“हो. तिला फार आवडलीं,” रघुनाथ म्हणाला.
“वेणू कोण रे रघुनाथ?” नामदेवानें विचारले.
“अरे, या रघुनाथही बहीण. मोठी तरतरीत व हुशार मुलगी आहे. तिच्यांतील पाणी कांही निराळेंच आहे,” स्वामी म्हणाले.
“गोपाळराव दारांतच असतील!” रघुनाथ म्हणाला.
“तुम्ही उगीच सर्वांना घाबरवता,” स्वामी म्हणाले.
“तुमच्या अंगांत खरेंच बराच ताप आहे. एवढ्या तापांत तुम्ही कसें येत होतेत?” नामदेवानें विचारलें.
“अंगात ताप असातना मजूर कामें करतात! कोट्यवधि कुटुंबांतून जी तपश्चर्या चालली आहे, ती कोठें आपणांस माहीत आहे!” स्वामी म्हणाले.
“तुमचें कपाळ चेंपू? दुखतें का ?” नामदेवानें विचारलें.
“तुझा नुसता हात माझ्या कपाळावर ठेव,” स्वामी म्हणाले.
“माझा हात थंड असतो. घरी रायबासुद्धा मी सुट्टीत गेलों म्हणजे मला म्हणतात, ‘नाम्या, ठेव रे, तुझा हात माझ्या कपाळावर,” नामदेव म्हणाला.
“तू सर्वांची आंग शांत करणारा आहेस. भारतमातेची आग शांत करशील,” स्वामी म्हणाले.
“परंतु बर्फ थंड असला तरी त्याचा परिणाम ऊष्ण असतो म्हणतात जसें असतें तसें नसते,” नामदेव म्हणाला.
“आपण मंगलच चितावें. सदिच्छा वाढवावी. स्वत:चा अपमान आत्म्याचा अपमान कां करावा?” स्वामी म्हणाले.
छात्रालयांतील दिवे दिसू लागले. गाडीचा आवाज ऐकून मुलें दरवाजा जवळ आली. स्वामीच्या खोलीशी गाडी थांबली. खोलींत गोपाळरावांनी स्वच्छ अथरूण घातलें होते. उदबत्ती लावलेली होती ‘रामाच्या तसबिरीला फुलांचा हात घातलेला होता. प्रसन्न होतें वातावरण! स्वामी अंथऱुणांवर पडले.
“ आतां तुम्ही सारे जा; मी शांत पडून राहतो,” स्वामी म्हणाले.
“ताक, दूध कांही हवे?” गोपाळरावांनी विचारलें.
“आज कांही नको,” ते म्हणाले.
“ताप किती आहे पाहू? नामदेव, तापनळी घेऊन ये रे,” गोपाळराव म्हणाले.
“तापनळी नामदेव घेऊन आला. स्वामीनीं तो लावून पाहिली.
“किती आहे ताप?” स्वामीनीं विचारलें.
“१०३” नामदेव म्हणाला.
“बराच आहे,” गोपाळराव म्हणाले.
“साधा ताप आहे. कपाळ दुखत नाही. काही नाही. सकाळला मी मोकळा होईन. जा आता सारें नामदेव, रघुनाथ, तुम्हांला अद्याप जेवायचे आहे. जा, अभ्यास करा. येथें विहिरीच्या पाण्याचा तांब्या भरून ठेवा म्हणजे झाले,” स्वामी म्हणाले.