“अरे, आजारी पडलेत तर तुमचे पालक माझ्या नांवानें खडे फोडतील. छात्रालयांत कोणी आजारी पडूं नये अशी देवाला माझी प्रार्थना असते. घ्या एकेक गोळी म्हणजे पुन्हा महादेवाचें दर्शन घ्यावयास अडचण पडणार नाही,” गोपाळऱाव म्हणाले.
नामदेवानें सर्वांना एकेक गोळी दिली.
“अरे स्वामींनाहि दे. घेऊ दें त्यांनाहि.” गोपाळऱाव म्हणाले.
“मला नको. मी कधी आजारी पडणार नाही,” स्वामी म्हणाले.
“अहंकार नको. उद्यांच पडायचेत नाहीतर आजारी,” गोपाळराव म्हणाले,
“दे रे नामदेव! मलाहि घेऊ दें. सुखदु:खात, कडूगोडांत तुमच्या बरोबर राहूं दे.” स्वामींनीहि हातांत गोळी घेतली.
“थांबा रे, मी मंत्र म्हणतों, मग गोळ्या गिळ्या,” असं म्हणून गोपाळराव संकल्प सांगू लागलें.
“अघोच्चरितवर्तमान एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथी
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ पुन:पुन: ग्रामसेवाप्रसंग प्राप्तर्थ, शरीररक्षणार्थ इदं कटुगुटिकाभक्षणम् अहंकरिष्ये|
अरे! थांबा जरा.
अच्युतानंदगोविंदनामोच्चारणभेषजम् |
नश्चन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम् ||
गिळा रे गिळा, गोपाळराव म्हणाले.
“अरे त्याला पाणी द्या, त्याला गिळता नाही येंत,” स्वामी म्हणाले.
“महादेवाच्या कंठांत विष राहिलें याच्या कंठांत. कोयनेलची पांढरी गोळी राहावयाची. ती नीळकंठ व श्वेतकंठ!” गोपाळराव विनोद करीत होते.
“आपण आता पुन: महादेवाच्या दर्शनास कधीं जावयाचे?” मुलांनी विचारलें.
“आपण जाऊं तेव्हां जाऊ. परंतु तुम्ही मोठे झालात, शिक्षण संपविलेत म्हणजे मात्र गेल्याशिवाय राहू नका! महादेव वाट पाहात आहे! तुम्ही केव्हा मोठे होऊन येता त्याची वाट पाहात आहे!” स्वामी गंभीरपणें म्हणाले.