जे तुज मारतिल मरतील, निजपापे पडतील
रडतिल जरि, हट्ट धरितील, युगधर्म न भजतील ॥जो.॥

सफल जगामधले, श्रमणारे, करितील तव हांकारे
क्रांती क्रांती असा, जयनाद, उठतिल शत पडसाद ॥जो.॥


साम्राज्ये गाडी, तू मोडी, दुष्ट नष्ट त्या रूढी
बंधन बुध्दीचे, तू मोडी, ज्ञानविकासा जोडी ॥जो.॥

ने अन्नज्ञान, घरोघरी, सकल-जन-विकास करी
उद्योगी लाव, सर्व जन, कोणि नसो श्रमहीन ॥जो.॥

वाढव तू जगती, श्रम-महिमा, श्रमुनी चित्मुख निर्मा
सांग असे जगता, दे हाता, मजुर करो वर माथा ॥जो.॥

होशिल तू मोठी, हे क्रांती, दूर लुटारू लोटी
सकल श्रमि-दुनिया, धरि पोटी, घाली अमृत ओठी ॥जो.॥

घे मत्प्राण सखे, तू हांसे, त्रिभुवन भर निजवासे
श्रमिजन राज्य करी, अवनिवरी, सत्सुख सकला वितरी ॥ जो.॥


मोहन एकेक कडवे थांबून थांबून म्हणत होता. एकेका कडव्याबरोबर त्याची प्राणशक्ती कमी होत होती. आपल्या जीवनरसात बुडवून एकेक कडवे तो जगाला देत होता. आवाज खोल खोल जात होता. शेवटच्या कडव्यात मोहनने, आपले उरले-सुरले प्राण क्रांतीला अर्पण केले. त्याने शांतीकडे अनंत अर्थाने, अनंत भावनेने, अनंत प्रेमाने बघत शांतपणे डोळे मिटले. ''क्रां-ती, शां-ती'' हे त्याचे शेवटचे शब्द !

पाळण्यात चिमुकली क्रांती हसू खेळू लागली. पाय हालवू लागली. मोहनची सारी हालचाल थांबली होती. थकलाभागला मोहन अनंत निद्रेशी एकरूप झाला होता, अनंत चैतन्याशी एकरूप झाला होता?

''मोहन !'' एकच हाक शांतेने मोहनला मिठी मारून मारली. तिने डोळयांच्या घडयातील पाण्याने मोहनला शेवटचे स्नान घातले. क्रांतीला मांडीवर घेऊन शांता तेथे गंभीर व खिन्न स्थितीत डोळे मिटून बसली. गीता गीताईतील श्लोक म्हणत होती. शांता मोहनच्या अंगावर पडली. गीतेचा गीताईचा पाठ डोळे मिटून चाललाच होता. सारे काम डोळे मिटून शांतपणे चालले होते.

तिकडे रात्री प्रचंड सभा चालली होती. मालक लोक दूरच्या गावाहून मोटार लॉर्‍या भरून हजारो मजूर आणीत होते. त्या लॉर्‍या उद्या यावयाच्या होत्या. मुकुंदराव शांत रहा, उद्या कसोटी आहे, असे सांगत होते. ते म्हणाले, ''मोहनची शाश्वती नाही. उद्या  उजाडण्याच्या आत प्रिय मोहनचे कदाचित प्राण देवाघरी उडून जातील. त्याचा शेवटचा संदेश शांत राहा असे आहे. उद्या परप्रांतीय मजुरांच्या लॉर्‍या आल्या तर त्यांच्यासमोर आधी मी उभा राहीन. माझ्या अंगावर जाऊ दे लॉरी. माझ्या रक्तानं ती लॉरी नाही थांबली तर आनंदमूर्ती तिच्यापुढे पडतील व आपल्या प्राणांनी अडवू बघतील. तरीही न थांबली तर? दयाराम पुढे येईल व बलिदान करील. तरीही न थांबली तर? अहमद पुढे येईल व आडवा पडेल. पाचवा बळी पार्थाचा. उद्याचे हे पाच बळी आम्ही निश्चित केले आहेत. हत्यारी पोलीस उद्या फिरत राहतील? बंदुका जिकडे तिकडे दिसतील. शांत राहा. मोहनचा संदेश म्हणजे आपणास आज्ञा. अनंताकडे जाणार्‍याची आज्ञा कोण मानणार नाही? सारे शांत राहणार ना?'' हजारो कामगार स्त्री-पुरुषांनी 'हो' म्हणून उंच हात केले. इन्किलाब होऊन सभा गंभीरपणे संपली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel