असे बुळे झालेले लोक, त्यांची मरणाची डर संतांनी दूर केली. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा', असे तुकारामांनी जनतेला म्हणायला शिकविले. महाराष्ट्रीय संस्कृती म्हणजे 'माझे कर्तव्य संपले, आता मी सुखाने मरतो' या हुतात्मा बाजीप्रभूच्या उद्गारात साठवलेली आहे.

महाराष्ट्रीय संस्कृती म्हणजे प्रयत्नवाद, दैववाद नव्हे. निमूटपणे परिस्थितीला शरण जाणे हा महाराष्ट्रधर्म नाही.
ओले मूळ भेदी खडकाचे अंग

प्रयत्नासी सांग कार्यसिध्दी ॥

हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा मंत्र, प्रयत्न हा देव असे समर्थांनी सांगितले. महाराष्ट्राचे राजकारणही जनतेचे. श्रीशिवछत्रपती कशासाठी जन्मले? गढीवाल्यांच्या गढया जमीनदोस्त करण्यासाठी. गावोगाव सरदार असत. गढीवाले असत. ते शेतकर्‍यास छळीत, लुटीत. ' न मिळे खावया खावयासावया' असे समर्थांस म्हणावे लागले. प्रजेच्या गवताच्या काडीसही कोणी स्पर्श करता कामा नये, त्यांनी पोटच्या पोराप्रमाणे वाढविलेली झाडे, त्यांची फळे कोणी लुबाडता कामा नये, असे त्यांनी हुकूम सोडले. शिवाजीमहाराजांना सवंगडी मिळाले ते जनतेतून मिळाले. कोणी सरंजामी सरदार नाही मिळाले. चंद्रराव मोरे व अफजलखान, दोघेही त्यांना सफा करावे लागले. त्यांच्या राज्याची खूण भगवा झेंडा. राज्य जनतेचे आहे, राजा संन्यासी आहे, हा त्याचा अर्थ. शिवाजी महाराजांना आजूबाजूस पाच पातशहा असताही स्वराज्य स्थापता आले. शून्यातून विश्व निर्मिता आले. कशाच्या जोरावर? ते जनतेचे आत्मा बनले. जनतेच्या दरिद्रीनारायणाच्यामूर्त-आशा-आकांक्षा बनले. ज्या वेळेस जनतेचे प्रश्न, बहुजन समाजाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न पोटतिडिकेने आपण हाती घेतो, त्यावेळेस क्रांती करता येते. मावळयांचे छत्रपती असे होते. तेल्यातांबोळयांचे लोकमान्य असे होते. मंडालेहून आपल्या जीवनाचे सार म्हणून गीतारहस्य त्यांनी आणिले; ते 'श्रीशाय जनतात्मने' जनताजनार्दनरूपी भगवंताला त्यांनी अर्पण केले. महात्माजीही असेच. बहुजनसमाजाची आज ते मूर्तिमंत आशा बनले आहेत.

महाराष्ट्र बुध्दीला देवता मानतो व भावनेच्या सिंहासनावर ती बसवितो. परंतु ही खरी महाराष्ट्रीय बुध्दी म्हणजे क्षुद्र बुध्दी नव्हे. समर्थांनी सांगितले की,

घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड
तेथे कैचे आणले द्वाड । करंटेपण॥

आम्ही विशाल बुध्दीने ब्रह्मांडाला मिठी मारू. वंगभंगाच्या वेळी लोकमान्य टिळकांनीच, बंगालचे दुःख ते सार्‍या भारताचे आहे, हा मंत्र दिला बंगालसाठी सारा महाराष्ट्र पेटवला. कधी कधी आम्ही महाराष्ट्रीय ही थोर बुध्दी विसरतो, परंतु महापुरुष येऊन पुन्हा जागृती देतात.

महाराष्ट्राजवळ कुत्र्याचा लघळपणा नाही. महाराष्ट्र जरा कठोर वाटतो. परंतु हा नारळाचा कठोरपणा आहे. आत गोड पाणी व खमंग खोबरे आहे. ओबड-धोबड महाराष्ट्राच्या अंतरंगी प्रखर उन्हाळयातही न सुकणारे अखंड झरे वाहत असतात. ओबडधोबड डोंगराच्या आत शीतल शांत शिवालये असतात; लपलेली अमर रमणीय  लेणी असतात. महाराष्ट्र आधी दूर दूर राहील, परंतु एकदा जवळ आला म्हणजे मग कधी सोडणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel