“कोठें?” स्वामीनी प्रश्न केला.

“रघुनाथच्या घरी. आपण तिथं जाऊं. एक दिवस राहून परत येऊ,” नामदेव म्हणाला.

“जाऊ. केव्हा जायचें? उद्यांच सकाळी जाऊं. प्रार्थना झाल्याबरोबर निघू. परंतु गोपाळरावांची परवानगी घेतलीत का ?” स्वामींनी विचारलें.

“आमच्या दोघांची परवानगी आम्ही मिळवू, परंतु तुमची कशी मिळेल? ते तुम्हाला पायी येऊ देणार नाहीत,” रघुनाथ म्हणाला.

“मी त्यांची परवानगी मिळवून ठेवीन,” स्वामी म्हणाले.

“तर मग ठऱलें हा.” असें म्हणून नामदेव व रघुनाथ गेले.

स्वामी गोपाळरावांकडे गेले. गोपाळराव मुलांचे हिशेब करीत होते.

“चालू द्या तुमची आंकडेमोड,” स्वामी हंसत म्हणाले.

“सांरे संत उत्कृष्ट हिशेब करणारे होते. जो हिशेब करीत नाही, नीट जमाखर्च ठेवीत नाही, त्याला ना संसार, ना परमार्थ?” गोपाळराव म्हणाले.

“रामकृष्ण परमहंस असेंच म्हणत एकदां एका माणसाला त्यांनी भाजी आणावयास सांगितली. तो मनुष्य गेला व भाजी घेऊन आला. रामकृष्णांनी विचारलें, ‘काय दिलेंस?’ तो म्हणाला, ‘चार आणे.’ रामकृष्ण रागावले. ‘अरे, ही चार पैशांची भाजी, आणि चार आणे दिलेस? हा बाबळ्या. तुला व्यवहार समजत नाही, आणि म्हणे मला साबू व्हायचें आहे! परमार्थ म्हणजे कां बावळटपणा, अजागळपणा समजलास? परमार्थ म्हणजे मोलाचें नाणें देऊन कचरा पदरांत बांधणे नव्हे. परमार्थ म्हणजे माती देऊन सोनें मिळवावयाचें. हा मातीचा देह देऊन सोनें मिळवावयाचें. हा मातीचा देह देऊन तो सच्चिदानंद मिळवावयाचा,” स्वामी सांगू लागलें.

“मग तुम्ही घेता का हें हिशेबाचें काम?” गोपाळरावांनी विचारलें.

“हा हिशेब मला नको. मी दुसरे हिशेब व दुसरे जमाखर्च करीतच असतो,” स्वामी म्हणाले.

“कोणते?” गोपाळरावांनी विचारलें.

“आयुष्याला चाळीस वर्षें झालीं. चाळीस वर्षें हें दुकान चालविलें. नफातोटा का झाला – याचा रोज आढावा घेत असतो,” स्वामी म्हणाले.

“आपण मरेपावेतों लाखों कर्मे करतों. परंतु या सर्वांचें उत्तर एका शब्दांत द्यावयाचें असतें. नफा कीं तोटा?” गोपाळराव म्हणाले.

“ज्याप्रमाणे अपूर्णांकाच्या उदाहरणांत मोठमोठे आंकडे दिसतात, परंतु छेद देतां देतां शेवटी एक किंवा शून्य उत्तर निघतें – तसेंच हे,” स्वामी म्हणाले.

“तुम्ही इकडे कोठें आलांत? जरा प्रसन्न दिसतें आहे तुमचें मन,” गोपाळरावांनी विचारलें.

“पक्षी जरा उडून येणार आहे,” स्वामी गंमतीने म्हणाले.

“उडून परत येवो म्हणजे झालें. नाहीं तर निळे निळें आकाश पाहून जायचा कोठें दूर व मग बसायचा पुन्हां रडत,” गोपाळराव म्हणाले.

“जवळ जाणार आहे. धन्याची परवानगी घ्यावयास पक्षी आला आहे,” स्वामी म्हणाले.

“माझी अनुज्ञा आहे. परंतु कोठें जाणार?” गोपाळरावांनी प्रश्न केला.

“मी रघुनाथच्या देवपूरला जाऊन येतो,” स्वामींनी सांगितलें.

“आणखी कोण आहे बरोबर?”

“नामदेव व रघुनाथ,”

“पायी जाणार?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel