इतक्यात स्वामींना पाहावयास नामदेव व रघुनाथ आले.
“चला. जेवायला चला, ” नामदेव म्हणाला.
“आम्ही म्हटले तुम्ही याल, ” रघुनाथ म्हणाला.
स्वामी उठत ना, बोलत ना.
“येताना? आज तुम्हाला काय होत आहे? बरें नाही वाटत? ” नामदेवाने विचारले.
“होय, ” स्वामी म्हणाले.
“काय होते? आम्हांला नाही सांगणार? ” रघुनाथ म्हणाला.
“माझे मन दुखते आहे. माझे मन जसे कोंडले गेले आहे. माझ्या आत्म्याला गुदमरल्यासारखे वाचत आहे. वाटते. उडून जावे. नको हे पसारे, नकोत हे व्याप. या उपदव्यापांनी काय होणार? नसता अहंकार मात्र जडावयाचा! तुला रामतीर्थींची माहिती आहे का? रामरतीर्थ हिमालयांतून खाली येत. कांही चळवळ किंवा वळवळ करावयास म्हणून खाली येत. परंतु दोन चार प्रवचने, व्याख्याने दिली की ते गुदमरत! हिमालयांतील स्वच्छ निरुपाषिक पवित्र हवा त्यांच्या आत्म्यास पाहिजे असे. सर्वत्र स्वच्छ धवल बर्फ पसरलेले आहे. दुसरे कांही नाही! एक आत्मतत्त्व, एक देवाचे राज्य सर्वत्र दिसत आहे! खालची संसारी हवा त्यांच्या आत्म्यास सहन होत नसे. ते पुन्हा हिमालयांत जात! या ओढाताणीमुळेच रामतीर्थ लवकर मेले असावेत! माझीहि अशीच ओढाताण होत असते. कांही तरी या हातातून घडावे असे एकीकडे वाटते, तर एखादे दिवशी ही सारी बंधने फेंकून तस्ततची ललकारी मारीत स्वच्छंद विहरावे, विचरावे असे वाटते. कोठे तरी उडून जावे असे मला वाटत आहे. मी उगीच चिखलात बरबटट आहे असे मला वाटत आहे. माझे मन आज भारावले आहे, ” स्वामी म्हणाले.
“तुम्ही आतां कोठे जाणार? आमच्या जीवनांत मग अंधार पसरेल. तुमच्यामुळे थोडी त्यागवृर्त्ति, सेवावृत्ति उत्पन्न होत आहे. तुमच्यामुळे उदार विचारांची गोडी लागत आहे. तुम्ही गेलात तर पंखहीन पांखराप्रमाणे, सुकाणू नसलेल्या गलबताप्रमाणे, सूत्रहीन पतंगाप्रमाणे आमची स्थिती होईल. आम्हांला सोडून कोठे आहे देव? आजुबाजूच्या या संसारांत का देवाचे दर्शन नाही? ज्याला जगात देव मिळत नाही, त्याला अन्यत्र कोठे मिळणार, असे तुम्हीच मागे एकदा म्हणाले होतेत. भगवान बुद्ध म्हणत की, ‘ एकाहि माणसाचे दु:ख कमी व्हावे म्हणून मी पांचशे वेळा जन्म घेईन!’ तुम्ही का कंटाळता? तुम्ही कोठे जाऊ नका. आमच्या सर्वांच्या निराशा पाहा आणि जाऊ नका. संसारच कसा रसमय करावा, सारमय करावा, सुंदर करावा हे लोकांना शिकविण्याची जरूर आहे. तुम्ही ते चांगले करू शकाल, ” नामदेव म्हणाला.