मुलें आवार स्वच्छ करु लागली. मुलांनी आपापल्या खोलीतून स्वच्छता निर्माण केली. सर्वत्र नीटनेटकेपणा दिसू लागला. एखादा थोर पुरुष येणार या कल्पनेनेंच कामाची चक्रे भराभर फिरु लागतात. सर्वांच्या अंगांत चैतन्य संचरते. मग तो महापुरुष प्रत्यक्ष चोवीस तास ज्यांच्याजवळ बसत-उठत असेल, त्यांची जीवनें कशी निरलस; धगधगित व संस्फूर्त असतील त्याची कल्पनाच करावी. आणि सर्व विश्वाचां चालक तो विश्वंभर, तो रात्रदिवस आपल्याजवळ आहे, आपल्या हृदयांत आहे, ही ज्याला अखंड जाणीव असते, त्याचे जीवन किती सुंदर व पवित्र असेल? महात्माजींसारख्यांच्या जीवनांत किती शांत पेज, किती पावनत्व, किती प्रसन्नत्व! महापुरुषाच्या जीवनाचे दर्शन म्हणजे अनंताचे दर्शन होय!
नामदेव माळ करुं लागला. त्याच्या रमणीय चेह-यावर भावभक्ति पसरली होती. प्रत्येक फूल किती हळुवारपणाने तो ओवीत होता. सुंदर पुष्पहार तयार झाला. नामदेवानें तो आपल्या हातांत ठेविला. सारीं मुलें अर्धवर्तुळाकार छात्रालयाच्या द्वारापाशी उभा राहिलीं. ते पाहा येत आहेत. स्वामी व गोपाळराव येत आहेत. हंसत बोलत येत आहेत. आले. द्वाराजवळ आले. मुलांनीं टाळ्यांचा गजर केला. नामदेव पुढें झाला. त्यानें स्वामींच्या गळ्यांत ती सुंदर माळ घातली. दुस-या एका मुलांने गोपाळरावांच्याहि गळ्यांत घातली.
“ अरे मला कशाला? मी रोजचाच आहे,” गोपाळऱाव म्हणाले.
“ तुम्ही यांना आणलेत म्हणून तुम्हांलाहि माळ हवी,” एक मुलगा म्हणाला.
“ चला, सारे प्रार्थनामंदिरांतच चला,” गोपाळराव म्हणाले.
सारी मुलें प्रार्थनामंदिरांत जमली. प्रार्थनामंदिर अत्यंत स्वच्छ होते. सुंदर तसबिरी तेथे लाविलेल्या होत्या. पवित्र भावना तेथे शिरतांच मनांत उत्पन्न् होत असत. मुलांनी उदबत्त्याहि लावून ठेविल्या. सुगंध पसरुन राहिला होता.
गोपाळराव व स्वामीजी आले. सारी मुलें उभी राहिली.
“ बसा,” गोपाळराव म्हणाले.
मुलें बसली. स्वामीजी व गोपाळरावहि बसले. सर्व शांत झाल्यावर गोपाळराव उभे राहिले. ते कांहीतरी बोलणार होते. मुले लक्ष लावून ऐकू लागलीं.
“ मुलांनो! आज फार पवित्र दिवस आहे. एक थोर मनुष्य आपल्या संस्थेस आज लाभत आहेत. ते किती दिवस येथे राहातील याचा नेम नाही. परंतु तुम्ही त्यांना इतका मोह पाडा कीं ते तुमच्यांतून कधी न जावोत. हें आतां तुमच्या हातांत आहे. तुम्ही चांगले व्हाल, चांगले वागाल. तर स्वामींना येथे राहाण्यांत आनंद वाटेल. वातावरण निर्मळ राखा. मी रत्न आणलें आहे. ते न गमावणे हें तुमच्या हाती आहे. स्वामीना तुम्ही लुटा. त्यांच्याजवळचे विचार पिऊन टाका व पुष्ट व्हा. गाईची भरलेली कास वत्स रिती करतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वामींना रिकामे करा. स्वामी येणार म्हणून तुम्हीं सर्वत्र साफसफाई केलीत. परंतु ते कायमचे आता येथे राहाणार तर नेहमीं स्वच्छता राखा; शरिराची, मनाची, सभोवतालच्या वातावरणाची स्वच्छता राखा. तुमच्या ताब्यांत मी स्वामींना देत आहे व तुम्हांला स्वामींच्या ताब्यांत देत आहे. मी आता फक्त साक्षी राहीन,” असें म्हणून गोपाळराव खालीं बसले.