“ज्या प्रेमाला शंका येते, तें खरें प्रेम नाहीं. खरें प्रेम मोकळें असतें. त्याला ना संशय ना भय. मी थोडें कमी प्रेम करुं असें का तुमचे म्हणणे आहे? हा का तुमचा अर्ज आहे?” स्वामींनीं विचारिलें.
“हो” मुरलीधऱ म्हणाला.
“परंतु प्रेम कमी करु म्हणजे काय करु? तुम्ही पानांत वाटेल तेवढे मीठ घेऊन उंगीच टाकता, म्हणून का शिक्षा करु? हौदाच्या कट्यावर राखुंडी ठेवून तशीच ती घाण तेथे ठेवता, म्हणून का दंड करीत सुटू? प्रेम कमी करू म्हणजे काय करु? सांगा ना?” स्वामी जरा विषण्ण मनानें म्हणाले.
“हौदाचा कट्टा तुम्ही कां धुता? आम्ही नाही का धुणार? आम्हांला तुम्ही सांगत जा. तुम्ही आज्ञा करीत जा,” मुकुंदा म्हणाला.
“आज्ञेला सामर्थ्य येण्यासाठी आधी सेवा करावी लागते. आई मुलांची लहानपणी अपरंपार सेवा करिते, तेव्हा तिच्या शब्दाला थोडी किंमत येते. आधी झिजावे व मग मागावें. आधी मरावें व मग मिळवावें.” स्वामी म्हणाले.
“परंतु स्वामी! तुम्ही आमच्या अंथरुणातील ‘चादरी धुता हें कांही चांगले नाही. आम्हाला का स्वाभिमान नाही?” नरहर जरा रागानें म्हणाला.
“तुम्हाला स्वाभिमान असता तर अशा गलिच्छ चादरीवर तुम्ही तुमचा पवित्र देह निजू दिला नसता. स्वाभिमान शब्द उच्चारणें सोपें आहे, परंतु स्वाभिमानाचें जिणें जगणें फार कठीण आहे.” स्वामी म्हणाले.
“तुम्ही आम्हांला लाजवता,” एकजण म्हणाला.
“मी लाजवण्यासाठी कांही करीत नाही. माझ्या हातांना सेवेची भूक आहे. घाण दूर करावी. अश्रू पुसावें याची ह्या माझ्या हातांना कसोशी आहे. मी घाण शोधीत जातों, दिसली की दूर करतों,” स्वामी म्हणाले.
“सा-या जगाची घाण तुम्ही दूर करु शकाल?” नरहरनें विचारलें.
“नाही मनुष्याची शक्ति मर्यादित आहे. जेवढे करता येईल तेवढे त्याने करावे. आत्म्याला सर्व विश्वाला कवटाळावे असें वाटतें परंतु या देहानें जवळच्या दोनचारजणांनाच हृदयांशी धरता येईल, मनात सर्व जगाची सेवा, परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत आसपासच्या दोनचारजणांचीच सेवा आपणांस करता येईल,” स्वामी म्हणाले.
“स्वामीजी! तुम्ही आमचे कंदील पूसून ठेवलेत त्या दिवशी.” जनार्दन म्हणाला.
“ते कंदीर पाहून मला वाईट वाटलें. जणु ते कंदील रडत आहेत असें मला वाटलें. तुम्हांला ज्ञानाचा प्रकाश मिळावा, अंधारात वाचता यावे,
अधारांत दिसावें, म्हणून त्या कंदिलाचें तोंड काळें होते; तें काळे तोंड कृतज्ञतेनें पुसून ठेवणें हे आपलें कर्तव्य आहे. आपल्या घामानें कपडे मळतात ते स्वच्छ ठेवणें हें आपले कर्तव्य आहे. आपल्यासाठी भांडी घाणेरंडी होतात, ती अंतर्बाह्य घासून स्वच्छ ठेविली पाहिजेत. आपल्यासाठी झिजणा-या, श्रमणा-या, मलीन होणा-या शेंकडो वस्तु-त्यांना मन आहे अशी कल्पना करा. त्या वस्तूंच्या अंतरंगांत शिरा. त्या वस्तु तुमच्या नावाने खडे फोडीत असतील. तुम्हांला शिव्या शाप देत असतील. आपल्या लोकांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही,” स्वामीजी म्हणाले.