''इस्टेटीसाठी आलास धावून.'' ती म्हणाली.
''आई, मी शपथ घेऊन सांगतो, या इस्टेटीचा मला मोह नाही.'' तो म्हणाला.
''पाहीन पुढे.'' ती म्हणाली.
पित्याने डोळे उघडले. त्याला काही तरी बोलायचे होते.
''रामदास, हिला महिन्याला २५ रुपये देत जा. हो म्हण.'' गोविंदराव म्हणाले.
''तुमची इच्छा प्रमाण.'' तो म्हणाला.
''शब्दांचा काय भरवसा?'' ती म्हणाली.
''मग काय करू आई?'' रामदासने विचारले.
''लेखी असेल तर थोडी शाश्वती.'' ती म्हणाली.
''आसन्नमरण पित्याजवळ दिलेला शब्द का मी पाळणार नाही?'' त्याने दुःखाने विचारले.
''सारी इस्टेट तू घालवणार; मला कोठून देणार २५ रुपये? मघा तो गणबा आला होता तर त्याची प्रॉमिसरी फाडून टाकलीस.'' आई म्हणाली.
''काय, प्रॉमिसरी फाडलीस?'' एकदम उठून गोविंदरावांनी विचारले.
''बाबा, शांत पडून राहा.'' रामदासने त्यांना निजवले.
''कसा शांत पडू? ते प्रॉमिसरीचे पुडके येथे आण. माझ्या उशाशी ठेव. तू हे फाडून टाकशील. वाटोळं करणार सार्या इस्टेटीचं.'' बाप म्हणाला.
श्रमाने पित्याला पुन्हा ग्लानी आली. पत्नी तेथून उठून गेली. रामदास बसला होता. कोणी समाचाराला येत होते, मान हालवून जात होते.
''आणलंस पुडकं? कोठे आहे?'' पित्याने विचारले.
''राम-राम, राम-राम'' रामदास म्हणू लागला.
''दाम म्हणजे माझा राम. आण ते पुडकं.'' पिता ओरडला.
''ते का तुमच्याबरोबर तुम्हाला न्यायचं आहे बाबा?'' रामदासाने दुःखसंतापाने विचारले.
''हो, न्यायचे आहे. स्वर्गात फिर्याद लावीन. मेल्यावर तेथे येतील सारे. विचारीन त्यांना दिलेत का पैसे?'' बाप म्हणाला.
''बाबा, ते पुडके तुमच्याबरोबर मी देईन.'' गंभीरपणे रामदास म्हणाला. गोविंदरावांचा क्षण जवळ आला. रामदास तेथे गीता म्हणत होता.
''शेवटची इच्छा विचार.'' कोणी सांगितले.
''काही सांगासवरायचे नाही ना? व्यवहार असतात !'' दुसरा कोणी म्हणाला.
''पैसे ठेवले असतील पुरून; रामदास विचारून घेतलेस का?'' तिसरा म्हणाला.
रामदास राम-राम म्हणत होता.