.