''मग नाचत निघून जाईन.'' तोही हसत म्हणे.

त्याची फेरी फुकट जात नसे. गावोगांव खादी जाई. सुंदर गाणे गाई. लोक त्याची वाट पाहत बसत. आला नाही तो खादीवाला, गोडबोल्या खादीवाला. आला नाही तो खादीवाला. गोडदिश्या खादीवाला. असे पोरे-बाळे म्हणत. लहानथोर म्हणत.

खादीवाला रात्री धनगावला असायचा. कामगारांचा वर्ग घ्यायचा. त्याचा वर्ग भरलेला असे. तो गोड गोष्टी सांगे. दमलेल्या कामगारंना हसवी. एखादी करुण कथा सांगे व त्यांना रडवी. एखादी अन्यायाची कथा सांगे व त्यांना तो पेटवी. हसतखेळत ज्ञान देई. हसतखेळत शिकवी.

एखादे वेळेस शांतेकडे तो रात्री जाई. वर्ग संपल्यावर जाई व दारात उभा राहून ''भाकरी देता का ताई?'' म्हणून म्हणे.

''भिकार्‍याला भाकर बंद.'' शांता म्हणे.

''भिकारी नाही मी. मी भाऊ आहे ताई. भावालाही का भाकरी बंद?'' तो म्हणे.

''भावाला आत येऊ दे. चुलीजवळ बसून खाऊ दे. भाऊ बाहेर नाही उभा राहात.'' शांता म्हणे.

मग तो आज जाई. शांतेकडे उरलेलं असेल ते आनंदानं खाई.

''जेवायला येईन असं आधी का नाही सांगत तुम्ही?'' शांता विचारी.

''असं उरलेलंच मला गोड वाटतं.'' तो म्हणे.

''मुद्दाम नका ठेवू. माझ्यासाठी, मुद्दाम कोणी करू नये. सहजपणात मौज आहे. ताई, तुमचा संसार किती सुखाचा, किती प्रेममय किती सेवामय ! मला तुमचा गोड हेवा वाटतो.'' ती म्हणे.

''तुमचं देऊ लग्न लावून?'' शांता विचारी.

''कोण लावणार फकिराशी लग्न? माझं लग्न लागलं आहे ताई.'' तो हसून म्हणे.

''कोणाशी हो लागलं लग्न?'' ती विचारी.

''कोणाशी बरं? खरंच कोणाशी? आठवत नाही मला ताई. सांगत नाही तुम्हाला ताई. एक दिवस सांगेन.'' तो म्हणे.

शांता व मोहन यांच्या संसारात त्या खादीवाल्याने नकळत एक प्रकारची अधिकच गोडी आणली. दोघांना त्याच्याबद्दल आस्था वाटे, प्रेम वाटे, ओढा वाटे. परंतु आणखी एक वस्तू त्यांच्या संसारात येणार होती. शांता त्या वस्तूला वाढवीत होती. त्या वस्तूला तिने पोटात लपवून ठेवले होते. एक दिवस ती वस्तू जगाला दिसणार होती. शांतेच्या जीवनात ती वस्तू क्रांती करणार होती. शांतेला नवीन अनुभव, नवीन पावन ज्ञान मिळणार होते. शांता माता होणार होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel