मुलें निरनिराळ्या ठिकाणी गेली. काहीं मुलांनी शाळेच्या आवाराभोंवती झाडें लाविली. कांही मुलांनी गांवाबाहेरच्या देवळाभोवती झाडें लाविली. छात्रालयांतील मुलांनी छात्रालयांच्या भोंवती झाडें लाविली!
“तुम्ही छात्रालयांतून जाल. परंतु तुमच्या हातची झाडें राहातील छात्रालयांत तुमच्या हातची जीवंत खूण ठेून जा. छाया देणारी. सुगंध देणारी, फळ देणारी आठवण ठेवून जा. अशोक, चंदन, बकूळ, आम्र, शिरीष, निंब पुन्नाग, जांभूळ लावा. नाना प्रकारची झाडें, त्यांना कुंपण घाला. पाऊस नसेल तेव्हा पाणी घाला. आपल्या हातानें कांही निर्माण करा. त्यांत किती आनंद आहे. केवढे समाधान आहे!” स्वामी सांगत होते.
हिरवी हिरवी हिरवी गारं | चल झाडे लावू चार ||
चला झाडें लावू चार
उठा झाडें लावू चार |
हिरवीं हिरवी हिंरवी गार | चला झाडे लावू चार ||
झाडें लावूं सुंदर छान | त्यांना मानूं आपण प्राण ||
देतील छाया थंडगार | होऊ देबाजीला प्यार || हिं. ||
हिरवीं हिरवीं मंदिरें | चला लावू सुंदरें |
पाहून झाडें हिरवींगार | वरून येईल मेघधारं || हिं.||
वगैरें गाणी म्हणत मुलांचे काम चाललें होते ! स्वामी मधून मधून वृक्षसंस्कृति सांगत होते. वड, पिंपळ, औदुंबर, आंवळी, बेल इत्यादि वृक्षांना आपण कसें पावित्र्य दिलें आहे. आवळीखांली जेवावें, वनभोजन जावे,
पत्रावळीवर जेवावें त्यांची व्रते घ्यावी, कसा महिमा आहे! आपल्याकडे वृक्षवेलींची आपण लग्नेंहि कशीं लावींत होतों! शाकुंतल नाटकांत शकुंतला आम्रवृक्षाचें जातिमुक्तालतेशी कसें लग्न लावते! तुळशीचें लग्न अद्याप कसें अस्तित्वांत आहे, व त्या लग्नांत आंवळे, चिंचा, झेंडू यांचे महत्तव कसें आहे, सारें स्वामी सांगत होते. सृष्टीशीं समरूप व्हावयाची केवढी थोर कल्पना! झाडांना रात्री तोंडू नये, रात्री पानफूल तोंडू नये. यांतहि केवढी सहृदयता आहे! रात्रींच्या वेळीं झाडें निजतात! केवढें काव्य आहे!
भारतीय संस्कृतींतील हृदयंगम दर्शन मधून मधून स्वामीजी मुलांस घडवीत असत व मुलांचा आत्मा भावनांनी भरून येई. भारतीय ध्येयांची भव्यता व उदारता त्यांना पटे व त्या संस्कृतीचे आपण वारसदार म्हणून अभिमान वाटे.
दुपारी मुलें शाळेंत गेलीं म्हणजे स्वामींचा वेळ वाचनांत किंवा कांतण्यांत जात असे. परंतु हरिजनांची शाळा सुरु करावी, दुपारच्या वेळी हरिजनवस्तींत जावें, तेथील मुलांत बसावें, गोष्टी सांगाव्या असें त्यांच्या मनांत आलें. मनांत आलें कीं करावयाचें हा स्वामींचा दंडक होता. एके दिवशी रात्रीं ते हरिजनवस्तींतील एका मंदिरांत गेले. तें हरिजनांचें मंदिर होतें. स्वामीजी तेथें गाणें म्हणत बसले. हरिजनमंडळी तेथें जमली.
“मी तुमच्या मुलांना उद्यांपासून दुपारीं बारा ते दोन शिकवायला आलों तर चालेल का? तुमचीं कांही मुलें येथील का?” स्वामीनीं प्रश्न विचारला.
“हो, कांही मुलें येत जातील. आणि तुम्ही रात्रीं येत जाल तर आम्ही लहानमोठे सारेच येऊं आम्हांस गोष्टी सांगा, वाचून दाखवा,” एक उत्साही गृहस्थ म्हणाले.
“आठवड्यांतून तीन दिवस रात्रीं मी येत जाईन. परंतु दिवसां बहुधा रोज येत जाईन. ज्या दिवशी येता येणार नाहीं त्या दिवशी कळवीत जाईन,” स्वामी म्हणाले.