“देवपूरच्या आश्रमाचे काय झाले? जानकू व भिका यांना विणकामाचे शिक्षण देण्यासाठी पाठवणार होतेत ना? काही जमले का?” रघुनाथने विचारले.

“मी अमळनेरच्या छात्रालयांतील मुलास एक कल्पना सुचविली आहे. दीडशे मुले आहेत. यांतील शंभर मुले तरी अशी आहेत की महिना चार आणे देऊ शकतील. वीस रुपये खर्च त्यांना येतो. त्यांत चार आणे त्यांना भारी नाही. महिना जर १५-२० रुपये असे जमले तर जानकू व भिका यांना मी पाठवीन म्हणतो. दुसरा एक विचार माझ्या मनात आला आहे तोहि सांगतो. छात्रालयाच्या भोजनाची सारी व्यवस्था मी माझ्याकडे घ्यावयाची. मुलांकडून दर महिना दहा रुपये घ्यावयाचे व त्यांना नीट जेवण द्यावयाचे. मधल्या सुट्टीत ज्यांना काही पाहिजे असेल त्यांना त्याचा खर्च निराळा. मला खात्री वाटते की खर्चवेच वजा जाता दीडदोनशे रुपये तरी उरतील. महिन्याला पंधराशे रुपये जमा होतील. हजार बाराशे रुपयांत नीट काटकसरीने व्यवस्था ठेवली तर सारे काही होईल. मुलांच्या जेवणातही मी शास्त्रीयता आणीन. हे शंभर, दोनशे रुपये जर दर महिन्याला उरले, तर त्यांतून किती तरी कामे करता येतील. पुन्हा सारे गाजावाजा न होता. पाहू या, काय काय होते ते. धडपडत राहावयाचे!”   स्वामी म्हणाे

“तुम्हाला फार त्रास होईल. तुम्ही का आचारी होणार? आगीजवळ बसणार? मला कल्पनाच सहन होत नाही,” नामदेव म्हणाला.

“स्वयंपाक करणे मला आवडते. मला मुलांची आई होऊ दे. माझ्या हाताने तयार करून त्यांना वाढू दे. देशातील कामहि वाढू दे. कोठून तरी पैसा उत्पन्न करावयास हवा ना? आचारी होणे का कमी प्रतीचे आहे? नामदेव, सेवेची सर्व कर्मे पवित्र व सारखी आहेत. गायत्री मंत्र देणार विश्वामित्र व समाजातील घाण दूर करणारा भंगी—दोघांची योग्यता सारखीच. एक आंतरिक स्वच्छता देतो, दुसरा बाहेरची देतो. सेवेच्या कर्मात तन्मयता किती आहे, हृदय किती ओतले आहे, बुद्धि किती वापरली आहे, यांवर त्या कर्माची किंमत आहे. प्रकृतीला उपकारक पदार्थ कोणते, भाज्या कोणत्या चांगल्या, इत्यादींचा अभ्यास करून प्रेमपूर्वक जर मी रसोई केली तर ते कर्म मोक्षाचे अधिकारी आहे. तुम्ही काळजी नका करू. अजून मी ठरविले आहे असे नाहीच परंतु मनांतील घडामोडी तुमच्याजवळ सांगितल्या पाहिजेत,” स्वामी म्हणाले.

“शरिराची काळजी घ्या. तुम्ही आम्हाला पुष्कळ दिवस हवेत हे विसरू नका,” रघुनाथ म्हणाला.

‘रघुनाथ ! तुम्हीहि शरिराची आबाळ करू नका. दोघे चांगले राहा. तुमची ही मैत्री पाहून मला कृतार्थ वाटते. प्रत्यक्ष जीवनात तुम्ही साम्यवाद आणीत आहात. स्वत:च्या जीवनापासूनच साम्यवादाला आरंभ करीत आहात. नामदेव, अभ्यास सांभाळून इतर विचार मिळवीत जा. पुण्यांत निरनिराळी अभ्यासमंडळे असतात. तेथे जावे. ऐकावे, वाचावे, मनांत मनन करावे. ओळखी होतात. जरा माणसाळलेला हो. तू फार लाजतोस. हजारो मित्र जोडायला हवेत. तरुण महाराष्ट्राचे हृदय एक होऊ दे. समानी व आकृति: समाना हृदयानि व:। एकमेकांना आशा मिळते, आधार वाटतो. सातारा, पुणे, सोलापूर इकडेहि तरुण ध्येयवान होत आहेत, गरिबांसाठी तडफडत आहेत हे पाहून तुम्हाला स्फूर्ति येईल. तुम्हा खानदेशांतील मुलांना पाहून पुणेनगरच्यांना उचंबळून येईल. महाराष्ट्राच्या तरुणांची परस्परांस ओळख होऊ दे. एकमेकांच्या हृदयांतील अशांति, आग, ध्येयाचा ध्यास एकमेकांना दिसू दे. विचार पाहिजे. विचार हा तरवारीपेक्षा बलवान आहे. राष्ट्रांत सर्वत्र विचाराचे वारे घों घों करू लागले पाहिजेत. एक वेळ जेवा, परंतु विचारांचे जेवण आधी मिळवा. शक्य तर नवीन पुस्तकहि घ्यावे. मनुष्य शेवटी भाकरीने जगत नसून विचाराने जगतो. विचारांची भाकर अधिक मोलवान. तुम्ही विचारांची भरपूर पौष्टिक भाकर मिळविल्याशिवाय लाखो लोकांना धान्याची भाकर तुम्हाला देता येणार नाही. समजलेत ना? करा धडपड. विचाराने श्रीमंत होऊन मला येऊन मिळा,” स्वामींचे बोलणे दोघेजण पीत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel