“आज महंमदाची पुण्यतिथी! त्या महापुरुषाबद्दल मी काय सांगू? त्यांची केवढी श्रद्धा, किती तळमळ, किती नम्रता! भटक्या अरबांना त्यांनी एकत्र आणिलें. त्यांनी स्त्रियांचा महिमा वाढविला. ऐक्याचा सदेश दिला. तुझ्या शेजारीं तुझा भाऊ उपाशी असेल तर त्याला अर्धी भाकर नेऊन दे असें सांगितलें. व्याज घेऊ नको असे बजाविले. स्वावलंबी व्हावयास त्यांनी शिकविले. एक भीक मागणा-याला त्यांनी लांकडे तोडण्याचा धंदा करावयास लाविले, ‘मला महमंदाला ईश्वरी ज्ञान झाले आहे, तसें जगांत इतरहि महात्म्यांना झालें असेल. त्यांनाहि तुम्ही मान द्या.’ असे कुराणांत स्वच्छ सांगितलें आहे. महापुरुषाच्या शिकवणींतील दोषता ही कालोद्भव असते. महापुरुषाला परिस्थिती पाहून उपदेश करावा लागतो. तो उपदेश म्हणजे त्याचें हृदयसर्वस्व नसतें. त्या उपदेशाचा आपण विकास करावयास हवा.
“महंमदाच्या मरणाच्या वेळचा केवढा उदात्त प्रसंग! त्या वेळेचेशब्द कधी विसरु नका. महंमद म्हणाले, ‘मी कोणाचें देणें नाही ना? कोणाचे ऋण फेडल्याशिवाय नाही ना मी राहिलों? बोला, माझी मान येथे खाली झाली तरी चालेल, परंतु तेथें देवासमोर ती खाली न होवो.’
“थोर शब्द! ज्यायोगें देवासमोर मान लाजेनें खाली घालावी लागेल असे कांहींहि करुं नका. पैगंबराची ही शेवटची आज्ञा आहे. यांत सर्व धर्माचें सार आहे. मरणकाळच्या क्षणांत आपलें सारें जीवन पुंजीभूत होऊन येऊन बसतें. सा-या जीवनाचा अर्थ मरणकाळच्या उद्भगारांत प्रकट होत असतो महंमदाच्या सर्व जीवनाचा काय अर्थ ? देवासमोर मान खाली करावयास लावणारें कोणतेंहि कर्म करूं नको, हा तो अर्थ होय. मी तुम्हांला जास्त काय सांगू ? मी वा-याप्रमाणे हिंडणारा एक प्रवासी आहे. तुमचा माझा परिचय नाहीं. उणें अधिक बोलल्याबद्दल क्षमा करा.”
असें बोलून स्वामीजी जाऊं लागले. अध्यक्षांनीं उठून त्यांना आपल्या जवळच्या खुर्चीवर बसविलें. स्वामीजींचें व्याख्यान सारा श्रोतृसमाज स्त्ब्धतेने ऐकत होता. सर्वांची हृदयें व मनें दिव्य वातावरणांत गेलीं होतीं. स्वामींच्या शब्दांत जिव्हाळा होता, तळमळ होती, कळकळ होती. तळमळ कोणाला जिंकून घेणार नाहीं? कळकळ कोणाच्या हृदयाचा समभाव करणार नाहीं?
अध्यक्षांनी फार न बोलतां समारोप केला. स्वामीच्याभोंवती लोक गोळा झाले. तेथून जावें असें कोणास वाटेना. फुलापासून दूर जावें असें कोणास वाटेल? दिव्य संगीत सोडून जावें असें कोणास वाटेल? कोणी स्वामींना प्रश्नहि विचारू लागले. स्वामीजी शांतपणें त्यांना उत्तरे देत होते. एक मुसलमान म्हणाला, “तुम्ही हिंदु तर मूर्तिपूजक आहांत, तुमचें आमचें कसे पटावे?”
स्वामी म्हणाले, “आपण सारेच मूर्तिपूजक आहोंत. मूर्ति म्हणजे का केवळ दगडी आकृति? ज्याच्यावर आपण प्रेम करतों ती मूर्तिच असते. कुराण ही तुमची मूर्ति आहे, महंमद ही तुमची मूर्ति आहे. मग महंमदाचे दगडी पुतळे किंवा रंगीत चित्रे असोत वा नसोत. महंमद म्हणतांच तुमच्या मनांत कांही भाव उत्पन्न होतात कीं नाही? खरें पाहिले तर हिंदुच मूर्तिपूजक बनले आहेत. हिंदु स्वत:चे तेवढे खरें असे मानीत नाहीं. तो मूर्तिपूजक असूनहि मूर्तींच्या पलीकडे जातो. जगातील सारे संत, सारे धर्म, सारे थोर पुरूष यांना तो तुच्छ मानीत नाही. याच्या उलट तुम्ही महंमद व कुराण या पलीकडे पाहणार नाही. खिस्ती मनुष्य बायबलच्या पलीकडे जाणार नाही. म्हणजे तुम्ही आपल्या मूर्ति कायमच्या करून ठेवल्या आहेत. तुम्ही मूर्तीच्या पलीकडे जात नाहीं. त्याच दोन गोष्टींना फक्त सत्य मानाल. आतां यावरूनच कोण अधिक मूर्तिपूजक तें तुमच्या ध्यानांत येईल. आपण मूर्तिपूजक व मूर्ति पूजीत होतो. पुढें ती मूर्ति फोडली. मी समाजाची मूर्ति पुजूं लागलों. पुढे तीहि फुटली व मी सर्व देशाची मूर्ति पुजूं लागलों. एक दिवस तीहि फुटेल व सर्व मानवजात माझी मूर्ति बनेल. तीहि मूर्ति मला अपुरी पडेल व भगवान् बुद्धाप्रमाणें सर्व सचेतन सृष्टीची मी पूजा करीन. याप्रमाणे लहान ध्येयांच्या मूर्ति फोडीत. उत्तरोत्तर विशाल ध्येयांच्या मूर्ति पूजीत आपणास पुढे जावयाचें आहे, व एक दिवस या सर्व चराचर सृष्टीलाच आपण वंदन करु व ‘आनंदें सागर हेलावती’ अशी आपली स्थिती होईल. म्हणून आम्ही हिंदु मूर्ति करतों व मूर्ति बुडवितों. टर उडविण्यासारख्या या गोष्टी नाहीत.”