२८. चिर-मीलन
दवाखान्यातील एका प्रशांत दालनात दोन खाटा होत्या. एकीवर मुकुंदराव होते. दुसरीवर कोण आहे ते? हे आनंदमूर्ती नव्हते. कोण आहे ते? ''मरणाच्या दारी आपण आहो. आताही या गरीब मीनेकडे नाही का पाहणार? मरताना तरी आपलं लग्न लागू दे. जे जीवनानं झालं नाही ते मरणानं होऊ दे. मंगल मरण. रामदास, त्यांना माझ्याकडे तोंड करायला सांगा. त्यांना वळवत नसेल तर माझी खाट उचलून तिकडच्या बाजूला न्या. मी त्यांच्याकडे वळून बघेन.'' मीना डोळयात पाणी आणून म्हणाली.
रामदास तेथे रडत होता. काय करील बिचारा?
''तुम्ही वळता का त्या बाजूला? नका निष्ठुर होऊ. मरताना सर्वांनी मृदु व्हावं. मुकुंदराव, मी तुम्हाला सांगावं असं नाही. मीनाबाईंची इच्छा पूर्ण करा. मरताना तरी त्यांच्याकडे मीना म्हणून बघा. त्यांचा हात हातात घ्या. वळवू का कुशीवर?'' रामदासने विचारले.
''नको रामदास. आता सर्व लक्ष देवाकडे वळू दे. बाकीचे सारे विचार, सारे विकार गळू देत.'' मुकुंदराव म्हणाले.
रामदास, दयाराम, अहमद तेथे बसले होते; इतक्यात रामदासला भेटण्यासाठी कोणीतरी आले. म्हणून तो बाहेर गेला.
''रामदास'' मुकुंदरावांनी हाक मारली.
''तो बाहेर गेला आहे. कोणी तरी आले आहे महत्त्वाच्या कामासाठी. येईल लवकरच.'' दयारामने सांगितले.
रामदास आत आला.
''कशाला हाक मारलीत?'' त्याने विचारले.
''कामगार शांत आहेत ना? ते शांत राहावेत म्हणून मी प्रार्थना करीत आहे.'' मुकुंदराव डोळे मिटूनच म्हणाले.
''मालकांनी तडजोडीसाठी बोलावलं आहे. आताच एक डायरेक्टर भेटायला आले होते. मी व अहमद जातो, जाऊ ना?'' रामदासने विचारले.
''जा. कामगारांची उपासमार संपो. किती दिवस शांत राहिले !'' ते म्हणाले.
''मीसुध्दा किती दिवस शांत राहिले? मरेपर्यंत शांत. पाहा ना माझ्याकडे वळून. माझ्याकडे पाहणं म्हणजेही का पाप? त्या दिवसापासून मी मीना आहे हे तुम्हाला कळलं होतं. पुरुषाच्या वेषात मी असले म्हणजे बघवतं वाटतं माझ्याकडे? मला पुरुषाचा पोषाख द्या रे कोणी ! हे डोक्यावरचे केस कापा, नाही तर झाका. काय करू मी? सार्या जगाला सुखवू बघता व एका प्रेमळ सतीला मात्र रडवता.'' मीना बोलू लागली.