''तू आणखी पैसे दिलेस तर मात्र नरकात जाशील. दुसर्याची चैन चालविणं म्हणजेही पाप आहे. आळशी लोकांना पोसणं म्हणजे अधर्म. गणबा, स्वर्गनरकाच्या कल्पना आता बदला. आता तुम्ही जरा विचार करायला लागा. आपल्या दुबळेपणानं आपण दुष्टांना अन्याय करावयास प्रवृत्त करतो. त्यामुळे त्या अन्यायात आपणही भागीदार होतो. ईश्वर विचारील, ''त्या पाप्याने तुझ्याजवळ अन्याय्य पैसे मागितले, परंतु तू का दिलेस? तुझा आत्मा कोठे गेला होता? तू शांतपणे का प्रतिकार केला नाहीस?'' जा, गणबा तू मुक्त आहेस. तुझ्या आजारी बायकोला सांग, मुलांना सांग की, आता आपण पिकवू ते आपणास खाण्याचा अधिकार आहे. हे ऐकून त्यांचा आजार जाईल. जा.'' रामदास म्हणाला.
''तुम्ही का आजच मालक झालेत?'' मुनिमजींनी विचारले.
''बाबा आजारी आहेत. मग मला नको का पाहायला व्यवहार? त्यांना का ऐकवू या कटकटी. त्यांना रामराम म्हणू दे.'' रामदास म्हणाला.
''पित्याने 'राम' म्हणावे अशी इच्छा करणारा स्वर्गातच जाईल वाटतं?'' मुनीमजी म्हणाले.
''पिता 'राम' म्हणणार आहे हे निश्चित. ते माझ्या इच्छेवर नाही, तुमच्या नाही. आता मरताना गरिबांचे त्यांना आशीर्वाद मिळू देत, म्हणजे ते आशीर्वाद त्यांना देवाजवळ घेऊन जातील. मरणोन्मुख वडिलांना कष्टाळू बंधु-भगिनींचे आशीर्वाद मिळवून देणारा तोच खरा सत्पुत्र.'' रामदास म्हणाला.
''हाच का व्यवहार? असाच का पुढे कारभार चालणार?'' मुनीमजींनी विचारले.
''असाच सचोटीचा कारभार.'' रामदास म्हणाला.
''मग कारभार लवकरच संपेल. अशा कारभाराला नको मुनिमजी, नको कोर्टकचेरी.'' मुनिमजी म्हणाले.
''मालक घाबरले आहेत. चला लवकर.'' गडयाने येऊन सांगितले.
मुनिमजी निघून गेले. रामदास घरात आला. तो पुन्हा पित्याच्या उशाशी बसला. त्याने हळूहळू वारा घातला. छातीवर हात फिरवला. पिता जरा शांत झाला. डोळे मिटलेले होते. मधून ओठ जरा हालत. गोविंदरावांची पत्नीही जवळ होती. ती सचिंत दिसत होती.
''आई, तू काळजी नको करू. मी आहे.'' रामदास हळुवारपणे म्हणाला.
''तू असून नसल्यासारखा. सख्खा मुलगा थोडास आहेस तू?'' पोटचा गोळाही हल्ली विचारीत नाही, परका किती विचारणार?'' ती म्हणाली.
''मी परक्यासारखा वागतो का? बाबांची तार मिळताच नाही का आलो?'' त्याने विचारले.