“ही बाग तयार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलें. नामदेव, रघुनाथ, यशवंत सारे पाणी चालीत, धडे भरुन आणीत. रघुनाथच्या हातांतील घागर नामदेव घेई, नामदेवाच्या हातांतील दयाराम घेई. भावी ‘जीवनांत असेंच सहकार्य तुमही नाही का करणार? संघ स्थापून, मंडळे स्थापून, आश्रम स्थापून देशाला नाही का नवजीवन देणार?
“रघुनाथ! एक गुलाबाची कळी फुलावी म्हणून तू किती झटत होतास. उद्या मोठा झालास म्हणजे आजूबाजूच्या दोन दरिद्री बंधूंच्या जीवनाच्या कळ्या फुलव. किती गरिबांची मुलें मरत आहेत! त्या गुलाबाच्या कळ्या कोण फुलवणार? त्या मुलांच्या गालांवर आनदाचा, आरोग्याचा गुलाबी रंग कोण फुलवणार?
“मुलांनो! हा बाहेरबगीचा आहे, तसाच एक अंदरबगीचाहि आहे. येथें बाहेर गुलाब फुलविलेत, अंत:करणांतहि गुलाब फुलवा. या जमिनीवरची घाण दूर केलीत, तशी हृदयांतीलहि घाण दूर करा. हृदयांत सद्विचारांची रोपें लावा, सत्कल्पनांच्या वेली लावा, स्फूर्तीचीं कारंजी नाचवा. बाहेर फुलें फुलवा, आंत फुले फुलवा.
“रघुनाथ! या गुलाबाच्या कळीला जपत होतास. कीड, मुंगी झाडीत होतास. तुझ्या जीवनाच्या कळीलाहि जप. जीवनाच्या कळीलाहि मोहाचे किडे खाणार नाहीत, वासनांचे भुंगे पोखरणार नाहीत याबद्दल जप बाहेर श्रम करीत राहिलेत म्हणजे हृदय आपोआप फुलेल. आळशी माणसांचे हृदय सैतानाचे माहेरघर होतें. परंतु कर्मयोग्याचें हृदय म्हणजे सद्गगुणांचे वासस्थान होतें. नेहमी उद्योगांत राहा, कर्ममय व्हा – म्हणजे जीवनाला तेज चढेल, मलीनता झडेल.”
“स्वत:चें जीवन समुद्ध करणारे, आपल्या बांधवांनी जीवने रसमय करणारे, भारतमातेला हंसवणारे, देवाचे मजूर आपण होऊं या.
देवाचे मजूर | आम्ही देशाचे मजूर |
कष्ट करूं भरपूर || आम्ही देवाचे मजुर ||
बाहेरील ही शेती करून
धनधान्याने तिला नटवून
फुलांफळांनी तिला हंसवून
दुष्काळा करूं दूर || आम्ही. ||
हृदयांतीलहि शेती करून
स्नेहदयेचे मळे पिळवून
समानता प्रेमाला निर्मून
सौख्या आणू पूर || आम्ही ||
रोगराई ती करुनि दूर
घाण सकळहि करुनि दूर
स्वर्ग निर्मू तो या पृथ्वीवर
बदलू सारा नूर || आम्ही. ||
दिवसभर असे कष्ट करून
जाऊं घामाघूम होऊन
रात्री भजनी जाऊ रमून
भक्तीचा घरूं सूर || आम्ही. ||
कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद
नाही कांही जरूर || आम्ही. ||
“गड्यांनो ! असे देवाचे मजूर तुम्ही पुढें व्हाल अशी मी आशा धरून”